Loksabha 2019 ः राहुल गांधी यांचा वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

राहुल गांधी यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने खवळलेल्या डाव्या पक्षांनी त्यांच्या पराभवाचा निर्धार केला आहे. जमिनीवर निवडणूक कसे लढतात, हे राहुल गांधी यांना दाखवून देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

वायनाड (केरळ) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

राहुल आणि प्रियांका गांधी बुधवारी (3 एप्रिल) रात्री केरळच्या कोझिकोडमध्ये पोहोचले. यावेळी विमानतळावर केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष की चेन्नीतला, ओमान चांडी, मुल्लापल्ली रामचंद्रन, आययूएमएलचे नेते पी के कुन्हलिकुट्ट आणि ई टी मुहम्मद बशीर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पक्षाचे तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर राहुल आणि प्रियांका विमातळावरुन थेट गेस्ट हाऊसवर पोहोचले.

राहुल गांधी यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने खवळलेल्या डाव्या पक्षांनी त्यांच्या पराभवाचा निर्धार केला आहे. जमिनीवर निवडणूक कसे लढतात, हे राहुल गांधी यांना दाखवून देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. कॉंग्रेसने मात्र राहुल येथून सहज विजयी होतील, असा दावा केला आहे.

वायनाडमधून डाव्या लोकशाही आघाडीने पी. पी. सुन्नर यांना याआधीच उमेदवारी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वायनाडचे नेते विजयन चेरूकारा म्हणाले, "आमच्या उमेदवाराने प्रचाराचे तीन टप्पे केव्हाच पार केले असून, तो चार ते पाच लाख लोकांच्या थेट संपर्कात आहे. चौथ्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व मतदारांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहोत आणि दोन दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल. राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांना या मतदारसंघाकडे फारसे लक्ष देणे शक्‍य होणार नाही. राहुल गांधी हे अदृश्‍य देवासारखे आहेत, त्यांना अमेठीतून सहज विजय मिळवता येईल, पण वायनाडची गोष्ट वेगळी आहे. शेतकरी, आदिवासी आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही फ्लॅश मॉबसारखे उपक्रम आखण्याच्या विचारात आहोत.''

दरम्यान, दुसरीकडे वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर टीका करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "राहुल गांधींनी 15 वर्षांपासून अमेठीतील जनतेच्या मदतीने सत्तेची मजा घेतली आणि आता ते दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हा अमेठीतील जनतेचा अपमान आहे आणि इथले लोक हे सहन करु शकणार नाही."

Web Title: Loksabha 2019 Congress President Rahul Gandhi files nomination from Wayanad in Kerala