Loksabha 2019 : गोव्यात ‘मगो’त उभी फूट

Sudin-Dhawalikar
Sudin-Dhawalikar

पणजी - गोव्यात मंगळवारी उत्तररात्री महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या विधिमंडळ गटात फूट पडून तीनपैकी मनोहर आजगावकर व दीपक पाऊसकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे आज ‘मगो’चे आमदार असलेले उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर ‘मगो’ने पाठिंबा देताना तीन मंत्रिपदे व महामंडळांची तीन अध्यक्षपदे मागण्याचे ठरवले होते. मात्र सुदिन ढवळीकर यांनी तो विषय गडकरींपर्यंत नेण्यास चालढकल केल्याने पाऊसकर यांना नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. ‘गोवा फॉरवर्ड’ या पक्षाचे तिन्ही आमदार विजय सरदेसाई, जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हे मंत्री होऊ शकतात, तर आमच्याबाबत दुजाभाव का असा ‘मगो’चा प्रश्‍न होता. पाऊसकर यांना मंत्रिपद देण्यासाठी ढवळीकर यांनी पुढाकार न घेतल्याने अखेरीस आजगावकर व पाऊसकर यांनी मंगळवारी उत्तररात्री भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ढवळीकर यांना आज मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.

‘गोवा फॉरवर्ड’ धास्तावला
भाजपच्या या कारवाईने सरकारमधील घटक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड पक्ष धास्तावला आहे. त्यांचेही तीन आमदार असून, त्यापैकी दोन आमदारांना भाजप प्रवेश तर देणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे सरकारने राजकीय वाटचाल स्पष्ट करावी, अशी मागणी त्या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी ४ जागा सध्या रिक्त आहेत. काँग्रेसचे १४, भाजपचे १४, ‘मगो’चा १, राष्ट्रवादी काँग्रेसचा १, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा दिल्लीत असून, त्या गोव्यात परतल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पाऊसकर यांचा मंत्रिपदी शपथविधी शक्‍य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com