सतत हेडफोन वापराने श्रवणशक्तीला धोका

हेडफोन किंवा इअरफोन घालून कधी गाणी, कधी फोन कॉल्स तर, कधी व्हिडिओ बघत तुम्ही तासन् तास काम करता का?
headphones
headphones Sakal

पुणे : हेडफोन किंवा इअरफोन घालून कधी गाणी, कधी फोन कॉल्स तर, कधी व्हिडिओ बघत तुम्ही तासन् तास काम करता का? तसे करत असाल तर तुम्हाला श्रवणदोष होण्याची शक्यता आहे. या सवयी बदला किंवा हेडफोन घालून काम करण्याच्या वेळा तरी कमी करा, असा सल्ला ऑडिओलॉजिस्टने दिला आहे.

आयुष्यभर प्रत्येक नागरिकाची श्रवणक्षमता चांगली राहावी, या बाबत जागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) ३ मार्च हा जागतिक श्रवण दिन म्हणून घोषित केला आहे. त्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी ऑडिओलॉजिस्टने ही माहिती दिली.

वर्ल्ड हिअरिंग रिपोर्ट २०२१ नुसार १.१ अब्ज तरुणांना दीर्घकाळपर्यंत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे कायमस्वरूपी श्रवण दोष असण्याचा धोका आहे, असे भारती विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ ऑडिओलॉजी अँण्ड स्पीच लँग्वेज पॅथोलॉजि’मधील सहायक प्राध्यापिका श्वेता देशपांडे आणि अनुज कुमार न्यूपाने यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आवश्यकतेनुसार कमी वेळासाठी हेडफोन किंवा इअरफोनचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

कानाची रचना

जे आपल्याला आवाज ऐकण्यास मदत करतात, म्हणजे बाह्य कान, मध्य कान, आतील कान आणि श्रवणविषयक मज्जातंतू (ऑडिटरी नर्व्ह) ह्यांना वेगवेगळ्या कारणांनी इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली ऐकण्याची क्षमता धोक्यात येऊ शकते.

लक्षणे

१. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, रेस्टॉरंट किंवा चहाच्या दुकानांसारख्या ठिकाणी संवाद साधण्यास अडचण

२. टेलिव्हिजन किंवा रेडिओ ऐकताना अनेकदा आवाज वाढवण्यास सांगणे

३. शांत स्थितीत किंवा फोनवर, बोलणे समजून घेण्यात अडचण

अशी घ्या काळजी

- घरी, मैफिलीत, पार्ट्यांमध्ये किंवा वैयक्तिक डिव्हाइसवर संगीत ऐकताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

- सतत कानदुखी, कानातून पाणी येणे किंवा कानाशी संबंधित इतर कोणत्याही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

- कानातील मळ काढण्यासाठी क्लिप, टूथपिक्स, काड्या, कॉटन बड घालणे टाळावे

‘‘श्रवण दोषाचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्यांचा वापर केला जातो. या चाचण्या योग्य ऑडिओलॉजिस्टद्वारे, रुग्णालय किंवा इतर आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये केल्या जातात. कायमस्वरूपी श्रवण दोषाचे निदान झाल्यास, ऑडिओलॉजिस्ट श्रवण यंत्र, कॉक्लियर इम्प्लांट, बोन अंकर्ड हिअरिंग एड आणि सहाय्यक ऐकण्याची उपकरणे यांसारखी यंत्रे देतात. त्या व्यक्तीला चांगले ऐकण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.’’

- श्वेता देशपांडे, सहायक प्राध्यापिका, भारती विद्यापीठ

‘‘नियमित श्रवण चाचण्यांमधून ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे निदान करता येते. त्यानंतर मोठ्या आवाजाच्या वातावरणात ‘इअर प्रोटेक्टिव्ह डिवाइस’ म्हणजे कानातले प्लग,

कानातले मफ्स अशा साधनांचा वापर करून ऐकण्याचे संरक्षण करता येते.’’

- अनुज कुमार न्यूपाने, सहायक प्राध्यापक

श्रवणदोषाची कारणे

  • मोठे आवाज करणारे यंत्र किंवा उद्योगधंद्यांच्या ठिकाणी सतत काम करणे

  • हेडफोन किंवा इयरफोनद्वारे संगीत मोठ्या आवाजात जास्त वेळ ऐकणे

  • स्फोटक आवाज

  • कानाला उपचार न घेतल्याने झालेला जंतूसंसर्ग

देशातील स्थिती

श्रवणशक्ती कमी झालेल्यांची संख्या ६.३ कोटी

यांपैकी

  • प्रौढ व्यक्तींमध्ये बहिरेपणाचे प्रमाण ७.६ टक्के

  • लहान मुलांमध्ये बहिरेपणाचे प्रमाण २ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com