राज्य-मिती जम्मू- काश्‍मीर : ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष स्वतंत्र लढणार

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्याने अनेक अर्थाने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा केली आहे.
राज्य-मिती जम्मू- काश्‍मीर
राज्य-मिती जम्मू- काश्‍मीर sakal

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्याने अनेक अर्थाने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या उमेदवारांमुळे राज्यातील लढत बहुरंगी होण्याचीही शक्यता आहे.

जावेद मात्झी

श्रीनगर : काश्‍मीरमध्ये सुमारे ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा सूर उमटलेला नाही. काश्‍मीरमधील अनंतनाग, श्रीनगर आणि बारामुल्ला येथे अनुक्रमे सात, १३ आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. राज्यात निवडणूक प्रचाराला अद्याप सुरूवात व्हायची आहे मात्र येथील राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्‍चित करण्याची आणि निवडणुकांच्या दृष्टीने प्रचाराचे धोरण आखण्याची लगबग सुरू झाली आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये निवडणुकीपूर्वीच टोकाचे मतभेद दिसून आले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष जम्मू-काश्‍मीरमधील पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन (पीएजीडी) आणि देशपातळीवरील विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेले पक्ष आहेत.

सर्वप्रथम नॅशनल कॉन्फरन्सने कोणत्याही पक्षाबरोबर युती न करता काश्‍मीरमधील सर्व जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. काँग्रेसने या तीनही जागांवर नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला असून याबदल्यात जम्मूतील उधमपूर आणि जम्मू या दोन मतदारसंघामध्ये नॅशनल कॉन्फरन्सने उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे जम्मू आणि उधमपूर मतदार संघातून भाजपचे जुगल किशोर व जितेंद्र सिंह आणि काँग्रेसचे रमण भल्ला आणि लालसिंह यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. डॉ. जितेंद्र सिंह आणि जुगल किशोर हे दोघेही विद्यमान खासदार आहेत तर लालसिंह यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सच्या वतीने श्रीनगरमध्ये उमर अब्दुल्ला, बारामुल्ला येथून रुहुल्ला मेहदी आणि मिया अल्ताफ हे अनंतनाग-राजौरी येथील संभाव्य उमेदवार असल्याचे मानले जात आहे. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार तारिक हमीद कराह यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या डॉ. फारुख अब्दुल्ला यांचा पराभव केला होता. मात्र

राज्य-मिती जम्मू- काश्‍मीर
Loksabha Election 2024 : नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या तीनही जागांवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार विजयी झाले होते. यामुळेच येथील जागावाटपामध्ये इंडिया आघाडीमधील इतर पक्षांना जागा देण्यास नॅशनल कॉन्फरन्सच्या वतीने नकार देण्यात आला. नॅशनल कॉन्फरन्सचे बारामुल्ला येथील उमेदवार रुहुल्ला मेदही हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जर मेहेदी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला तर बारामुल्ला येथून चौधरी रमजान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

फेररचनेमुळे समीकरणे बदलली

मतदारसंघांच्या फेररचनेमुळे येथील राजकीय समीकरणेदेखील बदलली आहेत. येथील सर्वच राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार देताना ही नवी मतदारसंघ रचना लक्षात घेऊन उमेदवार द्यावे लागणार आहेत. नव्याने फेररचना करण्यात आलेल्या अनंतनाग मतदारसंघामध्ये जम्मूमधील राजौरी हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. राजौरी येथे मोठ्या संख्येने गुज्जर समुदायाचे मतदार आहेत. त्याचप्रमाणे अनंतनाग आणि कुलगाम येथील दुर्गम भागात देखील या गुज्जर समुदायातील नागरिकांची सख्या जास्त आहे त्यामुळेच नॅशनल कॉन्फरन्सने येथे मिया अल्ताफ यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले असल्याचे मानले जात आहे.

त्याचप्रमाणे बारामुल्ला मतदार संघामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या बडगाम जिल्ह्यामध्ये शिया मुस्लिमांचे मतदान अधिक प्रमाणावर असल्याने रुहुल्ला यांना येथून उमेदवारी देण्याचा विचार पक्का करण्यात आल्याचे मानले जात आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’ने काश्‍मीरमधील तीनही जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्याचप्रमाणे आझाद यांच्या आघाडीच्या वतीने अपनी पार्टीच्या अश्रफ मीर यांना श्रीनगर येथून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. या सर्व पक्षांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांचे पारडे सध्या तरी जड असल्याचे मानले जात आहे.

प्रचाराच्या केंद्रस्थानी ‘कलम ३७०’

जम्मू-काश्‍मीरमध्ये या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा असणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीमध्ये कशापद्धतीने सकारात्मक बदल घडून आले आहेत हे येथील जनतेच्या मनात बिंबविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. तर विरोधी पक्षांच्या प्रचारामध्ये ३७० कलम रद्द केल्याने राज्याचे कसे नुकसान झाले आहे यासह जम्मू-काश्‍मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी या मुद्द्यांचा समावेश आहे.

बहुरंगी लढतीची शक्यता

भाजप, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्याशिवाय गुलाम नबी आझाद यांचा डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष, अल्ताफ बुखारी यांचा अपनी पार्टी आणि पीपल्स कॉन्फरन्स या पक्षांच्या आघाडीमुळे निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. या पक्षांचे उमेदवार विजयी झाले नाहीत तरी ते निकालावर प्रभाव पाडू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com