BJP Party : केंद्रात केंद्रस्थानी अन्‌ राज्यातही!

भारतीय जनता पक्ष आज देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्षही भाजप.
Solapur Narendra Modi Speed Crowd
Solapur Narendra Modi Speed Crowdsakal

भारतीय जनता पक्ष आज देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्षही भाजप. केंद्रात जसा भाजपचा एकछत्री अंमल सुरु आहे तसा तो महाराष्ट्रातही व्हावा, यासाठी ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे.

देशाने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर गेल्या ७५ वर्षात राजकारणात झालेले बदल स्पष्ट आहेत.

सत्तेचा लंबक डाव्या समाजवादी रचनेकडून उजव्या हिंदुत्ववादी विचारावर स्थिरावला आहे. भाजपने दोन खासदार ते ३०३ खासदार असा केलेला प्रवास विलक्षण आहे. संघपरिवारातील कार्यकर्ते हा या पक्षाचा कणा. आता सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येण्याचे स्वप्न पाहताना भाजप कोणतीही कसर सोडायला तयार नाही. वातावरण अनुकूल असल्याने आता स्वबळावर ३७० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

भारताच्या गंगायमुना पट्ट्यातील राजकीय वातावरण भाजपमय आहे, पण दक्षिणेत दिग्विजय करणे हे भाजपसमोरचे आव्हान आहे. या निवडणुकीत प्रत्येक राज्यासाठी भाजपने वेगवेगळे नियोजन केले असून २०३० पर्यंतचा आराखडा नेत्यांनी निश्चित केला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार आमदार निवडून आले असले तरी गेल्या चार वर्षातल्या घडामोडींमुळे भाजपसाठी ‘प्रश्नप्रदेश’ आहे.

कित्येक वर्षांचा साथीदार असलेल्या शिवसेनेने विश्वासघात करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष फुटले. आता यातल्या दोन तुकड्यांना सांभाळून घेत भाजपला महाराष्ट्रात राजकारण करायचे आहे अन ३७०/ ४०० च्या मोदींनी केलेल्या घोषणेत योगदान द्यायचे आहे.

महाराष्ट्रात भाजपची ताकद प्रत्येक विरोधक मान्य करतो आहे. पक्षाला महाशक्ती म्हणतो आहे. पण विस्तारण्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’ या यंत्रणांचा वापर करत अन्य पक्षातल्या बलवान नेत्यांना जेरीला आणायचे अन् मग आपल्यात घेत अभय देण्याचा मार्ग पत्करला जातो आहे, असा आरोप केला जात आहे.

पक्ष फोडणे या आरोपाखालोखालचा भाजपवरचा दुसरा ठपका म्हणजे बाहेरच्यांना पक्षात महत्त्व देणे. बाहेरच्यांना स्थान देण्याचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. साखर कारखाने, खरेदीविक्री संस्थांना सत्तेचे संरक्षण पाहिजे, यासाठी सत्तेचे वारकरी पक्ष ‘हायजॅक’ करताहेत आणि याचे कार्यकर्त्यांना दुःख आहे, पण पक्षाने आजवर अप्राप्य मानलेले कलम ३७०, राममंदिर यासारखे प्रश्न सोडवू शकणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या शब्दांसाठी हे सगळे सहन करायला हवे, याची जाणीवही आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आलेल्या खासदार-आमदारांना सांभाळणे, त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणे, अयोग्य वर्तणूक खपवून घेणे, अजित पवार यांच्यावरील आरोपाबाबत बोलले जात असताना त्यांना समवेत घेणे हे कार्यकर्त्यालाच नव्हे तर कोअर मतदारालाही आवडलेले नाही. मात्र मोदींना पुन्हा निवडून देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप कामाला लागली आहे.

प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्ते, प्रत्येक मतदारसंघात ५० टक्के मते मिळवण्यावर भर अशा अनेक नियोजनांसह भाजपला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या लोकसभेदरम्यान पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com