Valentine Day Special : प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे...

अरुण सुर्वे
Sunday, 14 February 2021

तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन डेची खूपच क्रेझ आहे. प्रेम व्यक्त करण्याचा त्यांच्यासाठी हा स्पेशल दिवस असतो. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी यांच्यावरही आपलं तितकंच प्रेम असतं. प्रेम हे एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता ते निरंतर असावं. त्याला वेळ, काळाचे बंधन नसावे. आपण कुणावरही मनसोक्त प्रेम करू शकतो, असंच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचंही म्हणणं आहे.

तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन डेची खूपच क्रेझ आहे. प्रेम व्यक्त करण्याचा त्यांच्यासाठी हा स्पेशल दिवस असतो. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी यांच्यावरही आपलं तितकंच प्रेम असतं. प्रेम हे एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता ते निरंतर असावं. त्याला वेळ, काळाचे बंधन नसावे. आपण कुणावरही मनसोक्त प्रेम करू शकतो, असंच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचंही म्हणणं आहे.

पहिला व्हॅलेंटाइन वीस वर्षांपूर्वी
खरं सांगायचं तर, ज्यावेळी व्हॅलेंटाइन डेबद्दल माहिती झाली, त्यावेळी माझ्या खिशात फारसे पैसे नव्हते आणि मला गर्लफ्रेंडही नव्हती. मला आजही आठवतं, आम्ही पहिला व्हॅलेंटाइन डे २००१ रोजी साजरा केला अन तोही माझ्या बायकोबरोबर. ती तेव्हा माझी गर्लफ्रेंड होती. त्यावेळी मी तिला फुलं, चॉकलेट्स, गिफ्ट दिलं. या गोष्टीला २० वर्ष झाले. विशेष म्हणजे ते गिफ्ट आजही बायकोनं जपून ठेवलं आहे. आता हा दिवस फारसा साजरा करत नाही. पण, प्रेम हे रोजच साजरे करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी एकच दिवस नको. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला कधीही चॉकलेट्स, फुले देऊ शकतो. त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करू शकतो. त्यामुळे एका दिवसात अडकून न पडता प्रेमाचा हा दिवस रोजच साजरा केला पाहिजे. तरुणाई त्यांच्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. खरंतर हा दिवस रोजच साजरा केला पाहिजे. हा दिवस फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्यापुरता मर्यादित नको. यात आपले कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि नातेवाइकांनाही सहभागी करू घ्यावे. - अभिनेता श्रेयस तळपदे 

अमेरिकेत करणार जल्लोष
व्हॅलेंटाइन डेची आठवण म्हणजे मी आणि माझा नवरा नीरज, आम्ही दोघं लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदाच भारतामध्ये भेटलो होतो, तो दिवस होता १४ फेब्रुवारी. खरंतर हा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आणि अविस्मरणीय आहे. पण या वर्षी मी १४ फेब्रुवारीला अमेरिकेत असणार आहे. त्यामुळे आम्ही या दिवशी एकत्र असू. मात्र त्यासाठी वेगळे काही प्लॅनिंग केले नाही. आम्ही खूप काळाने सोबत असणार आहोत, हेच आमच्या एकमेकांसाठी खूप मोठं गिफ्ट आहे. हा दिवस तरुणाईसाठी पर्वणीचा असतो. त्यामुळे सर्व तरुणाईला व्हॅलेंटाइन डेच्या माझ्याकडून शुभेच्छा.
- अभिनेत्री मृणाल दुसानीस 

तरुणाईसाठी रोमँटिक गाणं
मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाइन डे हे तिन्ही दिवस वर्षभर साजरे केले पाहिजेत. कारण प्रेम ही एका दिवसापुरती मर्यादित ठेवणारी गोष्ट नाहीये. खरंतर मला व्हॅलेंटाइन डेचं स्वरूप आवडत नाही. त्यामुळे मी हा दिवस साजरा करत नाही. मात्र लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याबरोबर अगदी साधेपणाने हा दिवस साजरा केला. प्रेम हे आई-वडील, बहीण-भाऊ, नवरा किंवा प्रियकरासोबत व्यक्त केलं पाहिजे, हे माझं साधं गणित आहे. काही जण खूप छान प्रकारे हा दिवस साजरा करतात. त्यात आततायीपणा नसतो. विशेष म्हणजे मी या दिवशी कुठलंतरी छानसं गाणं तरुणाईसाठी घेऊन येते. या दिवशी वातावरण खूपच रोमॅंटिक असतं. त्यामुळे यंदा मी रोमॅंटिक गाणं तयार केलं आहे. हे गाणं तरुणाईला नक्कीच आवडेल आणि त्याचा त्यांना आनंद घेता येईल, याची मला खात्री आहे. - गायिका सावनी रवींद्र

फॅन्सकडून मिळणार प्रेम
खरंतर व्हॅलेंटाइन डे आम्ही कधीच साजरा केला नाही. मी आणि प्रिया एकमेकांवर खूप प्रेम करतो. त्यामुळे प्रेमाचे ३६५ दिवस असले पाहिजेत, त्यासाठी एकच दिवस नको. माझं जसं प्रियावर प्रेम आहे, त्याचप्रमाणे कामावरही नितांत प्रेम आहे. उद्याचा व्हॅलेंटाइन डे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण उद्या माझ्या नाटकाचा प्रयोग आहे. मला जे काम करायला आवडतं, ते त्या दिवशी मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. कारण उद्या मला माझ्या चाहत्यांना भेटता येणार आहे. त्यांच्याकडून मला प्रेमही मिळणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी असेन, यापेक्षा आनंदाचा आणि प्रेमाचा दिवस कोणता असू शकतो. फॅन्सकडून मिळणारा आनंद आणि प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. - अभिनेता उमेश कामत 

वाटेल तेव्हा व्यक्त व्हा
व्हॅलेंटाइन डे माझ्यासाठी खूपच स्पेशल  आहे. कारण हा दिवस मी माझ्या जवळच्या व्यक्तींसाठी देतो. ज्या वेळी मी कॉलेजला होतो, त्या वेळी मुलं आपल्या गर्लफ्रेंडला फुलं देत असतं. पण मी हा दिवस माझी आजी आणि आईबरोबर साजरा करत होतो. त्यावेळी आईला किंवा आजीला गुलाबाचं फूल किंवा हार्ट असलेलं चित्र काढून देत होतो. खरंतर तर हा दिवस दररोजच साजरा व्हायला पाहिजे. आपल्याला ज्या वेळी व्यक्त व्हावं वाटतं, त्या वेळेस लगेच बोललं पाहिजे. त्यासाठी व्हॅलेंटाइन डेची गरज कशाला. मला ज्या वेळी बोलायचं असतं, त्या वेळी मी लगेच बोलून जातो. मी माझ्या आई-आजी किंवा प्रेयसीबरोबर माझ्या मनातील भावना केव्हाही व्यक्त करू शकतो. आपलं मन जे सांगतं, तेच आपण करावं. 
- अभिनेता शिव ठाकरे 

दररोज एन्जॉय करा
खरंतर सध्याचं युग खूपच धावपळीचं आहे. प्रत्येकाला रोज काही ना काही कसरत करावी लागते. त्यातून जो आनंद मिळतो, तो खूप महत्त्वाचा असतो. खरंतर प्रेमाचा दिवस फक्त एकच असू शकत नाही, याच दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला फूल, फुगे, चॉकलेट देणे किंवा फिरायला नेणे म्हणजे व्हॅलेंटाइन डे साजरा करणे नव्हे. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर कधीही मनसोक्त फिरू शकतो. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधू शकतो. दररोजच एन्जॉय करा. वाईट सवयी सोडा. आपल्या कुटुंबीयांना वेळ द्या. त्यात आपलं प्रेम व्यक्त होऊ शकतं. कारण आपल्याला दररोजच व्यक्त व्हावं लागतं आणि त्यातूनच आपल्या भावना समजतात.
- अभिनेता सिद्धार्थ चांदेकर 

भडकपणा नको
प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेमाला एखाद्या चौकटीत अडकून ठेवणं योग्य नव्हे. आपण आपल्या आई-वडिलांवर, भावा-बहिणींवर किंवा आपला नवरा अथवा प्रियकरावरही प्रेम करू शकतो. खरंतर मी अजूनही व्हॅलेंटाइन डे साजरा केला नाही. पण सर्वांवर प्रेम करते. सर्वांना आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील असते. माझ्यासाठी प्रत्येक दिवस प्रेमाचा असतो. त्यामुळे मी सेटवरही प्रेमानेच राहते. तरुणाईने हा दिवस अगदी साधेपणाने साजरा करावा. त्यात भडकपणा तर अजिबात नको. कारण हा दिवस प्रेमाचा आहे आणि तो वर्षभर साजरा करत राहणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.
- अभिनेत्री अस्मिता देशमुख 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Day Special Love