Loksabha 2019 : मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा अधिकारी निलंबित

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

'मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे पालन केले नाही. यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे.'

भुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. 17) निलंबित केले.

1996 मधील बॅचचे आयएएस मोहम्मद मोहसिन असे निलंबीत केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. 16) संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले होते. यावेळी मोहम्मद मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती. या तपासणीमुळे पंतप्रधानांना या ठिकाणी 15 मिनिटे थांबावे लागले. उडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टर तपासणीचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, 'मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे पालन केले नाही. यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे.'

मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. यामुळे त्यांचे निलंबन झाल्याचे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.

दरम्यान, मोदींच्या कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून कथितरीत्या एक काळा बॉक्स नेण्यात आला होता. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chopper search delays PM Modis departure EC suspends IAS officer at Odisha