Loksabha Election 2024 : काँग्रेसमधील ‘इनकमिंग’ने बदलताहेत हरियानातील समीकरणे ; माजी मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह यांच्या प्रवेशाने काँग्रेसची स्थिती मजबूत

गेल्या काही दिवसांत हरियाना राज्यामधील नेत्यांचे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असल्याने ‘आयाराम गयाराम’साठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यातील काँग्रेसची स्थिती अधिक मजबूत होताना दिसत आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत हरियाना राज्यामधील नेत्यांचे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असल्याने ‘आयाराम गयाराम’साठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यातील काँग्रेसची स्थिती अधिक मजबूत होताना दिसत आहे. हरियानातील माजी केंद्रीय मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हरियानातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.

हरियाना हे राज्य घराणेशाहीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जाट नेतृत्वाने या राज्यावर नेहमीच प्रभाव टाकला आहे. चौधरी वीरेंद्रसिंह गेल्या ४० वर्षांपासून हरियानातील राजकारणावर प्रभाव टाकणारे जाट नेता आहेत. विशेष म्हणजे त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांच्यावर अद्यापही गैरव्यवहाराचा एकही आरोप झालेला नाही.

परंतु भाजपतर्फे गेल्या १० वर्षांपासून जाट नेतृत्वाला काहीसे बाजूला करण्याचे जी खेळी खेळली जात आहे. या विरोधात आता नाराजी बाहेर येऊ लागली आहे. मनोहरलाल खट्टर यांना अचानकपणे मुख्यमंत्री करणे व आता पुन्हा ओबीसी असलेल्या नायाब सिंग सैनी यांना मुख्यमंत्रिपदाची माळ दिल्याने जाट नेतृत्व नाराज झाले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे वडील चौधरी वीरेंद्रसिंह काँग्रेसमध्ये येतील, हे स्पष्ट होते. खासदार ब्रिजेंद्र सिंग हे १९९८ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. सनदी सेवा सोडून त्यांनी २०१९ मध्ये हिस्सारमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु भाजपने शेतकरी व महिला कुस्तीपटूंच्याबाबत घेतलेल्या भूमिकाबाबत भाजपच्या धोरणाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्याचवेळी त्यांची उमेदवारी कापली जाईल, हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे त्यांना संकेत मिळाले होते.

काही नेते उंबरठ्यावर

चौधरी वीरेंद्रसिंह हे जिंद, हिस्सारसह हरियानातील अनेक भागावर आपला प्रभाव टाकणारे जाट नेता आहेत. यामुळे काँग्रेसला या नेतृत्वाचा येत्या लोकसभा निवडणुकीत व पुढील सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गणित बिघडविणारे ठरणार आहे. वीरेंद्रसिंह यांच्यासोबत भाजपचे काही आमदारही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

परंतु विधानसभेला आणखी सहा महिने शिल्लक असल्याने ते लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. वीरेंद्रसिंह यांच्या काँग्रेस प्रवेशाला माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुड्डा, प्रदेशाध्यक्ष उदय भान, दलित नेत्या कुमारी शैलजा, खासदार रणदीप सिंग सुरजेवाला हे सर्व हरियानातील नेते मंडळी एकत्र आल्याने हरियानातील राजकीय गणित झपाट्याने बदलण्याचे संकेत मिळाले आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com