वंचित, ‘एमआयएम’कडे लक्ष; भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गुरूवारी (ता. चार) शेवटचा दिवस आहे. दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना फक्त कॉँग्रेस आणि भाजपचा उमेदवार जाहीर झाला आहे.
pratap chikhalikar and vasantrao chavan
pratap chikhalikar and vasantrao chavanSakal

नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गुरूवारी (ता. चार) शेवटचा दिवस आहे. दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना फक्त कॉँग्रेस आणि भाजपचा उमेदवार जाहीर झाला आहे. अजूनही वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि इतर पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर नुकतेच कॉँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आता भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असून त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या मतदारसंघात नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. महाआघाडीकडून कॉँग्रेसतर्फे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची तर महायुतीत भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

अर्ज भरण्यासाठी आता फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत. या दोन दिवसांत वंचित व एमआयएमच्या उमेदवारांची नावे निश्चित होतील. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, कॉँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी आपणास ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याचे सांगितल्यानंतर ‘वंचित’च्या वतीने अजूनही कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर सकल मराठा समाजाने उमेदवार दिला नसला तरी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कोणाकडे कल राहणार, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. त्याशिवाय दलित, मुस्लिम व ओबीसी समाजाची भूमिका काय राहील, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

चव्हाण यांची भूमिका महत्वाची

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना तातडीने राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली. त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेला नांदेड जिल्हा ढासळला आहे. भाजपची बाजू बळकट झाली आहे.

चव्हाण यांच्याबरोबरच डॉ.जित गोपछडे यांच्या रूपाने दुसरा एक खासदारही भाजपला लाभला आहे. त्यामुळे नांदेड मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकविण्याची अधिक जबाबदारी चव्हाण यांच्यावर आली आहे. भविष्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तर केंद्रातील मंत्रिपदाची माळ अशोकरावांच्या गळ्यात पडू शकते. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाणांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

विरोधकांना मिळाली पाच वेळा संधी

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९५२ पासून ते आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर १९५७ हरिहरराव सोनुले (शेड्युल कास्ट फेडरेशन), १९७७ ला केशवराव धोंडगे (शेकाप), १९८९ ला डॉ. व्यंकटेश काब्दे (जनता दल), २००४ ला डी. बी. पाटील (भाजप) आणि २०१९ ला प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) या विरोधी पक्षातील नेत्यांना खासदार होण्याची संधी मिळाली आहे.

बाकी पूर्णतः नांदेड लोकसभा मतदारसंघावर कॉँग्रेसनेच अधिराज्य गाजवल्याचा इतिहास आहे. डॉ. शंकरराव चव्हाण, व्यंकटराव तरोडेकर, अशोक चव्हाण यांना प्रत्येकी दोन वेळा तर भास्करराव पाटील खतगावकर यांना तीन वेळा खासदार होण्याची संधी मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com