बिहारमध्ये ‘इंडिया’ आघाडीत कुरबुरी; काही जागांवरून राष्ट्रीय जनता दल-काँग्रेसमध्ये मतभेद

‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेसचा सर्वात विश्वासू सहकारी म्हणून राजदकडे पाहिले जाते. परंतु बिहारमधील काही जागांवरून राजद व काँग्रेसमधील वर्चस्वाची चुणूक आता पाहायला मिळाली आहे.
India alliance disagreement Bihar between Rashtriya Janata Dal and Congress on seats
India alliance disagreement Bihar between Rashtriya Janata Dal and Congress on seats Sakal

नवी दिल्ली : काँग्रेसचा सर्वात जुना सहकारी राष्ट्रीय जनता दलाशी बिहारमधील जागावाटपावरून टोकाचे मतभेद समोर आले असून अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. पूर्णिया, बेगुसराय या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या दोन्ही पक्षांमधील कुरबुरीत वाढ झाली आहे.

‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेसचा सर्वात विश्वासू सहकारी म्हणून राजदकडे पाहिले जाते. परंतु बिहारमधील काही जागांवरून राजद व काँग्रेसमधील वर्चस्वाची चुणूक आता पाहायला मिळाली आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा जनाधार सातत्याने कमी कमी होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकच खासदार निवडून आला होता.

परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचे २७ आमदार निवडून आले होते. काँग्रेसने बिहारमध्ये पाय पसरण्यास सुरवात केली आहे. या मोहिमेतच बाहुबली पप्पू यादव, भाजपचे खासदार अजय निषाद यांना काँग्रेसने पक्षात ओढले आहे. याशिवाय पुन्हा काही भाजपचे खासदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. ही सुरवात राजदला फारशी रुचलेली दिसत नाही.

पप्पू यादव यांना शह देण्यासाठी राजदने लेडी डॉन म्हणून प्रसिद्ध असलेली बिमा भारती या महिला नेत्याला राजदने तत्काळ जेडीयूतून फोडून राजदची उमेदवार घोषित केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजदने १९ जागांवरच उमेदवार उभे केले होते. यावेळी राजदने २६ जागांवर लढण्याचा निर्णय घेतला.

राजदच्या या भूमिकेमुळे काँग्रेससमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसने आज तीनच उमेदवारांची नावे जाहीर केली. किशनगंज, कटिहार व भागलपूर या मतदारसंघांतील उमेदवारांचा यात समावेश आहे. हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलेले आहेत. पप्पू यादव यांना काँग्रेस श्रेष्ठींचा आशीर्वाद असल्याने ते पूर्णिया मतदारसंघात येत्या ४ एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत.

मुझफ्फरपूर येथील भाजपचे खासदार अजय निषाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मागासवर्गीय समाजातील मोठे नेतृत्व काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. या मतदारसंघावर त्यांचे वडील जय नारायण निषाद यांचे अनेक वर्षे वर्चस्व होते. काँग्रेसचा बिहारमध्ये जनाधार वाढविण्याच्या मोहिमेमुळे राजदमध्ये नाराजी पसरली असून यामुळे राजद व काँग्रेसमध्ये कुरबुरीत वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com