Deepak Kesarkar : शिंदे सरकारचे काम हेच आमचे बळ

शिवसेना (शिंदे गट) पक्षाला लोकसभेसाठी मिळणा-या जागांसंदर्भात अनेक संभ्रम आहेत.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsakal

शिवसेना (शिंदे गट) पक्षाला लोकसभेसाठी मिळणा-या जागांसंदर्भात अनेक संभ्रम आहेत. पक्षात नाराजी आहे. त्यापलीकडे जाऊन राज्य सरकारचे काम आणि नरेंद्र मोदींचे नेतृत्व अशा दोन्ही मुद्यांवर निवडणुकीला सामोरे जाण्याचा पक्षाचा निर्धार आहे. त्याअनुषंगाने पक्षाचे नेते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत.

प्रश्न - लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे आहेत?

दीपक केसरकर - विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अल्पावधीतच विकासाची दृष्टी असणारे मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांनी दीड वर्षांत मुख्यमंत्री म्हणून ५० कॅबिनेट घेताना जवळपास पाचशे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काही दिवसापूर्वीच शेतकऱ्यांसाठी सोयाबीन व कापूस खरेदीसाठी २००० कोटी रुपये, काजूसाठी ३०० कोटी तसेच महिला बचत गटासाठी भांडवल दुप्पट केले.

आरोग्य सेविकांना पाच हजार रुपये वाढीव वेतन, महिलांसाठी एसटी प्रवास मोफत, मराठा आरक्षणाचा निर्णय, माझी शाळा सुंदर शाळा, एक रुपयात पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीतून कोट्यवधीची मदत अशा शेकडो जनहिताच्या निर्णयामधून शिंदे यांनी पक्ष बळकट केला आहे.

पक्ष म्हणून कोणती आव्हाने वाटतात?

- सर्वात महत्त्वाचे संघटना वाढवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. आगामी काळात गाव,तालुका जिल्हा पातळीवर काम करतांना, स्थानिक लोकप्रतिनिधीसहित खासदार व आमदारांचा आकडा मोठया संख्येने वाढला पाहिजे, यासाठी आम्ही संघटनेवर अधिक काम करणार आहोत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे किती आव्हान तुम्हाला वाटते?

- मला फार काही आव्हान वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार सहानुभूतीचा खेळ खेळत आहेत. सहानुभूतीच्या नावाखाली विकासाच्या लाटेला रोखण्याचेही पाप ही मंडळी करत आहे. सध्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षात गोळाबेरीज केली आहे. जातीपाती करणारे पक्षही ठाकरे यांनी सोबत घेतल्याने त्यांची राजकीय प्रतिमा मलीन झाली आहे. ठाकरे हे शंभर टक्के खोटे बोलतात. ज्यावेळी ठाकरे गटातील शिवसैनिकांना हे लक्षात येईल त्यावेळेस त्या गटातील उरलेले शिवसैनिक शिंदे यांच्या समवेत असतील.

लोकसभेसाठी किती जागा मिळतील आणि जागावाटपावर तुम्ही समाधानी आहात का?

- राष्ट्रवादी कॉँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील होण्याच्या आधी निश्चितच लोकसभेतील जागांचा मोठा वाटा आमचा होता. मात्र अजित पवार आल्यानंतर महायुतीतील समन्वय टिकवण्यासाठी व पवार यांचाही सन्मान राखण्यासाठी आम्हाला तोडजोड करावीच लागेल. प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यमान खासदारांच्या १३ जागा राहतीलच मात्र अजूनही काही वाढीव जागा आम्हाला मिळतील. किती जागा लढवल्या याच्यापेक्षा किती जागा निवडून आणल्या हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

लोकसभेसाठी तुमचा वापर करून विधानसभा निवडणुकीत एकटे पाडले जाईल अशी भीती वाटते का?

- भाजपने कमी जागा असतानाही शिंदे यांना मुख्यमंत्री केले. तीच परिस्थिती बिहारमध्येही आहे. २०१९ साली मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या ८२ व तत्कालीन शिवसेनेच्या ८४ जागा असतानाही महापौर पदासहित सर्व पदे शिवसेनेला दिली. त्यामुळे हे सर्व आरोप खोटे आहेत.

मराठा आरक्षणाचा आपल्या पक्षाला फायदा होईल का?

- चौदा दिवसांत अडीच कोटी मराठा समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण शिंदे सरकारने केले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणे हा आमच्या सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्रेही आम्हीच मिळवून दिली. तरीही मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम विरोधक करीत आहेत, मात्र मराठा समाज शिंदे सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील.

राष्ट्रवादीचा तुम्हाला तोटा की फायदा?

- उपमुख्यमंत्री अजित पवार हे उत्कृष्ट प्रशासक व संघटक आहेत. त्यामुळे त्यांचा सरकारला तर फायदा होतोच मात्र एकूणच महायुतीची ताकद वाढण्यामध्येही त्यांची मदत होते. त्यामुळे त्यांचा तोटा असण्याचे काही कारण नाही.

नारायण राणे यांच्याशी जुळवून घेताना आपण कोणत्या मुद्द्यांचा विचार केला?

- नारायण राणे यांच्याबरोबर वैयक्तिक वाद कधीच नव्हता. जो होता तो वैचारिक वाद होता. त्यांची आक्रमक शैली मला मान्य नव्हती. मात्र कोकणाच्या विकासाच्या मुद्यावर एकत्र आलो आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com