Loksabha 2019 : आश्वासनांच्या खैरातीत शेतकरी कोरडा; तमिळनाडूत मूलभूत प्रश्नांकडे सर्वच पक्षांची पाठ 

सुरेंद्र पाटसकर
गुरुवार, 11 एप्रिल 2019

- तामिळनाडूतील सगळ्या पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे," शेतकरी नेते पी. आर. पंडियन. 
- : "कावेरी, मुल्लई पेरीयार पाणीप्रश्न, शेतकऱ्यांवरील कर्जे, नव्या प्रकल्पांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान.

मन्नारगुडी (जि. तिरुवारूर, तमिळनाडू) : "कावेरी, मुल्लई पेरीयार पाणीप्रश्न, शेतकऱ्यांवरील कर्जे, नव्या प्रकल्पांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान अशा प्रश्नांची मालिका आहे. पण याकडे कोणाचेच लक्ष नाही. सगळ्या पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे," शेतकरी नेते पी. आर. पंडियन कळकळीने सांगत होते. 

पंडियन हे `तमिळनाडू ऑल फार्मर्स असोसिएशन`चे समन्वयक आहेत. तमिळनाडूमध्ये सर्व 39 मतदारसंघात एकाच टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मूलभूत समस्यांना पंडियन यांनी हात घातला. तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी 100 दिवस राज्यातील प्रश्नांबाबत दिल्लीत आंदोलन केले. त्याच्या समन्वय समितीतही पंडियन होते. कर्जात सवलत आणि दर निश्चिती या दोन प्रमुख मागण्या होत्या, मात्र आश्वासनांव्यतरिक्त त्यांच्या हातात काहीच पडले नाही.

"दुष्काळामुळे 87 शेतकऱ्यांचे बळी गेले. पंतप्रधानांनी त्यांना ना मदत दिली वा कोणती घोषणा केली. याचा राग शेतकऱ्यांमध्ये आहे. शेजारी राज्यांबरोबरील पाणीवाटपाचा प्रश्नही आहे. संपूर्ण कावेरी खोरे हे संरक्षित कृषी क्षेत्र जाहीर केले जावे, अशी आमची मागणी आहे," पंडियन पोटतिडीकीने सांगत होते. 

कमल हसन यांच्याकडून अपेक्षाभंग 
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंडियन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच कमल हसन यांची भेट घेतली. मात्र सत्तास्पर्धेतील इतर नेत्यांप्रमाणेच त्यांनी भूमिका मांडल्याने, त्यांच्याकडून आता अपेक्षा नाहीत, अशी खंत पंडियन यांनी व्यक्त केली. 

अण्णाद्रमुक-भाजपला फटका शक्य 
"पुदुक्कोट्टई जिल्ह्यात नेदुवसल येथे हायड्रोकार्बन प्रकल्प प्रस्तावित आहे. यात मोठ्या प्रमाणावर शेतजमीन जाणार असल्याने त्याला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. भाजपने या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तंजावूर, तिरुचिरापल्ली, शिवगंगा आणि रामनाथपूरम या मतदारसंघात अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला याचा फटका बसेल. दुसरीकडे काँग्रेसने येथे शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत," असे त्यांचे म्हणणे आहे. पश्चिम घाटांत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळेही हानी होत आहे. सालेम-चेन्नई या आठपदरी रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणालाही मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, या सर्व प्रश्नांचे पडसाद या निवडणुकीत उमटतील, असे पंडियन यांचे म्हणणे आहे. 

अमित शहांची शिष्टाई 
वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध वाराणसीमधून 111 शेतकरी निवडणूक लढवतील, अशी घोषणा आणखी एक शेतकरी नेते पी. अय्यकन्नू यांनी महिन्याभरापूर्वी केली होती. अय्यकन्नू हेही तेथून निवडणूक लढविणार होते. मात्र भाजपाध्यक्ष अमीत शहा यांच्यापुढे त्यांनी लोटांगण घातले. भाजपला मतदान करू नका अशी घोषणा करण्यापर्यंत शेतकरी नेते आले होते, मात्र त्यांनी तशी घोषणा केलेली नाही. आंदोलनाची पुढील दिशा निवडणुकीनंतरच ठरविली जाईल, असे शेतकरी नेते पी. आर. पंडियन यांनी स्पष्ट केले.

Web Title: All political parties in Tamil Nadu Ignoring basic issues