Loksabha 2019: काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक प्रचारात बिर्याणीवरून गोंधळ; 9 जणांना अटक

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

- नसिमुद्दीन सिद्दिकी यांच्या समर्थकांत बिर्याणी खाण्यावरून धुमश्‍चक्री
- अनेक जण जखमी
- 9 जणांना अटक

 मुझफ्फरनगर : बिजनौर मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार नसिमुद्दीन सिद्दिकी यांच्या समर्थकांत बिर्याणी खाण्यावरून झालेल्या धुमश्‍चक्रीत अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, परवानगी न घेता निवडणूक सभेत बिर्याणी तयार केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, 9 जणांना अटक करण्यात आली आहे. 

टडहेडा गावात शनिवारी माजी आमदार मौलाना जमील यांच्या निवासस्थानी निवडणूक सभा आयोजित केली होती. जमील यांनी अलीकडेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक सभेनंतर दुपारी भोजनासाठी बिर्याणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेथे हजर असलेल्या कार्यकर्त्यांत बिर्याणी खाण्यावरून एकच गोंधळ उडाला. गोंधळ आवाक्‍याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले.

पोलिसांनी लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगविले. याप्रकरणी जमील आणि त्यांचा मुलगा नईम अहमदसह 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर गावात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Web Title: Congress supporters clash in UPs Muzaffarnagar over biryani served at election meeting 9 arrested