स्थानिक मुद्दे बासनात, राष्ट्रीय मात्र चर्चेत
स्थानिक मुद्दे बासनात, राष्ट्रीय मात्र चर्चेतSakal

Lok Sabha Poll : स्थानिक मुद्दे बासनात, राष्ट्रीय मात्र चर्चेत; नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघातील चित्र

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला. पश्चिम विदर्भातील पाच तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली या तीन मतदारसंघाचा यात समावेश आहे.

मराठवाड्यातील या टप्प्यातील निवडणूक प्रचारातील सभांत राष्ट्रीय व राज्यपातळीवरील नेत्यांच्या भाषणांतून स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. राष्ट्रीय मुद्दे व आरोप प्रत्यारोपांची राळ मात्र जोरदार उठविण्यात आली.

नांदेडमध्ये मराठा आरक्षणाची चर्चा

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील प्रचार उमेदवार आणि विकासकामांच्या मुद्द्यांपेक्षा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्याभोवतीच फिरला. कॉँग्रेस सोडून त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश, हे त्यामागचे कारण होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभाही गाजल्या. मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर प्रचारात चर्चा झाली पण फारसा जोर नसल्याचे दिसले.

नांदेड मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात असून महायुतीतर्फे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर, महाआघाडीतर्फे कॉँग्रेसने वसंतराव चव्हाण यांच्यात मुख्य लढत आहे. वंचितचे उमेदावर ॲड. अविनाश भोसीकर यांच्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष, ‘वंचित’कडूनही त्यांच्यावर टिकेचे बाण सोडण्यात आले. मात्र त्याला अशोक चव्हाण यांच्यासह भाजपने प्रत्युत्तर दिले. काही ठिकाणी चव्हाण यांच्या कार्यक्रमांत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला.

मात्र, शेवटच्या टप्यात काही मराठा संघटनांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. २०१९ च्या निवडणूक प्रचारात मराठा फॅक्टरचा जोर होता. आताच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. यावेळेसह मुस्लिम, दलित, मराठा आणि ओबीसी यावर विशेष जोर असल्याचे प्रचारात दिसून आले. राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरले त्याचबरोबर स्थानिक मुद्यांमध्ये बेरोजगारी, उद्योग, मजुरांचे वाढते स्थलांतराचा मुद्दा चर्चेचा ठरला.

कोहळीकर व आष्टीकर यांच्यात लढत

हिंगोलीः हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी गाठीभेटी, कोपरा सभा यावरच भर दिला आहे. यावेळी प्रचारात स्थानिक मुद्दे दुर्लक्षित झाल्याचे दिसले. राष्ट्रीय मुद्देच चर्चेत होते. मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर व शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात मुख्य लढत आहे..

उद्योग नसलेला जिल्हा म्हणून हिंगोली ओळखला जातो. यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. स्थलांतरामुळे गावे ओस पडतात. हळद संशोधन केंद्र उभे राहणार असले तरीही दुसरे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगांबाबत नुसतीच आश्वासनांची खैरात आहे. शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा अभाव आहे.

या प्रश्नांवर बोलताना कोणी दिसले नाही. राष्ट्रीय पातळीवरील मुद्देच चर्चेत आले. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा, अभिनेता गोविंदा यांचा रोडशो झाला. ‘वंचित’कडून ॲड प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी स्थानिक नेत्यांनी सभा घेण्याचा सपाटा लावला.

या तिन्ही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढीसाठी प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती करण्यात आली. विविध उपक्रम राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी गृहमतदानाची व्यवस्था असल्याने त्यासाठीही प्रशासनाने कंबर कसली आहे.

परभणीत बाहेरचा उमेदवार, मराठा, ओबीसी...

परभणीः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलेल्या परभणी मतदारसंघात दोनवेळा खासदारकी भुषविलेल्या खासदार संजय जाधव व महायुतीतील राष्‍ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यात थेट लढत होत आहे.

गतवेळी दोन्ही उमेदवार मराठा होते. यावेळी मराठा व ओबीसी असे उमेदवार समोरासमोर आहेत विकासापेक्षाही विशेषत: स्थानिक व आयात उमेदवार अशा संघर्षाबरोबरच मराठा व ओबीसी या मुद्यावरच प्रचार रंगला. महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखलकरतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मोदी यांनी स्थानिक काही मुद्द्यांचा उल्लेख केला. मतदारसंघातून जाणारे राष्ट्रीय, राज्य महामार्ग व शहरातंर्गत रस्ते, सिंचन हे मुद्दे प्रभावी ठरल्याचे दिसले. संजय जाधवांसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या सभा झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com