पंतप्रधानपद सोडा, राहूल गांधींना विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

उत्तर भारतात काँग्रेसचा धुव्वा 
उत्तर भारतात राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये गेल्या डिसेंबरमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आले. मात्र, या तिन्ही राज्यांत भाजपने 2014 च्या निकालाची पुनरावृत्ती केली. छत्तीसगडमध्ये दोन, मध्यप्रदेशात एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली, तर गुजरात व राजस्थानमध्ये सर्व जागा भाजपने जिंकल्या. 2014 मध्ये या चार राज्यांत 91 पैकी भाजपला 88, तर कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. यंदाही तेच आकडे कायम आहेत. 

पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला. 

लोकसभेत किमान दहा टक्के जागा मिळालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद मिळते. 543 खासदारांपैकी किमान 55 खासदार असल्यास त्या पक्षाच्या नेत्याला हे पद मिळू शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 44 जागा मिळाल्यामुळे, कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांना विरोधी पक्षनेते पद मिळाले नव्हते. यंदाही कॉंग्रेसला 51 जागांवरच आघाडी मिळाली आहे. 

भाजपने अमेठीमध्ये राहूल गांधी यांना चांगलेच घेरले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात गांधी यांच्या विरोधात 16 हजार 928 मतांची आघाडी घेतली आहे. मात्र, गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढविली. तेथे त्यांनी आठ लाख 16 हजार मतांची आघाडी मिळविली असून, देशात सध्या हे सर्वांधिक मताधिक्‍य ठरले आहे. 

उत्तर भारतात काँग्रेसचा धुव्वा 
उत्तर भारतात राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये गेल्या डिसेंबरमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आले. मात्र, या तिन्ही राज्यांत भाजपने 2014 च्या निकालाची पुनरावृत्ती केली. छत्तीसगडमध्ये दोन, मध्यप्रदेशात एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली, तर गुजरात व राजस्थानमध्ये सर्व जागा भाजपने जिंकल्या. 2014 मध्ये या चार राज्यांत 91 पैकी भाजपला 88, तर कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. यंदाही तेच आकडे कायम आहेत. 

पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेवर असून, तेथील 13 जागांपैकी त्यांची आठ जागांवर आघाडी आहे. 

दक्षिण भारतात काँग्रेसला यश 
केरळमध्ये डाव्या आघाडीची सत्ता असली, तरी त्यांनी वीसपैकी केवळ एका मतदारसंघात आघाडी मिळाली. उर्वरीत 19 जागांवर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी पुढे आहे. तेथे कॉंग्रेसला 15 जागांवर आघाडी आहे. लगतच्या तमिळनाडूतही कॉंग्रेसला आठ जागांवर मिळाली आघाडी आहे. तेथे द्रमुकसह स्थानिक पक्षांची आघाडी असून, त्यांनी 38 पैकी 36 मतदारसंघात आघाडी मिळविली आहे. 

कर्नाटकात मात्र सत्ताधारी असलेल्या काँग्रेस-जद (सेक्‍युलर) यांचा धुव्वा उडाला असून, तेथे भाजपने 28 पैकी 25 जागा मिळविल्या. कॉंग्रेसला दोन, तर जद (सेक्‍युलर)ला एक जागेवर आघाडी मिळाली. तेलंगणात कॉंग्रेस व भाजपला प्रत्येकी चार जागांवर आघाडी मिळाली असून, आंध्रप्रदेशात दोन्ही पक्षांना एकही जागा मिळाली नाही. 

या व्यतिरिक्त काँग्रेस महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, गोवा, झारखंड, मध्यप्रदेश, आसाम, मेघालय व पॉंडेचरी या राज्यांत प्रत्येकी एक जागा मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress president Rahul Gandhi struggle for opposition leader post in Loksabha