Loksabha Election Voting : मतदानातील वाढ, घट कुणाला तारणार, कुणाला मारणार?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले. या अकरा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी ६२.०३ टक्के इतकी आहे.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले. या अकरा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी ६२.०३ टक्के इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर व शिर्डी, खानदेशातील जळगाव, रावेर व नंदुरबार, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या मतदारसंघांत उन्हाच्या काहिलीत तर दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात मावळ भागात पावसाच्या तडाख्यातही मतदान पार पडले. नंदुरबार, जालना व बीडसारख्या मतदारसंघांत ते प्रचंड उत्साहात पार पडले, तर पुण्यासारख्या शहरी भागात ते त्रेपन्न टक्क्यांवर अडकले. ही टक्केवारीतली वाढ व घट कुणाला मारणार व कुणाला तारणार, याची चर्चा आता होत आहे.

पुणे : वाढीव टक्क्यांची उत्सुकता

मंगेश कोळपकर

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली. भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि कॉँग्रेस महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, ‘वंचित’चे वसंत मोरे आणि ‘एमआयएम’चे अनिस सुंडके यांच्यासह ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुण्यात २० लाख ६१ हजार २७६ मतदारांपैकी ११ लाख ०३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गतनिवडणुकीच्या तुलनेत ३.७ टक्क्यांनी मतदान वाढले असले तरी, प्रत्यक्षात सुमारे ६८ हजार मतदान अधिक झाले आहे. हा टक्का कोणाकडे झुकतो, त्यावर विजेत्याचा निकाल अवलंबून असेल. विधानसभेत धंगेकर हे कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ५९.२४ टक्के मतदान झाले आहे. तर मोहोळ राहत असलेल्या कोथरूडमध्येही गतनिवडणुकीच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी मतदान वाढले आहे.

मोहोळ यांना प्रचाराला भरपूर वेळ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनीही प्रचारात भाग घेतला. मित्रपक्ष राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचीही ताकद भाजपला मिळाली. गेल्या दोन निवडणुकांत तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्य पुण्यात भाजप उमेदवार गिरीश बापट यांना होते. त्यामुळे भाजपला ही निवडणूक सोपी वाटत होती. परंतु, सुरुवातीच्या काळात विस्कळित वाटणारी महाविकास आघाडी शेवटच्या टप्प्यात कमालीची एकसंध झाली. राहुल गांधीच्या सभेने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. विदर्भातील आठ आमदारांसह पक्षाचे वरिष्ठ नेतेही प्रचारात सक्रिय झाले. मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस ‘शरदचंद्र पवार’ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचीही ताकद पुण्यात धंगेकरांच्या पाठीशी राहिली. भाजपच्या हक्काच्या कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघात मतदान मोठ्या प्रमाणात होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात ते कसबा, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरीत वाढले. गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांबरोबरच वस्ती भागातील मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरला. वाढलेल्या मतांच्या टक्केवारीमुळे हे मताधिक्य तोडण्याचा मविआला विश्वास आहे तर, नियोजनबद्ध प्रचारामुळे महायुतीला विजयाची खात्री आहे.

 • वाढीव टक्का कुणाच्या पथ्यावर?

 • आधी एकतर्फी, शेवटी मात्र चुरशीची

 • आघाडी शेवटच्या टप्प्यात एकसंध

 • मोदी, गांधींच्या सभांनी उत्साह

शिरूर: घटलेल्या मतांचा उमेदवारांना धसका

डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील या जुन्याच विरोधकांमध्ये नवीन चिन्हांवर झालेली शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मात्र, तरीही मतदानाचा टक्का घसरला आहे. केवळ ५४.१६ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेच्या तुलनेने सुमारे साडेसहा टक्के मतदान घटले आहे. गेल्या वेळी ६०.६२ टक्के मतदान झाले होते. टक्केवारी घटली असली तरी गेल्यावेळच्या तुलनेत ८५ हजार मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे घटलेला टक्का कोणाला धक्का लावणार आणि वाढलेले मतदार कोणाला तारणार, याची उत्सुकता आहे. शिरूर मतदारसंघात अगदी सुरुवातीपासूनच राजकारण तापलेले होते. सुरुवातीला एकनिष्ठ, पक्षबदलू अशा मुद्द्यांवर फिरणारी निवडणूक थेट आरोप-प्रत्यारोपांवर आली. बारामतीचा प्रचार संपल्यानंतर सर्वच नेत्यांनी शिरूरवर लक्ष केंद्रित केल्यानंतर प्रचारात रंगत दिसली.

 • सहापैकी पाच आमदार महायुतीकडे

 • कांद्याच्या निर्यातीच्या निर्णयाचा परिणाम

 • घटलेल्या साडेसहा टक्क्यांचा फटका कोणाला बसणार

 • शरद पवार व उद्धव ठाकरेंबाबतची सहानभूती

 • अजित पवारांनी शेवटच्या टप्प्यात लावलेली ताकद

मावळ: कमी टक्केवारीने निकालाबाबत संभ्रम

मावळ लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात रंगतदार झाली. महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे व वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी, बसपचे राजाराम पाटील यांच्यासह ३३ जण रिंगणात होते. मावळात २५ लाख ८५ हजार १८ मतदानापैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनी मतदान केले. केंद्र शासनाकडून रेल्वे चौपदरीकरणासह आदी न झालेली कामे, वाढती महागाई, बेरोजगारी व बारणे यांच्या बाबतच्या नाराजीचा फायदा होऊन विजयी होण्याचा विश्‍वास महाविकास आघाडीला आहे; तर नियोजनबद्ध प्रचार व महायुतीच्या वाढलेल्या ताकदीमुळे महायुतीला विजयाची खात्री आहे. प्रत्यक्षात घटलेला मतदानाचा टक्का व झालेले मतदान कोणाला फायद्याचे तसेच तोट्याचे ? यावरच मावळचा निकाल ठरणार आहे.

 • घसरलेला ५.४२ टक्क्यांचा परिणाम कोणावर होणार, याबाबत उत्सुकता.

 • वाढती महागाई, बेरोजगारी व बारणे यांच्याबाबतच्या नाराजीचा फायदा होऊन विजयी होण्याचा ‘मविआ’ला विश्‍वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com