प्रगल्भ करणारं मातृत्व

आईपणाची चाहूल लागली तेव्हा मी ‘हक्क’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतंच संपवलं होतं. त्यात मी आणि मिलिंद गवळी होतो. त्याचदरम्यान माझ्याकडे नृत्याचे अनेक कार्यक्रम आले होते.
Actress Smita Shevale
Actress Smita Shevalesakal

आईपणाची चाहूल लागली तेव्हा मी ‘हक्क’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतंच संपवलं होतं. त्यात मी आणि मिलिंद गवळी होतो. त्याचदरम्यान माझ्याकडे नृत्याचे अनेक कार्यक्रम आले होते. त्यावेळी ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटात नऊ मिनिटांचा मुजरा करायचा होता. त्यामध्ये मी आणि भार्गवी चिरमुले होतो. दीपाली विचारे कोरिओग्राफी करत होती.

तेव्हा ‘सकाळ’नं क्लासिकल डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आशिष पाटील त्याची कोरिओग्राफी करत होता. म्हणजे मी सलग १५ दिवस रोज सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत डान्सची प्रॅक्टिस करत होते. गाणं आणि नृत्याची प्रॅक्टिस संपल्यावर मला मी प्रेग्नंट असल्याचं समजलं. त्यावेळी मला खूप आनंद झाला. त्यानंतर ‘सकाळ’च्या कार्यक्रमातही काळजी घेऊन मी सहभागी झाले आणि जबाबदारी पूर्ण केली. त्यानंतर मात्र नृत्याचे कार्यक्रम थांबवावे लागले.

प्रेग्नन्सीत मी आणि बाळ खूप हेल्दी होतो. नऊ महिने मी ड्राईव्ह केलं. वर्कशॉपही घेतले. कबीरचा जन्म झाल्यानंतर तीन महिन्यांनी एका चित्रपटाची ऑफर आली आणि त्याचं चित्रीकरण पुण्यात सात-आठ दिवस चालणार होतं. त्यावेळी मी त्या चित्रपटात कामही केलं. करिअरिस्ट महिलांना बाळ झाल्यानंतर थोडीफार तडजोड करावीच लागते, तशीच मलाही करावी लागली.

आहार पूर्णपणे बदलला, बाळामुळे झोपेच्या वेळाही बदलल्या. सतत घरात थांबायला लागत असे. बाळाच्या झोपेप्रमाणे सगळ्या कामाच्या वेळा ठरवाव्या लागत होत्या. आपल्या बाळासाठी ते प्रत्येकाला करावं लागतंच. काम आणि बाळ या दोन्हीही गोष्टी तितक्याचं महत्त्वाच्या वाटायच्या.

आईपणाची चाहूल लागली तेव्हा मी ठरवलं, की आता बाळासाठी व माझ्यासाठी वेळ द्यायचा. मग मी गर्भसंस्कार, स्वतःला वेळ देणं, वाचन करणं, व्यायाम करणं, आहार योग्य पद्धतीने घेणं, या सर्व गोष्टींकडे योग्यरीत्या लक्ष दिलं. मी याचा पुरेपूर आनंद घेत होते. डिलिव्हरीनंतर मी निर्णय घेतला, की आयुष्यात पहिलं प्राधान्य कबीर हाच असणार आहे. त्यानंतर करिअर असेल. त्याचपद्धतीने त्याला सांभाळून जी कामं करता येतील, ती मी घ्यायला सुरुवात केली. हे करत असताना तारेवरची कसरत करावी लागली. 

आई झाल्यानंतर पहिले सहा महिने खूपच अवघड गेले. घर, बाळ आणि काम कसं ॲडजस्ट करायचं, हा प्रश्न पडायचा. मात्र, सहा महिन्यानंतर कबीर बाहेरचं खायला लागला, तेव्हा थोडसं टेन्शन कमी झालं. मी अर्चना म्हणजे माझ्या लांबच्या बहिणीला कबीरला खास सांभाळण्यासाठी नेमलं होतं, तरीही सुरूवातीच्या काळात मानसिक तणाव येत होता. मला वाटतं, की मूल झाल्यानंतर आपण स्वतःला कसं सावरलं पाहिजे, याबाबत शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. बाळाला वाढवत असताना आपण काय करणार व कसं प्लॅनिंग करणार, या गोष्टींचा अभ्यास अगोदरच करणं खूप गरजेचं आहे.

कबीरचा जन्म झाल्यानंतर मी पुन्हा तीन महिन्यांनी एका चित्रपटासाठी अभिनय क्षेत्रात आले. त्यापूर्वी मी आणि माझा नवरा राहुल असे दोघांनी एकत्र बसून लगेच चित्रपटात काम करायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला. आलेली संधी सोडू नको, असे राहुल म्हणाला अन्  मी चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला; पण शूटिंगसाठी सायंकाळी सहानंतर मी थांबू शकणार नाही, अशी अट त्यांना घातली होती.

मी नसताना कबीर कधीही रडला नाही किंवा त्यानं मला मिस केलं नाही. मी ‘काम करायला चालले आहे, मी खूप बिझी असणार आहे’, असं सांगत असे. त्यामुळे त्यानं मला कधीच त्रास दिला नाही. मीही घरातून बाहेर पडल्यानंतर बाळाची आठवण काढायची नाही, असं ठरवलं होतं. कारण, आईला आठवण आली की बाळाला आठवणं येते, असं मला सांगितलं होतं.

कामाच्या ठिकाणी उगाच भावुक व्हायचं नाही, हे ठरवलं होतं. त्यामुळे मीही कामात व्यग्र राहत असे. आपण ज्यांच्यावर विश्‍वास ठेऊन बाळ सांभाळायला दिलं आहे, त्यांचं रुटीन कसं असावं, हे मी आधीच ठरवून द्यायचे, व्यवस्थित मॅनेजमेंट करून पूर्ण विश्‍वासाने घराबाहेर पडत असे. त्यामुळे मला कबीरची काळजी वाटत नव्हती.

आई झाल्यानंतर करिअरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच बदलला. कारण, आपलं आयुष्य हे आणखी कुणाचं तरी होऊन जातं. आई होणं ही गोष्ट आपण मान्य केलेली असते अन् त्यानंतर जेव्हा आव्हाने येतात, तेव्हा आपण आणखी पॉवरफुल होत असतो. तुम्ही तुमची शक्ती पूर्णतः पणाला लागलेली असते. क्रिएटिव्हिटी वाढते.

लहान बाळाला घडविताना आपणही एक वेगळी व्यक्ती म्हणून घडत असतो, याची जाणीव आपोआप होते. त्यांना शिकवत असताना अनेक गोष्टी आपल्यालाही उमजतात अन् त्याचा फायदा आपल्या करिअरमध्येही होतो. खरंतर एकाग्रतेनं व मनमुरादपणे काम करण्याचा मंत्र मला कबीरमुळे मिळाला. कारण, मी मजेत राहिले तर माझं बाळही आनंदी राहिलं, हे माझ्या लक्षात आलं होतं.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

1) आई झाल्यानंतर स्वतःवर प्रेम करा. प्रत्येक गोष्ट आनंदाने करा. तणावमुक्त राहा.

2) या जगात कुणीचं सर्वगुणसंपन्न नसतं. परफेक्ट आई ही संकल्पनाच नाहीये. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी देत राहा. न जमणाऱ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही.

3) डिलिव्हरीनंतर कोणकोणती आव्हाने येणार आहेत, याबाबत मानसिक तयारी करावी. त्यासाठी त्यासंदर्भात पॉडकास्ट ऐकावे, समुपदेशन करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

4) आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं किंवा आलं आहे, या मानसिक बदलाच्या गोष्टी घडू शकतात, याचा विचार करून निर्णय घ्यावेत. वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी ठेवली, तर शांतपणे राहून आपण निर्णय घेऊ शकतो.

5) मनातील वाईट किंवा नकारात्मक भावना काढून टाकाव्यात.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com