Ambadas Danve : उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही

उद्धव ठाकरे हाच माझा पक्ष असल्याचा दावा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना केला.
ambadas danve
ambadas danvesakal

वरची फळी काही प्रमाणात गेली असली तरी पाया आमच्याकडे आहे. जे निघून गेले ते गद्दार होते, त्यांचा विचारही न करता पुन्हा शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या आहेत. माझीही निवडणूक लढण्याची इच्छा होती अन् आहे. याआधी अनेकदा मला डावलण्यात आले, पण आपण कधीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. उद्धव ठाकरे हाच माझा पक्ष असल्याचा दावा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना केला.

प्रश्न - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते तुम्ही आहात. लोकसभेची उमेदवारी तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही पक्ष सोडत आहात अशी शक्यता वर्तविली जात आहे, या चर्चेत किती सत्यता आहे?

दानवे - मी पक्ष सोडणार नाही. पक्ष सोडण्याच्या चर्चेमध्ये अजिबात तथ्य नाही. मी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा शिलेदार, कडवट शिवसैनिक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. दुसरा मुद्दा असा की मला लोकसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढविण्याची आजच नव्हे तर मागील दहा वर्षांपासूनची इच्छा आहे. माझी इच्छा पक्षप्रमुखांकडे मी व्यक्त केली आहे. इच्छा व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी यापूर्वी पण छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढविली आहे, ते अनेकदा जिंकले आहेत. त्यांचा २०१९ मध्ये पराभवही झाला आहे. आम्ही एकाच जागेवर दावा करतोय हे ही खरे आहे. ते मला अनेकदा डावलण्याचा प्रयत्न करतात. एका घरात दोन भावांमध्ये स्पर्धा असते हा तर एकच मतदारसंघ आहे. मात्र खैरेंसाठी किंवा खैरेंमुळे मी शिवसेनेत नाही, त्यांना कंटाळून मी माझा पक्ष सोडणारही नाही. पक्षाने मला उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. यामुळे तुम्ही विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत दिले आहे, असे वाटत नाही का?

- पक्षांतर्गत भूमिका मांडणे, इच्छा व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच असते. सुदैवाने आम्ही उद्धवजींकडे आमचे मत मांडू शकतो आणि ते ऐकूनही घेतात. लोकसभा लढवायची इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. आईदेखील रडल्याशिवाय बाळाला दूध पाजत नाही, त्यामुळे तुमच्या इच्छा वरिष्ठांकडे व्यक्त केल्याच पाहिजेत. त्यांनी काहीही निर्णय घेतला तरी पक्षाचे काम करतच राहणार. विरोधक याचा कसा उपयोग करतील? हे माझ्या हातात नाही. विरोधकांना वाजवायला काही ना काही तरी तुणतुणे हवेच असते त्याची काळजी मी करत नाही.

शिवसेनेसाठी २०१९ पेक्षा २०२४ ची लोकसभा निवडणूक फार वेगळी आहे. शिवसेना दीड वर्षांपूर्वी पूर्णतः दुभंगली होती, शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे झालेले नुकसान भरून निघाले आहे का?

- शिवसेना पुन्हा शंभर टक्के नव्याने उभी राहिली आहे. वरची फळी काही प्रमाणात गेली असली तरी पाया आमच्याकडे आहे. जे निघून गेले ते गद्दार होते, त्यांचा विचारही न करता पुन्हा शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या आहेत. तरुणांचे मोठे नेटवर्क आमच्याकडे उभे राहिले आहे. सर्व पातळीवर तरुण नेतृत्व आणण्यावर आम्ही भर दिला आहे. विरोधक पैशाचा वापर एखाद्या मर्यादेपर्यंत करू शकतात पण कडवट शिवसैनिक कुठेही गेलेला नाही, ते उद्धव ठाकरेंसोबतच आहेत.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काहींनी तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीही संवाद साधत नव्हते, त्यांची भेटही होत नसे असे आक्षेप बंडखोर नेत्यांनी घेतले होते. हे आक्षेप खरे होते का?

- ज्यांना उद्धवजींची साथ सोडायची होती त्यांना काही तरी कारण हवे होते. प्रत्यक्षात राज्यातील खेडेगावातील कोणताही शिवसैनिक उद्धवजींशी संपर्क साधू शकतो. त्यांना पक्षातील लहानसहान गोष्ट माहिती असते, त्यांचा आमच्यापासून सामान्य शिवसैनिकांपर्यंत संवाद आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसादच बोलका आहे. नेता जर संवाद साधणारा नसेल तर हा प्रतिसाद त्यांना मिळणारच नाही. शिवसैनिकांना त्यांच्याविषयी ‘आपलेपणा’ वाटतो. उद्धवजींवर दबाव आणण्यासाठी त्यांच्यावर आक्षेप घेतले गेले पण ते ‘ठाकरे’ आहेत. ते असे कोणाच्याही दबावाखाली येणार नाहीत.

महाविकास आघाडीसोबत प्रथमच शिवसेना निवडणुकीला सामोरे जात आहे, कशाप्रकारचा प्रतिसाद जनतेकडून मिळतो? यशाची कितपत खात्री वाटते?

- पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’लाही राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जुमलेबाजीला जनता वैतागली आहे. त्याची प्रतिक्रिया मतपेटीतून व्यक्त होईल. महाराष्ट्रात किती जागा मिळतील? हे एवढ्यात सांगता येणार नसले तरी महायुतीला जितक्या जागा मिळतील त्यापेक्षा किमान एक जागा तरी महाविकास आघाडीला जास्त मिळेल असा माझा दावा आहे.

यंदा मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता फार जास्त आहे. सरकारने मदत जाहीर केली आहे, काय परिस्थिती आहे?

- सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलेला नाही. मराठवाडा, विदर्भातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारी, जेजुरी, सासवडभागात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर १ हजारांच्यावर मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात कोणत्याच प्रकारची मदत दुष्काळी भागात करण्यात आलेली नाही. टंचाईच्या काळात टँकरची परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यायला हवे होते पण ते देण्यात आलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com