आनंदाचा ‘कौतुक’मंत्र

व्हॉट्सॲप नोटिफिकेशन आलं आणि मी सवयीनं मेसेज बघितला. माझ्या शेजारणीचा मेसेज होता.
happiness
happinesssakal

- डॉ. समिरा गुजर-जोशी

व्हॉट्सॲप नोटिफिकेशन आलं आणि मी सवयीनं मेसेज बघितला. माझ्या शेजारणीचा मेसेज होता. होळीसाठी आईनं पुरणपोळ्या केल्या होत्या, त्या आवडल्या हे सांगण्यासाठी तिनं मेसेज पाठवला होता. तिनं किती मनापासून लिहिलं होतं हे तिच्या शब्दातून कळत होतं. ‘काकूंना माझ्याकडून खूप थॅंक्स सांग. इतक्या मऊसुत झाल्या होत्या पुरणपोळ्या. घास अगदी तोंडात विरघळत होता.

किती लक्षात ठेवून काकू पाठवतात खाऊ माझ्यासाठी. मला माझ्या आईचीच आठवण आली. तुझेही आभार. तुझ्या इतक्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून तू दरवेळी खाऊ पोचता करतेस.’ मी लगेच आईला मेसेज फॉरवर्ड केला. आईचं उत्तर आलं, ‘असं कौतुक करता यायला हवं.’ मी तिला म्हटलं, ‘तू कौतुक करण्याचं कौतुक करते आहेस?!’ ती म्हणाली, ‘मग करायलाच हवं. सगळ्यांना नाही येत कौतुक करता...तीही एक कला आहे.’

हा विचार मग माझी पाठ पुरवून राहिला. छान कौतुक करणं म्हणजे नेमकं काय असावं? ही खरंच एक कला किंवा किमानपक्षी कौशल्य आहे का? मग ते कौशल्य आत्मसात करता येतं का? दुसऱ्याचं कौतुक करून मला काय फायदा?... असे अनेक उपप्रश्न मनात रुंजी घालू लागले.

पहिली गोष्ट लक्षात आली की कौतुक खरंखुरं, मनापासून असायला हवं. ते उगीच केलेलं किंवा तोंडदेखलं असलं, की कळतं. दुसरी गोष्ट लक्षात आली, की ते मोघम असण्यापेक्षा नेमकं असेल, तर अधिक भावतं. म्हणजे अगदी सोशल मीडियावर पाहा ना. नुसत्या लाइक किंवा पुढे जाऊन ‘ऑसम’/ ‘अमेझिंग’पेक्षा जर कुणी दोन ओळी लिहून कौतुक केलं असेल, तर फार भारी वाटतं.

एक छोटीशी गोष्ट आहे; पण बघ पटते का? कुणी आपलं नाव घेऊन कौतुक केलं, की छान वाटतं. कारण मुळात आपण कुणाचं तरी कौतुक करतो, तेव्हा त्या व्यक्तीचं अस्तित्व अधोरेखित करतो. घरातल्या गृहिणीची बहुतेकदा तक्रार हीच असते, की माझं कुणाला कौतुक नाही! मग आपण म्हणतो, ‘‘तू छान करतेस सगळं, नेहमीच.

आता रोज काय सर्टिफिकेट द्यायचं?’ तेव्हा तिला कदाचित सुचवायचं असतं का, की माझं अस्तित्व डावललं जातं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? आणि कौतुक केवळ शब्दांतून होतं असं नाही. ते छोट्या छोट्या कृतीतूनही होऊ शकतं; पण सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न हा, की दुसऱ्याचं कौतुक करुन मला काय फायदा? तर हा मला लागलेला नवीन शोध आहे आणि तोही अगदी वैज्ञानिक.

सहसा आपण कौतुक केल्यावर ज्याचं कौतुक होतं आहे, त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करतो. (आणि तो अतिशय सकारात्मक होतो. जिथं कामासाठी पगार मिळतो अशा कॉर्पोरेट वर्ल्डमध्येसुद्धा ‘appreciation matters’; मग नात्यांमध्ये तर ते महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. ‘कौतुक करू नये कारण समोरचा शेफारतो’, हा शोध ज्यानं लावला त्याला धन्यवाद, की त्याच्या कृपेने लोक कौतुक करण्यात फारच कंजूष झाले आहेत!)

विज्ञान सांगतं, की कौतुक केल्यानं ज्याचं कौतुक होते तो तर सुखावतो; पण जो कौतुक करतो त्याचा मेंदूही सुखावतो. म्हणजे कौतुक करण्याची सवय आपण लावून घेतली, तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतं. एक प्रयोग म्हणून आपण आजूबाजूच्या माणसांचं कौतुक करायचं ठरवलं तर? त्या नजरेनं बघायला लागलो, तर प्रत्येकात काही ना काही गुण सापडतीलच आणि आपण त्यांना ते शब्दांत सांगितले तर?...

माझाच एक अनुभव सांगते. आमच्या बिल्डिंगचा कचरा गोळा करणारे काका रोज सकाळी साडेसातच्या ठोक्याला येतात आणि कचरा दिला नाही तर दोन वेळा तरी बेल वाजवतात. इतक्यात त्यांना मी कचरा देताना हसून म्हटलं, ‘काका, तुमची वेळ कधीच चुकत नाही हां. घड्याळ लावून घ्यावं इतक्या अचूक वेळेवर येता तुम्ही.’ त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं.

त्या दिवसापासून रोज ते मला हसून ‘गुड मॉर्निंग’ म्हणतात. का माहीत नाही; पण त्यांचं हसू पाहिलं, की माझ्या दिवसाची सुरवात छान होते. किंवा सांगू का, कौतुक करण्याची गंमत ना मेलडी चॉकलेटच्या जाहिरातीसारखी आहे, ‘मेलडी खाओ और खुद जान जाओ.’ तुझा काय अनुभव आहे मैत्रिणी? नक्की सांग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com