लक्षवेधी लढत : आझादांना ‘कीर्ती’ की दिलीप यांचा जय‘घोष’?

पश्चिम बंगालमधील वर्धमान दुर्गापूर मतदारसंघात यावेळी अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळत आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष विरुद्ध तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांच्यात ही लढत होत आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

वर्धमान दुर्गापूर (प. बंगाल)

कोलकता : पश्चिम बंगालमधील वर्धमान दुर्गापूर मतदारसंघात यावेळी अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळत आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष विरुद्ध तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांच्यात ही लढत होत आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात भाजपच्या एस. एस. अहलुवालिया यांनी विजय मिळवला होता. दिलीप घोष हे मावळत्या लोकसभेत मेदिनीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) येथून सुकृती घोषाल यांना संधी दिली असली तरी खरी लढत भाजप आणि तृणमूल यांच्यादरम्यान होत आहे.

मागील तीन निवडणुकांचा विचार केला तर दरवेळी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी येथे विजय मिळवला होता. भाजपच्या दिलीप घोष यांच्यासाठी त्याचमुळे ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरली आहे. तृणमूलकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरलेले कीर्ती आझाद हे माजी क्रिकेटपटू आहेत. पक्षाने बाहेरचा उमेदवार लादला असल्याची भावना स्थानिक तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election : सेलिब्रिटींचा आज फैसला ; तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात रणधुमाळी

वर्धमान दुर्गापूरमध्ये सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वर्धमान दक्षिण, वर्धमान उत्तर, मोन्तेश्वर, भातर, घालसी, दुर्गापूर पूर्व आणि दुर्गापूर पश्चिम असे हे मतदारसंघ आहेत. २०२१मधील विधानसभा निवडणुकीत दुर्गापूर पश्चिम वगळता इतर सर्व मतदारसंघात तृणमूलने विजय प्राप्त केला होता. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मागील १०-१२ वर्षात समीकरण पूर्णपणे बदलले आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलच्या ममताज संघमित्रा यांनी सैदूल हक यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेली होती.

या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे २० टक्के इतकी आहे. तर अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या २७ टक्के इतकी आहे. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत डावे आणि काँग्रेस एकत्र आल्याने माकप उमेदवाराला कमी लेखून चालणार नाही.

लोककल्याणकारी योजनांच्या आधारे वर्धमान दुर्गापूरमध्ये विजय मिळवू, असा तृणमूलचा विश्वास आहे, तर हिंदू मतांच्या लाटेवर स्वार होऊन दिलीप घोष निवडणुकीत विजयी होतील, अशी आशा भाजपच्या धुरिणांना वाटते. सव्वा बारा लाख मतदार असलेल्या वर्धमान दुर्गापूरमध्ये मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल टाकणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com