Mental Health Day 2021: लॉकडाऊनमुळे आलेल्या एकटेपणाचं काय करायचं?

Mental Health Day 2021: लॉकडाऊनमुळे आलेल्या एकटेपणाचं काय करायचं?

गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यातील ही गोष्ट... फोन वाजला... अगदी एकेकाळी जवळच्या असणाऱ्या मित्राचा खूप वर्षांनी आलेला फोन..! मात्र, नेहमी आनंदी-उत्साही असणारा तो एकदम शांत-थकेलला जाणवत होता.. कोरोनाच्या एकटेपणाच्या काळात आपल्यातील खूप जणांना आलेला हा अनुभव माझ्यासाठी काही नवीन नव्हता..! अगदी आनंदी उत्साही आणि नेहमी फ्रेश असणारा व्यक्ती अगदी रडवेल्या आवाजात कंटाळून बोलतीये, हा झालेला बदल आपण कोरोनाच्या लोकडाऊनच्या काळात सगळेच एकावेळेला अनुभवलाय.

Mental Health Day 2021: लॉकडाऊनमुळे आलेल्या एकटेपणाचं काय करायचं?
Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

आपल्यापैकी अनेकांना या कोव्हीडच्या काळात असे अनेक अनुभव आले असतील. आपलं मन अनेक नव्या समस्यांतून जात असल्याची जाणीव सुद्धा आपल्याला झाली असेल. वेगवेगळ्या मानसिक आजारांच्या लक्षणातून आपण सगळेच जात होतो. काही जण जुन्या वा आजपर्यंत लपून राहिलेल्या मानसिक समस्या डोकं वर काढताना अनुभवत आहेत. तर काहींनी या मानसिक आरोग्याचे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपणहून प्रयत्नसुद्धा सुरू केले आहेत.

पण अचानकपणे मानसिक आरोग्याचे विषय इतके गंभीर कसे काय झाले आहेत, ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी बघून आपण सगळेच आपल्या स्वतः मध्ये बदल करीत असतो. पण हे बदल भयंकर वेगाने अनिश्चितपणे किंवा अगदी विचार करायला वेळही न मिळावा इतक्या गतीने होत असतील तर आपण गोंधळून जाऊन सुन्न होतो..! त्याचा परिणाम थेट आपल्या मनावर होत असतो. आपल्या शारीरिक सुदृढतेसाठी जसे शरीराचे व्यायाम महत्वाचे असतात तसेच मनाचे व्यायामही असतात. या व्यायामांबद्दल आपल्याला कधीच शाळेत किंवा कॉलेजमध्ये सांगितलं जातं नाही. मनाने आजारी पडणं ही वस्तुस्थिती आहे, हे देखील अजून खूप जणांना माहिती नाहीये. आपण स्वतःला आहे तस स्विकारायला अगदी शाळेत असल्यापासूनच कमी पडतो. कधी कधी स्वतः चा विचार करून निर्णय घेतानाचे अनुभव फार कमी येतात. आपल्यासोबत असं का होत असेल?

जेव्हा कोरोनाच्या संकट आपल्यावर ओढावलं तेव्हा आपल्याला जाणवायला लागलं की लक्षणे नसतानाही माणसं मरत आहेत ती काळजी आणि भीतीने! मला कोरोना झालाय, ठीक आहे. पण माझ्या घरी मुलीला बायकोला आणि वयस्कर व्यक्तीला झाला तर मी काय करु? अचानक बंद पडलेला उद्योग, त्यात घरी बसून असणारी सगळी मंडळी... त्यात बाहेरून कोणी आल्यावर वाटणारी भीती... त्यात सतत हात धुवत रहाणे किंवा सतत मनात एकच विचार... यांसारख्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर सखोल होत गेला..!

लहान मुलांचा वाढता मोबाईलचा वापर त्यात बाहेर कुणामध्येही मिसळायचं नाही. घरात सतत एकाच व्यक्तीचा चेहरा बघून वाद वाढत आहेत. सतत एकच एकच विषय मनात चालू राहून हिंसेचा उद्रेक होऊ लागलाय. आपण प्रमाणापेक्षा जास्त एकसाची अशा बातम्या बघू लागलो आणि त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतोय..! 'खूप दिवस टिकणार नाही हे जग' असं आपण नकळत म्हणून जातोय. अगदी स्वतः मनातल्या मनात..!

एकटं असणं हे सगळ्यात भयंकर आहे. याचं मुख्य कारण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपला स्व-सवांद सुरू असतो. मग तो संवाद कधी-कधी इतका भयंकर असतो की आपल्याला भीती वाटते स्वतः सोबत बोलण्याची... म्हणून आपण टाळत चाललो आहोत स्वतःला भेटणं...

स्वतः सोबत झालेला सवांद हा जेवढा उत्साही असेल तेवढं आपलं आयुष्य फुलायला लागतं..! समोरच्या गोष्टीला टक्कर देण्याची हिम्मत आपल्याला स्व-सवांदामधूनच मिळते. त्यामुळे तो जितका सकारात्मक असेल, तेवढी ऊर्जा जास्त आपल्याला मिळते.

आपण आपल्या धावत्या आयुष्यात खूप वेळ म्हणून जातो की, मला ना खूप छान कविता जमतात, शाळेत खूप भारी करायचे मी, पण जेव्हा आपलं धावत आयुष्य थांबलं तेव्हा आपण या गोष्टी करण्यात कमी पडलो आणि म्हणूनच आपल्याला एकटं वाटायला सुरुवात झाली. जेव्हा आपण आपले छंद जोपासायला सुरू करतो तेव्हा नव्याने प्रेमात पडतो आपण स्वतःच्या... पण आपण खूप कमी वेळा त्या छंदांकडे लक्ष देवून ते जोपासतो.

Mental Health Day 2021: लॉकडाऊनमुळे आलेल्या एकटेपणाचं काय करायचं?
किचनमध्ये आहे चांगले करिअर; कधी विचार केला का?

गेल्या काही महिन्यांत आपण खूप समस्यांना सामोरे गेलोय. आपण या समस्यांमध्ये चिंता (anxiety), नैराश्य (depression), झोपेच्या समस्या, राग, चिडचिड, एकाकीपणा अशा अंधाऱ्या अवस्थेतून गेलो असेल. सोबतच घरगुती भाडणं, नात्यांमधले ताणतणाव सुद्धा वाढले आहेत. भविष्याबद्दलची अनिश्चितता, आर्थिक प्रश्नांचं न सुटलेलं कोडं, शैक्षणिक भवितव्याबाबतची अस्पष्टता, कोव्हीड आजार आपल्याला वा आपल्या प्रियजनांना होईल का, ही भीती, घरातील वृद्ध वा आधीच आजारी असलेल्यांची काळजी, अशी काही कारणं चिंता किंवा anxiety ला जन्म देतात.

याशिवाय रोजचं दैनंदिन आयुष्य अचानक थांबणं, काही हेतू वा रोजचं काही ठराविक उद्दिष्ट स्पष्ट नसणं, सभोवतालची नकारात्मकता, गप्पा, टीव्ही, सोशल मिडिया अशा माध्यमातून समजणाऱ्या नकारात्मक, चिंताजनक बातम्या, यांच्यामुळे औदासिन्य, डिप्रेशन बळवू शकतं.

लॉकडाऊनमुळे घरात बसून येणारा साधा कंटाळासुद्धा आपल्या नकारात्मकतेला कारणीभूत होऊ शकतो. नाती बिघडणे, भांडणं, वाद घरगुती हिंसा हे सर्व या निमित्ताने वाढलं आहे. आज मानसिक आरोग्य दिनानिमित्त, या समस्यांवर मात करायला उपयोगी पडतील अशा काही छोट्या पण मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात...

या परिस्तिथी मधून बाहेर येण्यासाठी मी काय काय करू शकतो शकते? असा प्रश्न तुम्ही एकदा स्वतःला विचारा आणि किमान 10 उत्तरे शोधून काढा. यामुळे तुम्हाला स्वत:चा मार्ग सापडेल आणि तो तुम्हीच शोधून काढला असल्यामुळे तो मार्ग तुमच्यासाठी सोयीस्कर असेल.

१) स्व-सवांद ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण स्वतः स्वतःबद्दल काय बोलतो, विचार करतो, म्हणजेच मनातल्या मनात आपण काय गप्पा मारतो?

2) इतरांसोबत आपण किती प्रमाणात जोडले गेलेले आहोत?

3) आपल्या सुख-दु:खाच्या किती भावना आपण share करतो

4) आपण किती वेळा स्वतः बद्दल अभिमानाने बोलतो किंवा दुसऱ्यांना स्वतःच्या अभिमानच्या गोष्टी सांगतो?

5) फक्त वेळेअभावी आपण किती लोकांना टाळतो?

6 ) वाद होतील म्हणून आपण किती वेळा संवाद बंद करून स्वतःच त्याचे उत्तर शोधतो?

7) किती वेळा आपण दुसऱ्याच्या जागी जाऊन त्याच्या दृष्टीने प्रश्नांकडे पाहतो?

8) किती वेळा आपण आपलं मन रिलॅक्स केलं आहे?

9) अगदी मोठा श्वास घेऊन सोडून डोळे बंद करून एका जागी बसून आपल्याला किती दिवस झालेत?

10) मन शांत ठेवण्यासाठी आपण किती वेळ एका जागी वर्तमानात मन एकाग्र करून 10 मिन बसू शकतो का?

11) शेवटचं कधी आपण आपलं छंद जोपासले होते, हे आपल्याला आठवतंय का?

वरील या सगळ्या गोष्टी करून बघूया पुन्हा एकदा..! सकारात्मक गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देणं, त्यांना मनापासून appreciate करणं, कृतज्ञ राहणं, या सकारात्मक गोष्टींची रोज नोंद करून ठेवणं, हे सर्व आपल्याला मदतीचं ठरू शकतं. आपल्याकडे आधीच असलेल्या चांगल्या गोष्टींना आपण अनेकदा गृहीत धरतो. जसं की, चांगलं आरोग्य, प्रेमाची माणसं, मिळालेलं शिक्षण, राहायला घर, पोटभर जेवण, या आणि अशा शेकडो गोष्टी विचार केल्यावर आपल्याला जाणवतील. यांच्याबद्दल जेवढे आपण कृतज्ञ राहू, तेवढं आपलं मन आनंदी राहील. मानसिक आरोग्य जपणं हे शारीरिक आरोग्य जपण्याएवढंच, किंबहुना काकणभर जास्तच महत्त्वाचं आहे. कारण मानसिक ताणतणाव व आजारांचे परिणाम शारीरिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतात. मात्र मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे मनापासून ठरवलं तर नक्कीच सोपं आहे. ते जपण्यासाठी आपल्याला लागेल ते सातत्य! हळूहळू, पण सातत्याने ही प्रक्रिया करणं सगळ्यात प्रभावी ठरतं. गरज पडेल तेव्हा मदत मागणं, वेळीच डॉक्टर वा काउंनसिलरकडे जाणं आणि आपल्या स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य देणे ही मात्र आपली वैयक्तिक जबाबदारी...

- नम्रता पाटील

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com