

परवाच दसरा सण झाला. नवरात्र नऊ दिवस, देवीची रूपे याची उजळणी झाली. वृत्तपत्र, सोशल मीडिया सारख्या माध्यमांमध्ये यशाची शिखरे गाठलेल्या अनेक स्त्रियांच्या यशोगाथा वाचल्या. मग ते कोविडविरोधातल्या लढ्यात कामगिरी बजावणे असेल, कोविड लस बनवणे असेल किंवा नासामध्ये यान प्रक्षेपण असेल या सर्व क्षेत्रामध्ये स्त्री अग्रेसर आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना प्रसंगी त्याहून देखील पुढे जाऊन काम करताना ती दिसते. पण या सर्व प्रक्रियेमध्ये निसर्ग तिला तिचे स्त्रीत्व कधीच विसरू देत नाही. कितीही फॅशन बदलली, केस कमी ठेवले तरीही तिच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत एक अधिक असलेल्या आशय म्हणजेच गर्भाशय... हे कॅलेंडरप्रमाणे आपले काम चोख बजावत असते.
मुलगी, बायको, आई, आजी (इतर अनेक नाती आहेत परंतु ही प्रमुख) असा हा प्रवास खरंच सुरू होतो, जेव्हा ती वयात येते. आणि पाळी येणे, गर्भधारणा होणे, आई होणे हा प्रवास सुरु होतो. हा प्रवास खूप सुखकर असतो. आश्चर्य वाटलं ना! मी सुखकर हा शब्द वापरला म्हणून. पण खरं आहे! आता हे वाचणार्या स्त्रियांनी भूतकाळात डोकावून पहा... पहिली आलेली पाळी, मनाची घालमेल, शरीरात होणारे बदल, दुखणारे ओटीपोट- कंबर तसेच गर्भारपणातील उलट्या, पायाची सूज, अवघडलेपण, बाळंतपणाच्या कळा हे सगळं खरं! पण या सगळ्या प्रवासात आपली आई, आजी, सासू, प्रसंगी घरची सगळी मंडळी आपल्याला किती समजून घेतात, मदत करतात, लाड कौतुक करतात, आराम देतात, डोहाळे पुरवतात. आपला प्रवास बऱ्यापैकी सुखकर करतात.
मला आज याच्या पुढचा टप्प्याविषयी बोलायचं आहे. तो टप्पा म्हणजे वयाची चाळीशी आणि येणारा मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणे. ही क्रिया साधारणतः 45 ते 55 या वयोगटांमध्ये दिसून येते. चाळीशीनंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये पाळी अनियमित होताना दिसते. एक वर्षभर पाळी झाली नसेल तर मेनोपॉज झाला असे समजावे. मेनोपॉज ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. Menopause च्या तीन स्टेजेस आहेत... पेरी मेनोपॉज, मेनोपॉज, पोस्ट मेनोपोज...
पेरी मेनोपॉजमध्ये पाळी जाण्याच्या आधी दहा वर्ष लक्षणे दिसू लागतात. पोस्ट मेनोपॉजमध्ये पाळी बंद झाल्यानंतर देखील लक्षणे दिसत असतात.
मेनोपॉजची लक्षणे
हॉट फ्लॅशेस
खूप किंवा दरदरून घाम येण
योनी भागी शुष्कता
लघवीला वारंवार जाणे किंवा वेग धारण न होणे
झोप न लागणे
मानसिक अस्वस्थता, स्वभाव चिडचिडा
तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा
वजन वाढणे
संधी शूल, अंगदुखी
अशी लक्षणे आढळू लागली शिवाय मासिक पाळीचा स्त्राव अनियमित व प्रमाण कमी-अधिक होऊ लागले की रजोनिवृत्ती अवस्था येण्याची चाहूल लागते. गर्भाशय हा अवयव त्याच्या नियमित कामातून निवृत्त होणार म्हणजे त्याचे परिणाम शरीरावर दिसून येणारच. पण या अवस्थेविषयी स्त्रियांमध्ये जागृती दिसून येत नाही. गर्भाशय हा अवयव शारीरिक मानसिक घटकांवर परिणाम करत असतो. त्यामुळे मेनोपॉज काळात देखील घेणे गरजेचे आहे. जे या वयातील स्त्रिया घेताना दिसत नाहीत. कारण घराच्या कामाच्या रहाटगाडग्यात त्या खूप व्यस्त असतात किंवा त्यांच्या प्रायॉरिटी वेगळ्या असतात. एवढा वर्षात सर्वांसारखे आपणही स्वतःला गृहितच धरलेले असते. या वयात मानसिक आधाराची ही जास्त गरज असते; कारण स्त्रियांना खंबीर ठेवणारे संप्रेरकं शरीरात कमी कमी होत असतात. म्हणूनच नवरा-मुलं यांचे थोडेसे दुर्लक्ष किंवा नाराजीने लगेच रडू देखील येते.
खरंतर ही आयुष्याची खूप महत्त्वाची फेज आहे . या काळातील काळजी पुढील आयुष्य सुखकर करते. यामध्ये घरातील सर्व व्यक्तींचा सहभाग असणे गरजेचे आहे. शारीरिक स्वास्थ्यासाठी चालण्याचा व्यायाम, योगासने, प्राणायाम दररोज करावे. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून कोणत्याही प्रकारे सांध्यांवर ताण येणार नाही. तसेच गरज असल्यास अश्वगंधा, शतावरी, तगर, आवळा, लाजाळू, जटामांसी, यशक भस्म, अभ्रक भस्म यांचे वैद्याच्या सल्ल्याने सेवन करावे. या वयात निसर्गत: हा वात वाढत असतो. त्यामुळे स्नेहन, स्वेदन, बस्ती चिकित्सा उपयोगी ठरते शिरोधारेचा ही अप्रतिम परिणाम दिसून येतो.
जेवणामध्ये फळ भाज्या, मूग मटकी यांसारखी कडधान्य व फळ यांचा वापर वाढवावा. सोयाबीन, बदाम, जवस ,अंजीर काळे मनुके यांचाही आहारात समावेश असावा. डबाबंद पदार्थ, बाहेरील प्रोटीन सप्लीमेंट, अतिरिक्त व्यायाम, तेलाचा अतिवापर टाळावा. आहारात गाईच्या तुपाचा समावेश असावा. संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने स्नेहन करावे.
मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन जरूर करावे. तसेच बागकाम संगीत यालाही वेळ द्यावा. घरकाम म्हणजे व्यायाम नाही. व्यायामासाठी स्वतःचा वेळ असावा. एखादा छंद जो पूर्वी जोपासता आला नसेल त्यासाठी वेळ काढावा किंवा नवीन गोष्टी शिकाव्यात थोडक्यात स्वतःला वेळ देणे, घरच्यांबरोबर चांगला वेळ घालवणे, स्वतःच्या शरीराची, त्वचेची काळजी घेणे अवश्य करावे. ताणतणावापासून दूर रहावे.
या वयातील स्वतःची काळजी आपल्याला आपल्या जोडीदाराच्या आणि मुलांच्या आणखी जवळ आणते. शिवाय भविष्यात होणाऱ्या सांधेदुखी, स्थूलता, हृदय विकार, डायबेटिस, वातव्याधी, पोटाच्या तक्रारी तसेच अनेक मानसिक तक्रारी यांना दूर ठेवते. आयुष्यातील हे पर्व छोट्या छोट्या गोष्टींनी आरोग्यदायी बनवता येते. म्हणूनच आज 18 ऑक्टोबर वर्ल्ड मेनोपॉज डे या दिवशी स्वतःची काळजी घेण्यासाठी व आयुष्यातील पुढील टप्पा एन्जोय करण्यासाठी सज्ज होऊया.
- सिमीन बावडेकर-रखांगी (M.S. Obstetrics & Gynaecology)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.