कामाचं ‘तंत्र’

काल शेवटी dermatologist कडे जाण्यासाठी वेळ मिळाला; पण फोन केल्यावर कळलं की माझी नेहमीची डॉक्टर सुट्टीवर होती.
कामाचं ‘तंत्र’

- डॉ. समिरा गुजर-जोशी

काल शेवटी dermatologist कडे जाण्यासाठी वेळ मिळाला; पण फोन केल्यावर कळलं की माझी नेहमीची डॉक्टर सुट्टीवर होती. दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळत होती. म्हटलं, हरकत नाही. उपचारासाठी आणखी उशीर नको. नवीन डॉक्टरला भेटायचं असलं, की आपण होतो तेवढी नर्व्हस होऊन क्लिनिकमध्ये शिरले. डॉक्टर आत बसलेले दिसले. आधी त्यांनी कागद पुढे ओढले आणि थेट प्रश्न विचारायला सुरवात केली.

मी फोन सायलेंट मोडवर टाकत पर्समध्ये ठेवत होते हे त्यांनी पाहिलं, म्हणाले, ‘तो बाहेरच ठेवा. कॅमेरा सुरू करा आणि माझ्याकडे द्या.’ मग त्यांनी पटकन माझा फोन घेऊन माझ्या चेहऱ्याचे पुढून आणि चेहऱ्याच्या दोन बाजूने फोटो काढले. त्यांचं हे रुटीन असावं. ‘हे फोटो जपून ठेवा. पुढे लागतील,’ त्यांचे शब्द कानावर आले. मग त्यांनी पेन खाली ठेवलं आणि ‘बोला’ म्हणाले.

मी माझी समस्या सांगितली. त्यांनी काही अधिकचे प्रश्न विचारून माझा व्यवसाय, त्यासाठी त्वचेचं आरोग्य कसं महत्त्वाचं आहे, माझा आहार इत्यादी गोष्टी विचारल्या. मग पुन्हा त्यांच्या मोडमध्ये जात म्हणाले, ‘‘व्हिडिओ करा.’’ मला क्षणभर काही कळलं नाही. ‘मी सूचना देतोय त्या रेकॉर्ड करा म्हणजे पुढे शंका आली, तर तिचं समाधान लगेच होईल. काही गोंधळ व्हायला नको. त्यातून काही अडलं तर फोन करा.’

मग त्यांनी prescription लिहिताना ते समजावून सांगायला सुरवात केली. मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतेच. मला म्हणाले, ‘हे क्रीम चेहऱ्याला लावण्यासाठी.’ त्यांनी हाताचा तळवा पुढे धरला. ‘हातावर चार वेळा क्रीम पंप करायचं. सरळ रेषेत चार ठिपके क्रीम हवे.

पहिला ठिपका कपाळाच्या भागावर, दुसरा एका गालावर, तिसरा दुसऱ्या गालावर, चौथा ज्या ठिकाणी जास्त acne आहे तिथे.’ फॉलोअपची तारीख सांगून ‘या’ म्हणाले. त्यांच्या या कार्यशैलीनं मला पुरतं गारद केलं. पेशंटला सूचना रेकॉर्ड करून सांगण्याची सिस्टम आवडलीच; पण चेहऱ्याला क्रीम लावण्याचीही सिस्टम असू शकते हे तर नव्यानंच कळलं.

त्यांच्या या पद्धतीमुळे माझा आणि त्यांचा वेळ वाचला होता आणि तरी काम उत्तमरीत्या पूर्ण झालं होतं. अशी सिस्टम डेव्हलप करण्यामागचं त्यांचं कौशल्य, अभ्यास, अनुभवातून आलेला विचार मला फार भावला. आपलं काम डोळसपणे केलं, तरच अशी कार्यप्रणाली आकाराला येते.

मला माझ्याहून वयानं मोठी एक मैत्रीण आठवली. तिच्याकडे जेवायला गेलं, की जेवण झाल्यावर ती आम्हाला स्वयंपाकघरातून अक्षरशः हाकलून द्यायची. तिला पुढच्या आवराआवरीत मदत करूया म्हटलं, तर तिचं म्हणणं असायचं, ‘मला माझ्या सिस्टमने करूदे. मी दहा मिनिटात बाहेर येते. मग गप्पा मारू.’ आमची एक मैत्रीण म्हणालीदेखील तिला, ‘जसं काही आम्ही घरी आवरतच नाही.’

पण तेच काम करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते. मी तिला म्हटलं, ‘आम्ही आत्ता खूप जणी आहोत. आम्ही बसतो गप्पा मारत बाहेर; पण कधी निवांतपणे मला बघायला आवडेल तुझी सिस्टम.’ एकदा तसा योग जुळून आला. खरंच सांगते, गाण्यात जसं कडव्यामागून कडवं उलगडत जातं, तसं तिचं एका कामातून दुसरं काम होत होतं.

आजची आवराआवर होताना दुसऱ्या बाजूला उद्याची तयारी होत होती. पाण्याचा माठ भरला जात होता. दुधाला विरजण लागत होतं. बदाम भिजत ठेवले जात होते. मी प्रेक्षकासारखं एका बाजूला शांत उभं राहून तिची सुरेख संसार- मैफील सादर होत असताना जणू ऐकत, पाहत होते. काम करताना तिची समाधी लागली होती. कारवावर तिची आवडती प्ले-लिस्ट वाजत होती आणि तीही गुणगुणत होती.

स्वयंपाकघरातल्या कामात कुणाला इतकं रमलेलं बघून मला गंमतच वाटली. खरंच, १० मिनिटात तिचं काम निपटलं. मी कौतुकाने तिला म्हटलं, ‘किती छान हात फिरतो तुझा. वाटतच नाही काम करते आहेस.’ ती हसत म्हणाली, ‘आता सिस्टम झाली आहे गं. कशामागून काय करायचं हे इतकं पक्कं झाले आहे, विचार करावाच लागत नाही. पूर्वी वीस-तीस माणसं असायची घरात. आता दोन-तीन असतात. प्रमाण कमी-जास्त होतं, बाकी सिस्टम तीच.’

आपल्याकडे पूर्वी म्हणत ना, ‘हाताला वळण हवं’, तेही बहुधा या सिस्टमला उद्देशून असावं. कारण सिस्टम आणि सवयी हातात हात घालून जातात. ह्याच मैत्रिणीची एक सिस्टम सांगते. तिनं दाराजवळच कापडी पिशवी अडकवायची सोय केली आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणारी व्यक्ती चप्पल- बूट घातले, की कापडी पिशवी घेऊन बाहेर पडते.

विसरण्याची शक्यता खूपच कमी- कारण सिस्टमच तशी डेव्हलप केली आहे ना! थोडक्यात काय तर, कुठल्याही सिस्टमला नावं ठेवणं सोपंच आहे; पण अशा कार्यपद्धती तयार करू शकलो, तर मात्र आयुष्य खूप सोपं, सुकर आणि सुखाचे होईल, काय?!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com