Loksabha Election : महायुतीपुढे ‘मविआ’चे आव्हान

लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकाच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीसमोर विरोधकांच्या महाविकास आघाडीने (मविआ) कडवे आव्हान उभे केले असल्याचे पहिल्या टप्प्यातील चित्र आहे.
Loksabha Election
Loksabha Election Esakal

- विजय चोरमारे

लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकाच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीसमोर विरोधकांच्या महाविकास आघाडीने (मविआ) कडवे आव्हान उभे केले असल्याचे पहिल्या टप्प्यातील चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडून त्यातील बहुतांश नेते भाजपसोबत सत्तेत गेले असले तरीही महाविकास आघाडीने आपले आव्हान टिकवून ठेवल्याचे आतापर्यंतच्या अनेक सर्वेक्षणांवरून दिसून आले आहे.

लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची पुरती वाताहत झाली होती. भाजपने २०१४च्या निवडणुकीत २३ जागा (२७.१६ टक्के मते), शिवसेना १८ जागा (२०.८ टक्के), राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा (१६.१ टक्के), काँग्रेस २ जागा (१८.३ टक्के) जिंकल्या होत्या. महायुतीच्या पाठिंब्यावर २०१४ मध्ये ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले होते.

२०१९ला मतांच्या टक्केवारीमध्ये आणि जागांमध्येही फारसा फरक पडला नाही. भाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस, एमआयएम यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. अमरावतीची जागा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष नवनीत राणा यांनी जिंकली, परंतु त्यांनी नंतर ‘एनडीए’ला पाठिंबा दिला. दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार हे संख्याबळ कायम राहिले.

काँग्रेसला २०१४ मध्ये नांदेड आणि हिंगोलीची जागा मिळाली होती. २०१९ मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर यांची चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसला मिळाली होती. मधल्या काळात त्यांचे निधन झाले. गेल्यावेळी भाजप-शिवसेनेला मिळालेल्या ४१ जागा आणि आता अमरावतीच्या नवनीत राणा यांच्यासह ४८ पैकी ४२ एवढे संख्याबळ महायुतीकडे आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतरही तिथपर्यंत पोहोचत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडण्यात आली. त्यानंतरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाजूने असलेल्या सहानुभूतीमुळे महाविकास आघाडीसाठी वातावरण चांगले असल्याचे अनेक सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे. त्याचवेळी गेल्यावेळचे संख्याबळ टिकवितानाच ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीच्या नेत्यांनी वेळोवेळी केला आहे.

‘वंचित’ला लक्षणीय मते

२०१४च्या तुलनेमध्ये २०१९मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची परिस्थिती चांगली होती, परंतु वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आठ उमेदवार पराभूत झाले होते. ‘वंचित’च्या काही उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. त्यात प्रामुख्याने अकोला ( २,७८,८४८), बुलडाणा (१,७२,६२६), नांदेड ( १,६६,१९६) परभणी (१,४९,९४७), गडचिरोली (१,११,४६८), सोलापूर (१,७०,००७), सांगली ( ३,००,२३४), हातकणंगले (१२३४१९) या मतदारसंघांतील निकाल वंचित बहुजन आघाडीमुळे बदलले होते.

हिंगोलीमध्येही ‘वंचित’च्या उमेदवाराला १ लाख ७४,०५१ मते मिळाली होती. गेल्यावेळी वंचितमुळे मोठा फटका बसल्याने यावेळी प्रारंभापासून महाविकास आघाडीतील नेते या पक्षाला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र अद्याप वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाची कोंडी फुटलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com