संयम जिभेवरचा!

जीभ हा एकच असा अवयव आहे की जो ज्ञानेन्द्रियही आहे आणि कर्मेन्द्रियही आहे.
Words are weapons
Words are weaponssakal
Summary

जीभ हा एकच असा अवयव आहे की जो ज्ञानेन्द्रियही आहे आणि कर्मेन्द्रियही आहे.

जिभेचे चोचले, जिभेला हाड, उचलली जीभ लावली टाळ्याला असे जिभेशी संबंधित अनेक वाक्प्रचार प्रचलित आहेत. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा असे म्हणताना शस्त्र हा शब्द खरे तर जिभेलाच उद्देशून वापरलेला असतो. तसेच जीभ हा एकच असा अवयव आहे की जो ज्ञानेन्द्रियही आहे आणि कर्मेन्द्रियही आहे.

कारण रसनेन्द्रिय जिभेच्या आधाराने राहते आणि बोलण्याचे काम करणारे कर्मेन्द्रियसुद्धा जीभच असते. त्यामुळे आहार सेवन असो किंवा बोलणे असो, आरोग्य टिकवण्यासाठी जिभेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होय. जीवन सुखी करण्यासाठी असणाऱ्या आयुर्वेदशास्त्रात काय खावे, काय प्यावे, काय नियम पाळावेत यांचे जसे मार्गदर्शन केलेले आहे तसेच जिभेवर, तिच्या बोलण्याच्या शक्तीवर कसे नियंत्रण मिळवायचे याबद्दल मार्गदर्शन व्याकरणशास्त्रात केलेले आहे.

पण प्रत्यक्षात मात्र चवीच्या किंवा जिभेच्या आहारी गेल्यामुळे किंवा जिभेवरचा ताबा सुटल्यामुळे भलतेच काहीतरी बोलून गेल्याने आरोग्य अडचणीत आल्याचे दिसते. तारेवरची कसरत म्हणतात तशी ही जिभेवरची कसरत आहे. जीभ ही मनुष्यमात्राला चुकीच्या वा चांगल्या मार्गावर नेणारी ठरू शकते. काय, कुठे, कसे व किती बोलावे हे समजणारी माणसे जीवनात यशस्वी होऊ शकतात. मन जिभेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करते.

परंतु या दोघांच्या सुंदोपसुंदी भांडणात बहुतेक वेळा जीभच यशस्वी ठरते. एखादी वस्तू आवडत नाही वा आवडते असे जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा खरोखर ही आवड-निवड मनाने ठरविलेली असते का तो निर्णय जिभेने घेतलेला असतो हे कळणे सोपे नसते. म्हणूनच कैकदा असे दिसते की औषध घेतल्यास आपण बरे होणार हे माहीत असूनही जीभ ते औषध गिळू देत नाही. काही वेळेला असे दिसते की प्रकृतीला मानवणाऱ्या गोष्टी जिभेला आवडत नाहीत व जिभेला आवडणाऱ्या गोष्टी प्रकृतीला मानवत नाहीत.

कधीकधी जिभेला आवडणाऱ्या गोष्टी प्रकृतीला मानवत असल्या तरी मिळत नाहीत किंवा मिळाल्या तरी त्यांच्यात दोष असतात. अशा आहाराच्या सेवनामुळे तसेच खाण्या- पिण्याबाबत अति आग्रहामुळे आरोग्यावर अत्याचार होऊ शकतो.

आहारावर नियंत्रण ठेवणे ही गोष्ट जणू दोन राष्ट्रांमधल्या सीमारेषेवरील नियंत्रणासारखी असते. शेजारच्या देशाशी युद्ध चालू नसले तरी जसे सतत जागरूक राहावे लागते तसे प्रकृती सुदृढ असताना, आजारपण नसताना आहाराच्या सीमारेषा डोळ्यात तेल घालून सांभाळाव्या लागतात. अन्यथा ‘कशासाठी पोटासाठी व दोन घासांसाठी’ असे म्हणता म्हणता आरोग्याची गाडी रुळावरूनकेव्हा घसरली हे लक्षात येत नाही.

चांगल्या किंवा वाईट आहाराची सीमारेषा मुळात स्थळ, काळ, दिवस, रात्र, ऋतुमान आणि व्यक्ती या सर्वांनुसार बदलत असल्याने ती निश्र्चित ठरविणे खूप अवघड असते. आणि जरी या सीमारेषा आखल्या गेल्या तरी त्या सांभाळण्यासाठी कुशल वैद्याची व आप्तांची खूप गरज लागते. कारण प्रेमाचा रस्ता पोटातून जातो असे वाटल्यामुळे घरच्या मंडळींनी सतत काही ना काही करून खाऊ घालायचे ठरविले तर प्रकृतीचे काही खरे नाही.

जिभेचे दुसरे काम म्हणजे बोलणे. यादृष्टीनेही ‘जिभेवर संयम’ ठेवता येणे आवश्यक होय. काय बोलावे आणि किती बोलावे या संबंधात आयुर्वेदाने सांगितलेले आहे, ‘परुषस्यातिमात्रस्य सूचकत्यानृतस्य च। वाक्यस्याकालयुक्तस्य धारयेत्‌ वेगमुत्थितम्‌॥....चरक सूत्रस्थान.’ दुसऱ्याला दुःख देईल, खुपेल असे बोलू नये, अतिप्रमाणात, सतत बडबड केल्याप्रमाणे बोलत राहू नये, खोटे बोलू नये, चुकीच्या वेळी बोलू नये, दुसऱ्याची चहाडी करणारे बोल बोलू नये. बोलणे हे थकवणारे असते, सातत्याने किंवा अतिप्रमाणात बोलणे हे रोगालाही कारण ठरू शकते.

कैक वेळा बडबड करणाच्या नादात मनुष्य चुकीचे बोलून गेला की नंतर त्याचे खूपच दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. तेव्हा खाणे व बोलणे या दोन्ही दृष्टीने जिभेवर संयम ठेवणे आवश्यक होय. पण असा संयम ठेवणे सोपे नाही हे सुद्धा खरेच आहे. त्यातल्या त्यात शारीरिक पातळीवरचा संयम ठेवणे एक वेळ सोपे समजता आले तरी मनावरचा, विचारांवरचा संयम हा खूपच अवघड असतो.

रोगाचे मुख्य कारण प्रज्ञापराधात म्हणजे चुकीच्या विचारात असते हे आयुर्वेदातले एक महत्त्वाचे सूत्र या ठिकाणी समजून घ्यायला लागते आणि त्यादृष्टीने चांगले विचार, वाईट विचार व त्यानुसार करायचा योग्य आचार हा व्यवस्थित ठरवून घ्यावा लागतो. अर्थात चांगल्या-वाईट विचारांची सीमारेषा ठरविणेही खूप अवघड असते. यात काय चुकले वा यात काय वाईट आहे याचे उत्तर अनेक लोक जन्मभर शोधत बसतात.

गाईच्या मागून येणाऱ्या कसायाला गाय कुठे गेली हे सांगितले तर गाय मरेल व चुकीच्या दिशेला गेली असे सांगितले तर खोटे बोलण्याचे पाप लागेल या संभ्रमातून बाहेर पडणे जसे अवघड असते तसे बऱ्याचदा आपल्याला काय करायला हवे हे कळत नाही आणि काहीही केले तरी मनाचे पूर्ण समाधान होऊ शकत नाही.

एक गोष्ट मात्र निश्र्चित की विचार या शब्दातच आचार असल्यामुळे जो आचार स्वतःलाही करता येईल त्यालाच विचार म्हणावे लागेल. याचाच अजून एक अर्थ असा की एखादी कल्पना हा प्रत्येक वेळी ‘विचार’ होऊ शकणार नाही. विचारांची खरी सीमारेषा ठरविण्यासाठी शास्त्रवचन, आप्तवचन, संतवचन यांचा आधार घ्यावा लागतो व या सीमारेषा सापडल्या तर केवळ आरोग्य नव्हे तर स्वार्थ व परमार्थ साधला जाऊन परमशांती मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com