Interview Of Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात मोदींविरोधी प्रचंड लाट

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सध्या विदर्भातील प्रचारात व्यग्र आहेत. चंद्रपूरच्या उमेदवारीवरून त्यांची नाराजी, भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा अशा मुद्द्यांसह काँग्रेसच्या राज्यातील विशेषतः विदर्भातील स्थितीसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.
Interview Of Vijay Wadettiwar
Interview Of Vijay WadettiwarSakal

- विजय चोरमारे

प्रश्नः विदर्भात काँग्रेसची स्थिती कशी आहे?

वडेट्टीवार ः विदर्भात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचंड मोठी लाट आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधा-यांच्या विरोधात रोष आहे. आणीबाणीनंतर देशात जशी एक लाट आलेली होती, तशी लाट सध्या मोदींच्या विरोधात विदर्भात पाहावयास मिळते. सगळीकडे आम्हाला लोकांचा भरपूर पाठिंबा मिळतो आहे. सगळीकडे स्वागतासाठी लोक गर्दी करीत आहेत. सभांची मागणी करताहेत. रस्त्याने जाताना नमस्कारासाठी जोडलेला हात खाली घेता येत नाही, असा लोकांचा प्रतिसाद मिळतोय. लोकांच्या अशा पाठिंब्यावर विदर्भातील पाचही जागा आम्ही जिंकत आहोत.

प्रचारातील तुमचे मुद्दे कोणते आहेत?

-प्रचारात आम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर म्हणजे आमच्या न्यायपत्रावर लक्ष केंद्रित करत आहोत. त्याशिवाय मोदी सरकारचे अपयश लोकांपुढे मांडतोय. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात महागाई प्रचंड वाढवली, बेरोजगारी कमी झाली नाही,

चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावल्यामुळे जीवनावश्यक वस्तू महागल्या, शेतक-यांच्या हमीभावाचा पत्ता नाही. खते, बियाणे, कीटकनाशके सगळ्यांचेच दर वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी ४९५ रुपयांना मिळणारी खताची बॅग आता पंधराशेवर गेली आहे.

डिझेल महागल्यामुळे नांगरणीसाठीच्या ट्रॅक्टरचा तासाचा दर चारशेवरून एक हजारावर गेला आहे. अनेक बाजूंनी आर्थिक कोंडी झाल्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतक-यांचे असे विविध प्रश्न आम्ही सातत्याने मांडतोय.

काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो....

-प्रत्यक्षात मोदींच्या दहा वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचार आकाशाला भिडलाय. राज्यसरकारनेही भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. असे असताना भ्रष्टाचारावरून बदनाम केले जाते ते काँग्रेसला. सरकारी कंपन्या विकून अदानी,

अंबानी यांची संपत्ती वाढवण्याचे उद्योग सुरू आहेत. एकीकडे हिंदुत्वाचा बाजार मांडायचा आणि दुसरीकडे गोमांस निर्यात करणा-या व्यापा-यांकडून भाजपसाठी इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोट्यवधींच्या देणग्या घेतल्या जातात. त्यांचे हिंदुत्वही नकली असल्याचे यावरून दिसून येते.

महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील?

-आजचे चित्र पाहिले तर राज्यात महाविकास आघाडीला ३२ जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जनसमर्थनाचा असा पूर आलाय, की त्यात भाजप आणि महायुती वाहून जाईल. लोकांच्या रोषापुढे ते टिकूच शकणार नाहीत, याची मला खात्री आहे.

काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असताना तुम्ही जागावाटपात दुय्यम भूमिका घेतल्याची टीका होत आहे.

-२०१९ मध्ये आमच्याकडे एकच जागा होती. त्यामुळे जागानिहाय आग्रह धरणे कठीण होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कुणी किती जागा लढवायच्या यापेक्षा ‘इंडिया’ आघाडी मजबूत होण्याला आम्ही प्राधान्य दिले. केंद्रातील हुकूमशाही आणि जुलमी सरकार घालवण्यासाठी दोन पावले मागे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला.

जागावाटपातील मतभेदानंतर एकजुटीने प्रचार शक्य होईल का?

-आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जागावाटप जाहीर केले, तिथे सगळे मतभेद संपले. लगोलग आम्ही सगळे एकजुटीने प्रचाराला लागलो आहोत. तिन्ही पक्षांचे नेते एका मंचावरून प्रचार करीत आहेत. राहुल गांधी यांच्या सभेला सगळ्या पक्षांचे नेते होते. मतभेद मागे पडून संयुक्तपणे प्रचार सुरू झाला आहे.

तुम्ही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होतात

-मी काँग्रेस पक्षासाठी झटून काम करतोय, त्यामुळे लोकसभेला आमच्या पक्षाचा जनाधार वाढत चाललाय. मी जी मेहनत, कष्ट करून पक्षाला बळ देण्याचे काम करतोय, त्यामुळे विचलित झालेले विरोधक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा अफवा पसरवत असतात. परंतु त्यात तथ्य नसल्याचे कार्यकर्त्यांना आणि लोकांनाही आता कळून चुकले आहे.

चंद्रपूरच्या जागेवरुनही तुम्ही नाराज होता...

-चंद्रपूरच्या जागेची मागणी आम्ही केली होती, हे खरे आहे. तिकीट वाटपाच्या आधीची ती प्रक्रिया होती, त्यात काही चूक नाही. पक्षाने प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि माझ्यादृष्टिने उमेदवारीचा विषय संपला.

मी पक्षाचा नेता असल्यामुळे मला नाराज होण्याचा अधिकार नाही. इतरांची कुणाची नाराजी असेल तर ती दूर करून संबंधितांना पक्षाच्या कामाला लावणे ही माझी जबाबदारी आहे. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसचा विजय नक्की आहे, परंतु ही जागा अधिकाधिक मताधिक्क्याने कशी निवडून येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com