Lok Sabha Election 2024: ‘त्या’ पाच जागांवर भाजप ठाम! CM शिंदेंनी संपर्क तोडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बैठक, मात्र निर्णय नाहीच!

Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदे यांनी काल १५ जागांचा आग्रह धरत काही काळासाठी संपर्क तोडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बैठक चालली.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024

मुंबई : गेली चार वर्षे भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन तयार केलेले लोकसभा मतदारसंघ मित्रपक्ष जिंकू शकणार नाहीत. मते हस्तांतरित होणे सोपे नाही. हे कारण देत रत्नागिरी, पालघर, ठाणे, सातारा आणि नाशिक हे मतदारसंघ सोडण्यास भारतीय जनता पक्षाने ठाम नकार दिला असल्याचे समजते.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागांचा आग्रह धरला तर महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही, असे भाजप नेत्यांनी उघडपणे सांगितल्याचे समजते. हा वाद दिल्ली दरबारी चर्चेला येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी काल १५ जागांचा आग्रह धरत काही काळासाठी संपर्क तोडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. शिवसेनेने घोषित केलेल्या आठ जागांवर कोणत्या खासदाराला अॅंटीइन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो आहे, हे त्यांना लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. शिंदे, फडणवीस यांच्यात झालेल्या या बैठकीला जागावाटपाची शिखरपरिषद असे म्हटले जात आहे. भाजप व शिवसेनेच्या यावेळी उपस्थित मंत्र्यांनी आपापली बाजू भक्कमपणे लावून धरली होती. मराठवाड्यातील हिंगोली, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले या जागांवर नाराजीचा सामना करावा लागणार आहे, असे लक्षात आणून देण्यात आले.

रामटेक हा मतदारसंघ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रात येतो तरीही शिंदे यांचा मान राखण्यासाठी राजू पारवे यांना ते भाजपकडून लढण्यास इच्छुक असताना शिवसेनेकडे पाठवण्यात आले. आता सातारा, पालघर या दोन मतदारसंघातील जिंकू शकणारे चेहरे शिवसेनेची उमेदवारी घ्यायला तयार नाहीत, हे समजून घ्यावे, असेही विनवण्यात आले असल्याचे समजते. कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचा आहे. तो ज्या ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो तो आम्हाला द्या, असा शिवसेनेचा आग्रह आहे.

मात्र पालकमंत्री असलेल्या क्षेत्रातील रामटेकसाठी १०५ आमदार असलेले फडणवीस समजूतदारपणे वागतात तर शिंदेसाहेबांनीही वस्तुस्थिती लक्षात घेण्यात हरकत ती काय, असे विधान भाजपच्या एका मंत्र्याने या बैठकीत केल्याची गरमागरम चर्चा आज सुरु होती. सिंधुदुर्ग रत्नागिरीत नारायण राणे हे किरण सामंत यांच्यापेक्षा सरस उमेदवार आहेत असेही या वेळी सांगण्यात आले.

Lok Sabha Election 2024
Congress Tax Notice: काँग्रेससमोरील आव्हाने संपेना! आयकर विभागाची नवी नोटीस, भरावा लागणार 3500 कोटींचा कर

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातील आकडेवारी समजून घेतली आहे. किरण सामंत त्यांचे भाऊ आहेत. नाशिकमध्ये शिंदे गटाकडे असलेले खासदार हेमंत गोडसे जिंकू शकत नाहीत, अशी माहिती भाजपने दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला माळी उमेदवार असेल तर मराठा मते मिळणार नाहीत, असे कारण देत शिंदे गटाने विरोध करताच भाजपने १२ मराठा उमेदवार दिले आहेत, त्यामुळे चिंता नको, असे सुनावले गेल्याचेही समजते.

निर्णयाविना बैठक संपली...

भाजपने घेतलेल्या चढाईच्या या पवित्र्यानंतर बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. चार ते पाच जागांचे निर्णय व्हायचे आहेत, अशी कबुलीही फडणवीस यांनी दिली. मात्र शिवसेना शिंदे गटाने आज अधिक आक्रमक होत १६ जागा हव्यात, अशी भूमिका जाहीरपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही या सर्व जागा जिंकू शकतो असा आत्मविश्वास पक्षप्रवक्ते शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. आता या वादावर दिल्लीतून तोडगा निघतो की युतीधर्मासमोर मान तुकवावी लागते याकडे भाजपचे लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2024
Madha Lok Sabha 2024: माढ्यातील उमेदवारीचा तिढा कायम, शरद पवारांच्या डोक्यात काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com