Loksabha 2019 : यात्रिकाच्या निवडणूक प्रवासाची सांगता

रथयात्रेचे संग्रहित छायाचित्र.
रथयात्रेचे संग्रहित छायाचित्र.

भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ रोवून त्याला देशातील प्रभावशाली पक्ष बनविण्यापर्यंतच्या वाटचालीत सक्रिय योगदानच नव्हे, तर त्याला दिशा देत प्रगतीच्या शिखरावर नेण्यात लालकृष्ण अडवानींचा वाटा मोठा आहे. अनेक नेत्यांचे ते गुरू झाले. निवडणूक रिंगणाबाहेर त्यांचे जाणे अपरिहार्य असले तरी, खंतावणारे आहे.

अखेर ९१ व्या वर्षांच्या लालकृष्ण अडवानी यांच्या निवडणूक राजकारणाचा प्रवास संपला. हा पाडाव वाटत नसून, तो सातत्याने यात्रेवर जाणाऱ्या भाजपच्या नेत्याच्या संसदीय कारकिर्दीचा पूर्णविराम आहे. अडवानी भारतीय राजकारणातले कमालीचे सभ्य, तरीही वादग्रस्त नेते. चेहऱ्यावरून शांत वाटणाऱ्या या नेत्याने रामजन्मभूमी वाद केंद्रस्थानी आणत भाजपला भारतीय राजकारणाचे केंद्रबिंदू केले. गांधीवादी समाजरचनेच्या आग्रहामुळे जेमतेम दोन जागा मिळविणारा भाजप अडवानींनी संघपरिवाराच्या योजनेनुसार वाढविला. गोविंदाचार्य यांचे वादग्रस्त विधान खरेच होते, ‘ते भाजपचा चेहरा होते.’ भारतासारख्या सहिष्णू देशात जिंकायचे, तर आपल्यासारख्या हार्डलाइनरची नाही, तर वाजपेयींसारख्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असल्याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच, मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून वाजपेयी यांचे नाव घोषित केले. ‘अयोध्येला जाता आहात लंकेला नाही,’ या वाजपेयींच्या विधानाचा योग्य अर्थ त्यांना कळत होता; म्हणूनच त्यांनी संघपरिवाराला अभिप्रेत हिंदुहिताला प्राधान्य देतानाही दुय्यम स्थानावर समाधान मानले.

२००९ मध्ये भाजपने अडवानी यांना प्रमुखपदी ठेवून निवडणुकांची आखणी केली; त्या वेळी अपेक्षित यश न मिळाल्याने २०१४ च्या निवडणुका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय झाला. खरेतर अडवानी मोदींचे गुरू, एकेकाळचे तारणहार. गुजरात दंगलींनंतर वाजपेयींनी मुख्यमंत्री मोदींना राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला होता. त्या वेळी मोदींचा बचाव केला तो अडवानींनीच. पुढे शिष्य गुरूपेक्षा सवाई झाला अन्‌ मार्गदर्शक मंडळावर अडवानींची बोळवण झाली. जगाच्या इतिहासात कॅस्ट्रोसारखे नेते वृद्धापकाळातही प्रमुखपद सांभाळत राहिले. लोकशाही व्यवस्थेत ते शक्‍य नव्हते. बाळासाहेब ठाकरे, करुणानिधी या ज्येष्ठांनीही अखेरपर्यंत पक्षाची सूत्रे हाती ठेवली होती. अडवानींच्या नशिबी ते भाग्य नव्हते. भाजपला प्रथमच संपूर्ण बहुमत स्वबळावर मिळाले तेव्हा मोदींनी हा दिवस दाखवला, हे उद्‌गार अडवानींनी कृतज्ञ कौतुकापोटी काढले की हताश अगतिकतेपायी? पिढीगणिक नेतृत्व बदलत असते. तरुणांना वाव द्यायचा असतो, हे लक्षात घेत अडवानींनी माघार घेतली, की ती मोदी-शहा या कारभाऱ्यांनी बळेच लादली, ते कळायलाही मार्ग नाही.

ढासळत्या मूल्यांबद्दल चिंता
मावळत्या लोकसभेतील ढासळत्या मूल्यांबद्दल अडवानी सतत चिंता व्यक्‍त करत राहिले. संसदेत पहिल्या बाकावरील अडवानींना पाहून कित्येकांना भीष्माचार्यांची आठवण व्हायची. हवाला डायरीत नाव आल्यावर त्यांनी १९९६ ची निवडणूक लढवली नाही. आज त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्‍त करणारी भाजपबाहेरील मंडळी एकेकाळी त्यांना भगव्या आक्रमकतेचे प्रतीक मानत. त्यांनी गांधीनगरचे तब्बल सहावेळा प्रतिनिधित्व केले. स्युडो सेक्‍युलॅरिझम हा शब्द त्यांचीच देणगी. उजवे असले, तरीही प्रचंड वाचन, हेही त्यांचे वैशिष्ट्य. अडवानी ते अमितभाई असा भाजपचा प्रवास आहे. अभावाच्या स्थितीतून सुरू झालेली यात्रा आता संपन्नतेच्या मुक्‍कामावर आहे. काळ्या पैशावर नियंत्रणासाठी निवडणूक खर्चाची बेगमी सरकारकडून होण्याची त्यांनी आग्रहाने मांडलेली सूचनाही सुधारणावाद्यांच्या कायम स्मरणात राहील. २०१९ ची निवडणूक लढणार नाही, हा निर्णय त्यांनी स्वतःहून घोषित का केला नाही, हा प्रश्‍नच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com