Loksabha Election 2024 : हल्ले झाले तरी एकजूट कायम ; रांचीतील सभेत ‘इंडिया’चा निर्धार

लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्प्यातील प्रचाराचा जोर सुरू असतानाच आज झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली रांची येथे इंडिया आघाडीची ‘उलगुलान न्याय’ सभा झाली. लोकशाहीवर हल्ले करणाऱ्या भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी आमची एकजूट कायम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या सभेत झाला.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

रांची (झारखंड) : लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्प्यातील प्रचाराचा जोर सुरू असतानाच आज झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली रांची येथे इंडिया आघाडीची ‘उलगुलान न्याय’ सभा झाली. लोकशाहीवर हल्ले करणाऱ्या भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी आमची एकजूट कायम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या सभेत झाला. भाजपने कितीही दडपशाही केली तरी आम्ही घाबरणार नाही आणि आघाडी तुटू देणार नाही, असा इशारा घटक पक्षांनी दिला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काही दिवसांनी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची सभा झाली होती. त्या सभेनंतर आज रांचीमध्ये झालेल्या सभेतही केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. विशेष म्हणजे, अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांचे नाव लिहून दोन खुर्च्याही रिकाम्या ठेवण्यात आल्या होत्या.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘भाजपला विरोधकांना संपवायचे आहे. मात्र आमची एकजूट तुटणार नाही. चारशेहून अधिक जागा मिळतील, असा त्यांचा दावा आहे. मात्र यावेळी आमच्या आघाडीची शक्ती इतकी मजबूत आहे की त्यांच्या जागा दीडशे ते दोनशेच्या वर जाणार नाहीत. ते आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही घाबरणार नाही.’’ इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यास हेमंत सोरेन यांनी नकार दिल्यानेच त्यांना तुरुंगात टाकले असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला.

या सभेला खर्गे यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ‘आप’चे खासदार संजयसिंह हे प्रमुख नेते उपस्थित होते. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांचे मोठे कटआऊट लावण्यात आले होते. कल्पना सोरेन यांनी यावेळी हेमंत सोरेन यांनी तुरुंगातून पाठविलेला संदेश वाचून दाखविला. लोकशाहीला पराभूत होऊ देणार नाही, असा निर्धार हेमंत यांनी व्यक्त केल्याचे सांगताना कल्पना सोरेन यांनी देशात तपास संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप केला. आजच्या सभेला २८ पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

‘मोदींमुळे गरिबीत वाढ’

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले,‘‘मोदींनी देशात केवळ गरीबी आणि महागाई वाढविण्याचे काम केले आहे. जनतेला खोटी आश्‍वासने दिली. दोन कोटी लोकांना ते रोजगार देणार होते आणि लोकांच्या खात्यात १५ लाख रुपयेही जमा करणार होते. लोकांना पैसे मिळाले नाहीत, पण निवडणूक रोख्यांच्या रूपाने भाजपच्या खात्यात भरपूर पैसे जमा झाले.’’ अखिलेश यादव यांनीही केजरीवाल आणि सोरेन यांना अटक केल्याबद्दल भाजपवर टीका केली. ‘तुम्ही केवळ वाघांना अटक केली आहे, त्यांची डरकाळी कशी थांबविणार?,’ असा सवाल त्यांनी विचारला.

कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

सभेमध्ये एकजूट दाखविण्याचा नेत्यांनी प्रयत्न केला असला तरी कार्यकर्त्यांनी त्याला गालबोट लावले. सभेसाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते मैदानावर जमले होते. यावेळी काही तरी वाद होऊन काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुर्च्यांनी मारण्यास सुरुवात केली. यामध्ये काही कार्यकर्ते रक्तबंबाळही झाले. नंतर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला.

राहुल गांधी, ठाकरे, पवार अनुपस्थित

तब्येत बरी नसल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सभेला येऊ शकले नाहीत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. राहुल हे मध्य प्रदेशातील सतना येथे जाहीर सभा तर रांची येथील इंडिया आघाडीच्या रॅलीला हजर राहण्यासाठी दिल्लीतून निघण्याच्या तयारीत होते. मात्र अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी आपले दौरे केले, असे रमेश यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार हे दोघेदेखील सभेला गेले नव्हते. ठाकरेंच्या पक्षातर्फे प्रियांका चतुर्वेदी हजर होत्या.

अरविंद केजरीवाल यांना सत्तेची अजिबात लालसा नाही. त्यांना केवळ देशसेवा करायची आहे. त्यांना देशाला प्रथम क्रमांकावर आणायचे आहे. मात्र, हे सरकार त्यांना तुरुंगात मारू पहात आहे.

- सुनीता केजरीवाल,

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी

रांचीतील सभा म्हणजे कौटुंबिक स्नेहसंमेलन होते. केवळ आपलेच हित जपणारे कुटुंब आणि त्यांचे पक्ष असे याचे स्वरूप होते. भाजपने भ्रष्टाचाराविरोधात जे अभियान सुरु केले आहे, त्याला घाबरूनच हे सर्व एकत्र आले आहेत.

- प्रतुल शाहदेव, भाजपचे प्रवक्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com