नातीगोती : ‘कुटुंबात आदर, विश्वास हवा’

कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर, विश्वास, जिव्हाळा आणि प्रेम यावरच कुटुंबव्यवस्था अवलंबून असते.
Relations
RelationsSakal
Summary

कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर, विश्वास, जिव्हाळा आणि प्रेम यावरच कुटुंबव्यवस्था अवलंबून असते.

- सुकन्या सुर्वे

कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर, विश्वास, जिव्हाळा आणि प्रेम यावरच कुटुंबव्यवस्था अवलंबून असते. आई-वडील, बहीण आणि मी असं आमचं छोटसं कुटुंब आहे. यात सर्वांत जवळची व्यक्ती आहे ती माझी लहान बहीण. माझा आणि तिचा स्वभाव खूप वेगळा आहे. प्रत्येकाची मन जपून मला अनेक निर्णय घ्यावे लागतात. कधी-कधी मी खूप भोळेभाबडेपणाने निर्णय घेऊन टाकते. तुम्हाला सपोर्ट सिस्टिम हवी असते, जी तुम्हाला तुम्ही आंधळेपणाने घेतलेल्या निर्णयाला जागे करून दाखवून देईल की कदाचित हे चुकूही शकते.

आयुष्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येते, त्यावेळी मला माझ्या बहिणीचा खूप मोठा आधार आणि पाठिंबा असतो. माझ्या प्रत्येक निर्णयाच्यावेळी तिनं मला सांगितलं, की ‘हे बघ तू हा विचार करतेस; पण याच्या मागे खाचखळगा असू शकतो’ आणि तसंच घडलं आहे. मला बऱ्याच वेळेस तिनं सावध केलं आहे आणि मी त्यानुसार निर्णय घेतले आहेत. 

सध्या मी ‘सोनी टीव्ही’वरील ‘वागले की दुनिया’ या मालिकेत विद्या कुलकर्णी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. यात माझी व्यक्तिरेखा अनंत अडचणी पार करून संघर्षावर मात करणारी आहे. माझी भूमिका अनेक स्त्रियांशी संबंधित आहे, ज्या स्वतः काहीतरी करू इच्छितात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात.

मालिकेच्या चित्रीकरणामुळे किंवा बहिणीला काम असल्यामुळे आम्हाला घरात वेळ द्यायला फारसं जमत नाही. पण, आम्ही खूप धार्मिक आणि आध्यात्मिक आहोत. आम्ही वर्षातून काही दिवस ठरवलेले असतात, ज्यावेळी वेळ काढून अक्कलकोटला जातो आणि श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतो. आमच्या गावी दसरा, दिवाळी, दत्तजयंती असे कार्यक्रम असतात. आम्ही सर्व सणांना शक्यतो आवर्जून जातो.

इंडस्ट्रीमध्येही अनेक मुलं-मुली गाव सोडून मुंबईत येतात. एकटी राहतात. अशा वेळेस कुटुंबव्यवस्था किती महत्त्वाची आहे, हे आपल्या लक्षात येतं. आपल्याला भावनिक आधाराची अनेकदा गरज भासते, त्यावेळी आपले आई-वडील आणि इतरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 

मी सर्वसामान्य कुटुंबामधून आली आहे. मला पाहिजे ते करण्याचं स्वातंत्र्य मला लहानपणापासूनच कुटुंबीयांनी दिलं आहे. कोणतं क्षेत्र निवडायचं यापासून ते मनासारखा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्यही मला दिलं आहे. एवढं स्वातंत्र्य मिळतं, त्यावेळी त्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडण्याची हिंमत आपल्यामध्ये होत नाही.

मला आणि माझ्या बहिणीला प्रत्येक निर्णयात आई-वडिलांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. एखादी गोष्ट केल्याशिवाय किंवा एखाद्या निर्णय घेतल्याशिवाय काय चुकतंय आणि काय बरोबर आहे हे समजणार नाही आणि तेच समजण्याचं स्वातंत्र्य आई-वडिलांनी आम्हाला दिलं. त्यांनी इतकं स्वातंत्र्य दिलं आहे, की कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवण्याची गरजच भासत नाही. मोकळेपणा, प्रेम, आदरभाव आणि विश्वास हेच आमच्या कुटुंबाचं महत्त्वाचं वैशिष्ट्यं आहे.

नाती दृढ होण्यासाठी....

  • वयाचा फरक न करता प्रत्येक नात्याचा आदर करा, एकमेकांना प्रेम द्या. दुसऱ्याला जेवढं प्रेम द्याल, तेवढंच प्रेम तुम्हालाही मिळेल.

  • दुसऱ्यासाठी जे काय करणार आहोत, ते निःस्वार्थीपणानं करा.

  • कुणाच्या सुखात सहभागी होता आलं नाही तरी चालेल; मात्र दुसऱ्याच्या दुःखात आवर्जून सहभागी व्हा. अशा प्रसंगी आधार देणं गरजेचं असतं आणि असे प्रसंग आयुष्यभर लक्षात राहणारे असतात. 

  • कोणत्याही नात्यात पारदर्शकपणा असावा. लपवाछपवी केल्यास कधी ना कधी सत्य बाहेर पडतं. त्यामुळे नाती दुखावू शकतात.

  • मोठा प्रसंग आला तरी एकट्यानं निर्णय घेऊ नका. जवळच्या नातेवाईकांना बरोबर घेऊन, विश्वासात घेऊन योग्य निर्णय घ्यावा. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com