Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Solapuri Chaddar : सोलापुरी चादरीसोबतच बेडशीट, सतरंज्या, टॉवेल्स, नॅपकिन, सूती लुगडी ही उत्पादने देखील देशभरात प्रसिद्ध आहेत.
Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Solapuri Chaddar History : सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान देशातील काही भागांमध्ये नुकतेच पार पडले. त्यानंतर, आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका देशात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सोलापुरात आले होते. यावेळी आमदार राम सातपुते यांनी मोदींना सोलापुरी चादर देत त्यांचे उत्साहात स्वागत केले. सोलापुरी चादर ही जगभरात प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे ही गेलात तरी घरोघरी सोलापुरी चादर पहायला मिळते. या चादरीविषयी माहित नाही, असा एक ही मनुष्य तुम्हाला शोधून सापडणार नाही. सोलापुरची खास ओळख असलेल्या या चादरीचा इतिहास काय आहे? ते थोडक्यात जाणून घेऊयात.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?
PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

सोलापुरी चादरीचा इतिहास काय?

इंग्रज भारतात येण्यापूर्वी सोलापुरात काही वर्षे मुघल राज्यकर्त्यांची सत्ता होती. त्या काळात मोमीन हे मुस्लीम विणकर सोलापुरात येऊन राहिले. त्यानंतर, पेशवे काळात माधवराव पेशव्यांनी सोलापुरच्या मध्यवर्ती भागात माधव पेठ ही बाजारपेठ वसवली. या माधव पेठची देखभाल करण्याची जबाबदारी पेशव्यांनी कर्नाटकातून आलेल्या जोशी कुटुंबाकडे दिली.

१७५८ मध्ये पेशव्यांच्या काळात सोलापुरातील हातमागाचा व्यवसाय चांगला विस्तारला होता. त्यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून आलेल्या पद्मशाली समाजातील विणकरांनी हातामागावर साडी आणि धोतर विणण्याचे काम सुरू केले. विणकर समाजाच्या जोरावर आणि पेशव्यांच्या दुरदृष्टीमुळे सोलापुरात कापड उद्योग चांगलाच रूजला.

त्या काळापासूनच सोलापूर देशातील अनेक शहरांसोबत जोडले गेले. इथल्या विणकरांनी बनवलेले कापड देशभरात जाऊ लागले. त्यानंतर, ब्रिटिशांच्या काळात हातमाग व्यवसायाचा सर्व्हे करून त्यांचा अहवाल इंग्रज सरकारला पाठवण्यात आला. तसेच, आर्थिक पॅकेज देऊन हातमाग व्यवसाय वाढीस लागला. त्यानंतर, १८१८ मध्ये पेशवाई बुडाली आणि सोलापुरात इंग्रजांची सत्ता स्थापित झाली.

ब्रिटिशांच्या काळात सोलापुरात पहिली कापड गिरणी ‘सोलापूर स्पिनिंग अ‍ॅन्ड वीव्हिंग कंपनीने’ इ.स.१८७७ मध्ये स्थापन केली. त्यानंतरच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोतर आणि साडी तयार व्हायला लागली. हळूहळू धोतर अन् साडीला मागणी वाढू लागली आणि सोलापुरचा कापड उद्योग भरभराटीस आला. वस्त्रोद्योगात दिवसेंदिवस आधुनिकता येत गेली. या परिसरात अनेक कापड गिरण्या उभ्या राहू लागल्या. पोटापाण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या कामगारांचे प्रमाण प्रचंड वाढले. यातील काही इथेच स्थायिक झाले.  

त्यानंतरच्या काळात महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंगाचा काही प्रमाणात फटका सोलापुरच्या वस्त्रोद्योगावर पडला. परंतु, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोलापुरच्या कापड उद्योगाची भरभराट झाली, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, इथल्या कापडाला त्या काळात प्रचंड मागणी वाढली. त्यामुळे, विणकरांनी प्रचंड नफा कमावला.

याच दरम्यान, चिलका, चाटला, क्षीरसागर, वडनाल, दत्तोबा दिवटे, कमटम अशा उद्योजकांनी साड्यांपासून ते चादरीपर्यंतची निर्मिती सुरू केली. साधारणपणे याच काळात आंध्र प्रदेशातील वरंगल जिल्ह्यातल्या मेडक गावातून एक हातामागावर काम करणारा विणकर आपल्या कुटुंबासह सोलापुरात आला.

कामाच्या निमित्ताने हा विणकर सोलापुरातच स्थायिक झाला. या विणकाराचे नाव होते यंबय्या माल्ल्या पुलगम. या विणकाराने सुरूवातीला इतरांच्या कारखान्यात काम केले. थोडे पैसे जमा झाल्यानंतर त्याने १९४९ मध्ये स्वत:चे माग टाकले. सुरूवातीला फरसपेटी आणि जपानी किनाऱ्यांच्या साड्यांचे त्यांनी उत्पादन केले.

त्यानंतर, पुढील काही दिवसांमध्येच चारचे आठ माग झाले. त्यानंतर, अवघ्या १० वर्षांतच पुलगम यांनी सोलापुरच्या साखरपेठेत पहिले दुकान उघडले. या दुकानातील ‘लक्ष्मीनारायण छाप लुगडी’ या नावाने त्यांच्या नऊवारी साड्यांना मोठी मागणी वाढली. त्यांच्या साड्यांची क्वालिटी उत्तम होती. त्यामुळे, त्यांचे नाव बाजारपेठेत मोठे झाले.

नऊवारी साडीला मिळालेल्या भरघोस यशानंतर, १९६४ मध्ये रामय्या पुलगम यांनी आठ मागावरील चादरींचे उत्पादन सुरू केले. मयूर पंख छाप चादरीला (जेकॉर्ड चादर) ही उत्तम प्रतिसाद मिळाला. या चादरीने पुलगम यांना मोठी ओळख मिळवून दिली.

या जेकॉर्ड चादरी पाठोपाठ टॉवेल, बेडशीटचे उत्पादन सुरू झाले. आगामी काळात सोलापुरच्या दाजी पेठेत त्यांचे शोरूम सुरू झाले. खास चादरींच्या खरेदीसाठी आसपासच्या गावातील लोक सोलापुरात येऊ लागले. या काळात काही सूतगिरण्या बंद पडल्यामुळे विस्थापित झालेल्या कामगारांना यंत्रमाग व्यवसायाने सावरले. त्यामुळे, केवळ पुलगमच नाही तर इतर कारखान्यांमध्ये देखील जेकॉर्ड चादरी, टर्किश टॉवेल्स तयार होऊ लागले.

पुलगम यांची खासियत असलेली ही जेकॉर्ड चादर सोलापुरात चांगलीच प्रसिद्ध झाली. त्यानंतरच्य काळात पुलगम यांनी एमआयडीसी परिसरात अत्याधुनिक कारखाना उभारला. दाजीपेठेतील शोरूममध्ये त्यांचे मोठे गोडाऊन आज ही आहे. या ठिकाणी खास सोलापुरी चादरी घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र इथल्या खेड्यापाड्यांमधून लोक चादरी खरेदी करण्यासाठी येत असतात.

सोलापुरी चादरीसोबतच बेडशीट, सतरंज्या, टॉवेल्स, नॅपकिन, सूती लुगडी ही उत्पादने देखील देशभरात प्रसिद्ध झाली. केवळ भारतातच नाही तर रशिया, युरोप, श्रीलंका, आखाती देशांमधुनही सोलापुरी चादरीला मागणी येऊ लागली.

विशेष म्हणजे सोलापुरची चादर हे महाराष्ट्रातील जीआय (जियोग्राफिक इंडिकेशन) मिळवणाऱ्या पहिल्या प्रॉडक्टपैकी एक आहे. सोलापुरी चादरीचा ब्रॅंड आज वर्ल्ड फेमस आहे. या चादरीला ब्रॅंड बनवण्यात आणि जगभरात ओळख मिळवून देण्यात पुलगम कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?
PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com