
आणि अर्थातच, हे तितक्या सहजासहजी झालं नाही. इथं जात-धर्म-वय असे मुद्दे नव्हते तर चक्क एका तृतीयपंथीशी लग्न करणं त्यांच्यासारख्या पारंपरिक कौटुंबिक पार्श्वभूमीच्या माणसाला अवघड गेलं आणि हे साहजिकच होतं. पण जय माझ्या आयुष्यात आले आणि मी त्यांनी माझा संघर्ष सोपा केला. माझ्या जगण्याला बळ दिलं.
Valentines Day Special : माझ्यासाठी मला स्वतःला स्वीकारण्याचा प्रवासच आधी खडतर होता. वयाच्या 12 व्या वर्षापासून माझा झगडा माझ्याशी, मग कुटुंबियांशी, मग माझ्या आसपासच्या भवतालाशी होता. हे सगळं स्वीकारून मला जगाला ओरडून सांगायचं होतं की, होय, मी पुरुष नाहीय. माझं शरीर पुरुषांचं असलं तरी आतमध्ये एक बाई कैद आहे, आणि मला ती मुक्त करायची आहे. 'माझं पुरुष शरीर, माझं बाईमन!' तरी झगडा मात्र जगाशी, असा हा उरफाटा प्रवास. या वाटेत प्रेम कुठून मिळावं? कळतं वयचं सारं झगड्यात गेलं. पण स्वीकारलं स्वतःला आणि सांगितलं एकदाच ठणकावून जगाला, होय! आता मी बाई आहे.
मला असं वाटलं नव्हतं की मला आयुष्याचा जोडीदार इतका सुंदर आणि मोठ्या मनाचा मिळेल. तृतीयपंथीयाला चार भिंतींच्या आत वापरून फेकून देणारे अनेकजण भेटतील. पण उघडपणे स्वीकारणारे? मला अभिमान आहे माझा जोडीदार माझ्याशी उघड नातेसंबंधात आहे. त्याने मला बायको म्हणून उघडपणे स्वीकारलंय. जय आणि माझी पहिली ओळख फेसबुकवर झाली. मी स्वतःला बाई म्हणून स्वीकारल्यानंतर एका NGO मध्ये काम करायला लागले. 1999 पासूनच मी सामाजिक कार्यात उतरले. जगाला भिडायला सुरवात केली. मी कथ्थक करायचे, आजही करते!
साधारण 2013 सालची गोष्ट. फेसबुकवर मला अनेक रिक्वेस्ट यायच्या. मी तृतीयपंथी असल्याचा स्पष्ट उल्लेख माझ्या प्रोफाइलवर आहे. टाईमपाससाठी म्हणून त्रास द्यायला अनेक रिक्वेस्ट यायच्या. त्यातलीच एक जय यांची असावी, अस समजून मी त्यांना 2 महिने एंटरटेन केलं नव्हतं. माझ्या फेसबुकवर असलेल्या नंबरवरून त्यांनी मला बरेच फोन केले, जे मी टाळायचे. सरतेशेवटी मी त्यांना सांगितलं की मी मुलगी नाहीय, तृतीयपंथी आहे. त्यावर ते मला म्हणाले की हो, मला सगळं काही माहितीय, मला तुमचं सगळं काम माहितीय. मला फक्त तुम्हाला एकदा भेटायचं आहे. त्यानंतर आम्ही एकदा-दोनदा भेटलो आणि ओळख झाली. त्यानंतर ते माझ्या कार्यक्रमांना येऊ लागले. यातून आमची मैत्री वाढली.
एका कार्यक्रमात 'थर्ड जेंडर एम्पावरमेन्ट' विषयावर माझा कथ्थक डान्स होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका तृतीयपंथी माणसाचा स्वतःच्या आयुष्याशी कसा झगडा असतो हे दाखवायचा, त्यात मी प्रयत्न केला होता. तो परफॉर्मन्स पहायला जय आले होते. तो पाहून ते खूपच भावुक झाले. आणि त्यादिवशी त्यांनी मला प्रपोज केलं. माझ्यासाठी अर्थातच हे अनपेक्षित होतं. आपण मित्र आहोत पण मला तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायला आवडेल, असं ते म्हणाले. पण, मी त्यांना तृतीयपंथी असल्याची पुन्हा आठवण करून दिली आणि म्हटलं मी चार भिंतींच्या आत लिव्ह-इन मध्ये अथवा 'टाईमपास' म्हणून राहण्यास तयार नाहीय. तृतीयपंथी व्यक्तीसोबत प्रेमाचं नाटक करून उपभोग घेणारे, अथवा लिव्ह-इन मध्ये राहणारे आणि नंतर सोडून जाऊन लग्न करणारे अनेक जण मी पाहिलेत. आमच्यासोबत सर्रास असं घडतं. यातून अनेक तृतीयपंथीयांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात पण या खिजगणतीतही नाहींयत. पण मला असं माझ्या आयुष्यात काहीही नको होतं. 'मला स्वीकारायचं असेल तर रीतसर माझ्याशी ओपन मॅरेज करावं लागेल' माझ्या या मागणीचा आदर करत त्यांनीही मला स्वीकारलं. आजपर्यंत अनेक तृतीयपंथीयांनी लग्न केलंय पण ते लपूनछपून. म्हणजे ही लग्नं एखाद्या मंदिरात, चार मित्रांसमोर होतात. फॅमिलीला थांगपत्ता नसतो. समाजासमोर जी उघडपणे स्वीकारली जात नाहीत. मात्र मला असं नको होतं. मला ओपन मॅरेज हवं होतं ज्याला त्यांनी होकार दिला. पण जेवढं 'हो' म्हणणं सोपं होतं तेवढं लग्न करणं सोपं नव्हतं!
आणि अर्थातच, हे तितक्या सहजासहजी झालं नाही. इथं जात-धर्म-वय असे मुद्दे नव्हते तर चक्क एका तृतीयपंथीशी लग्न करणं त्यांच्यासारख्या पारंपरिक कौटुंबिक पार्श्वभूमीच्या माणसाला अवघड गेलं आणि हे साहजिकच होतं. यात अधिक भर म्हणजे त्यांचं मूळ 'शर्मा' कुटुंब तर उत्तर प्रदेशातलं. बरेच प्रश्न उपस्थित झाले, संघर्ष झाले पण आमचं प्रेम जिंकलं! घरच्यांना सहमत करण्यात जवळपास 6 महिने गेले आणि यापद्धतीने 28 डिसेंबर 2016 ला एका तृतीयपंथी व्यक्तींचं भारतातील हे पहिलेच 'ओपन मॅरेज' ठरलं...! खरं तर याची आम्हालाही तेंव्हा कल्पना नव्हती. तृतीयपंथी म्हणून माझा माझ्याशी आणि समाजाशी असलेला बराच झगडा खरंतर झाला होता. एका तृतीयपंथी व्यक्तीशी लग्न करायचा निर्णय धाडसी होता. तो घेणं आणि तो निभावणं, यात खरा कस त्यांचा लागला. मला भेटले तेंव्हा ते गुजरातमध्ये नोकरी करायचे. पण लग्नानंतर ते माझ्यासाठी मुंबईत आले.
खरं तर माझ्याशी लग्न केल्यानंतर त्यांचंही आयुष्य बरंच बदललं. लोकांसाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेचा विषय ठरले. कौतुक तर झालंच पण त्यांनी त्रासही सोसला. मला हा माणूस यासाठीच मोठा वाटतो कारण त्यानं माझं बाईपण स्वीकारलं, नव्हे माझं माणूसपण स्वीकारलं. एका तृतीयपंथीयाशी लग्न करतोय म्हणजे नक्की याच्यातच काहीतरी दोष असणार, कमी असणार किंवा हा देखील 'गे' असेल, इथपासून ते हरतर्हेचे टप्पे-टोमणे त्यांनी माझ्या प्रेमाखातर सोसले. आमचं लग्न अगदी पारंपारिक पद्धतीने उघडपणे झालं. आमंत्रण पत्रिका, हळदी, मेहंदी, वैदिक पद्धतीने हे लग्न पार पाडलं. ही साधी गोष्ट निश्चितच नव्हती. तृतीयपंथी म्हणून माझ्या आयुष्याचा संघर्ष सुरू होताच. पण जय माझ्या आयुष्यात आले आणि मी त्यांनी माझा संघर्ष सोपा केला. माझ्या जगण्याला बळ दिलं.
आज त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील मला मोठ्या मनाने स्वीकारलंय. आधी मी एकटी तृतीयपंथी होते मात्र मला आज रक्ताची नाती मिळाली आहेत. आज मी कुणाची चाची आहे, भाभी आहे. आणि यांच्या नजरेत कुठेच माझ्याबद्दल वेगळा भाव नसतो, इतकं मी आता त्यांची झालीय. प्रत्येक मुलीच्या स्वप्नात येतं की एखादा राजकुमार घोड्यावरून येईल, तो घेऊन जाईल. मलाही लहानपणी असंच वाटायचं. मात्र मग कळायचं की आपण तर मुलगा आहोत. तर हे असं काही घडणार नाही. मात्र, माझं आयुष्य सुखद वळणावर आलं, ते जय शर्मा यांच्यामुळेच! आयुष्याच्या एका वळणावर 'प्रकाश'ची 'माधुरी' झाली. मात्र आयुष्यातील माधुर्य वाढलं ते आमच्या प्रेमामुळे!
आज मी अनेक सामाजिक कार्यात भाग घेते. आमच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे महाराष्ट्रात LGBTQ कम्युनिटीतील जे काही मोजके कार्यकर्ते आहेत त्यातील मी एक आहे. मी राजकारणात पण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी जनरल सेक्रेटरी आहे. 'द्या टाळी' नावाची माझी स्वतःची सामाजिक संस्था आहे, जिच्यामार्फत तृतीयपंथीयांच्या विकासासाठी काम करत जातं. 2018 मध्ये मी भारतातील पहिली LIC एजंट झाले. सांगायचा उद्देश असा की, आम्हीदेखील कर्तृत्व गाजवू शकतो. आम्हाला तुमच्या स्वीकाराची आणि प्रेमाची गरज आहे आणि आज माझ्या या नात्यामुळे, प्रेमामुळे मला उंच उंच उडायला आणखी बळ मिळतंय. विशेष म्हणजे आमच्या लग्नानंतर अशाप्रकारे खुलेपणाने 8 लग्नं झाली. याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या एका धाडसामुळे आज वाट मोकळी झालीय. पण माझा लढा संपलेला नाहीय. भारतात अजूनही तृतीयपंथीयांच्या लग्नाला स्थान नाहीय. माझं लग्नाची नोंद मला तृतीयपंथी म्हणून हवीय. जोपर्यंत एका तृतीयपंथीला 'तृतीयपंथी'म्हणून मॅरेज सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील.
- शब्दांकन : विनायक होगाडे