गुडबाय २०२३ वेलकम २०२४

नुकतंच २०२३ संपलं. अनेक अर्थांनी चढउतार, मानसिक आंदोलनं या वर्षात येऊन गेली!
2024
2024

- डॉ. विद्याधर बापट

नुकतंच २०२३ संपलं. अनेक अर्थांनी चढउतार, मानसिक आंदोलनं या वर्षात येऊन गेली! काही जणांसाठी वर्ष छान गेलं असणार, काही जणांसाठी सो सो, तर काही जणांसाठी चक्क वाईट. हे असं तिन्ही वाटण्यामागे प्रत्यक्ष वास्तवात घडलेल्या चांगल्या, वाईट घटनांबरोबर आपला घटनांकडे, व्यक्तींकडे आणि एकूणच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जबाबदार असतो.

सध्याचे २०२४ आणि त्यापुढील प्रत्येक वर्ष स्वस्थ्य आणि आनंदात जाण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यादृष्टीनं आपल्या मनाचं सकारात्मक प्रोग्रॅमिंग करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असं आहे.

माणसाचं आयुष्य जन्म आणि मृत्यू या दोन अटळ घटनांमधला कालावधी. यामध्ये माणूस मन:शांती आणि आनंद या दोन गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत राहतो. कालचक्र पुढं जात राहतं. क्षणांची मिनिटं होतात, मिनिटांचे तास, तासांचे दिवस, दिवसांचे महिने आणि महिन्यांचे वर्षे.

आपण काही काळासाठी किंवा कालचक्राच्या गणितात अगदी थोड्या काळासाठी या ग्रहावर आलो आहोत. संपूर्ण वैश्विक अभियांत्रिकीकडे पाहता किंवा असीम विश्वाच्या अखंडित प्रक्रियेत आपलं अस्तित्व नगण्य तरीही अतिशय महत्त्वाचं आहे.

आपण इथं आलो आहोत, अस्तित्वात आहोत हे सत्य आहे. आपल्या इथल्या ट्रीपमधील प्रत्येक क्षण आनंदात जगायचा असल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं आवश्यक आहे. पुढील गोष्टी आपल्याकडे असतील तर मानसिक आरोग्य चांगलं आहे.

सकारात्मक भावना

  • नोकरी, व्यवसाय किंवा अभ्यास, छंद इत्यादींमध्ये रस असणे

  • स्वत:शी आणि सर्वांशी चांगलं नातं असणं

  • आयुष्य अर्थपूर्ण व उद्दिष्टपूर्ण जगण्याचा प्रयत्न असणं

  • पुरेपूर आत्मविश्वास, आत्मसन्मान

  • भावनात्मक समतोल असणं म्हणजेच पर्यायानं मन:शांती आणि स्थिरता

  • भविष्याविषयी आणि जीवनाविषयी सकारात्मक भावना

  • कुठल्याही विपरीत परिस्थितीतून पुन्हा सावरण्याची, उभं राहण्याची क्षमता

  • प्रत्येक क्षणी उत्साही राहून प्रत्येक क्षण रसरसून उपभोगण्याची क्षमता

यातील प्रत्येक गोष्ट येणाऱ्या वर्षात मी मिळवायला हवी. हे कुणालाही शक्य आहे. त्यासाठी दोन गोष्टी साधायलाच हव्यात, स्वत:त सकारात्मकता रुजवणं आणि ताणतणावाचं सुयोग्य व्यवस्थापन करणं.

सकारात्मक दृष्टिकोन

आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्ण सकारात्मक आणि खेळकर बनवावा लागेल. हातात असणाऱ्या व नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. हातात असलेल्या गोष्टी आणि कर्तृत्व कोणत्या क्षेत्रात असू शकते, ते पूर्ण करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे.

नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या गोष्टींचा शांतपणे अहंकार बाजूला ठेवून स्वीकार करता यायला हवा. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्यास भरभरून आनंद, सुख, मन:शांती आणि यश मिळत जातं.

सकारात्मक दृष्टिकोनामुळे जीवनाकडे पाहताना नेहमी त्यातली चांगली बाजू पाहता. उत्साही राहता व चांगलं तेच घडेल अशा धारणेने जगता. सकारात्मक दृष्टिकोन आनंदी, दीर्घायुषी व्हायला मदत करतो.

सकारात्मक दृष्टिकोनामध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. सर्जनात्मक आणि सजगतेने विचार, उत्साह, आनंदी राहण्याची आस, ध्येय ठरवणे आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता, स्वत:ला व इतरांना प्रोत्साहित करणे, अपयश आलं तरी यशासाठी प्रयत्न करत रहाणे,

स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असणे, स्वत:तल्या कमतरतांची जाणीव असणे व त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे, विनाकारण भूतकाळात न रमता वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात काय करू शकू, याचा विचार करणे. समस्यांमध्ये अडकून न राहता उपाय शोधणे. ताणतणावाच्या व्यवस्थापनाबाबत पुढील भागात माहिती घेऊयात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com