Loksabha 2019 : भाजप उमेदवारच म्हणतो, मला निवडणूक अवघड जाणार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

कॉंग्रेसबरोबर थेट सामना असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाची भाजपला काळजी आहे. भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार यांनीच ही काळजी व्यक्त केली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी येथे मतदान होईल. 

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) ः कॉंग्रेसबरोबर थेट सामना असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाची भाजपला काळजी आहे. भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार यांनीच ही काळजी व्यक्त केली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी येथे मतदान होईल. 

सर्वेश कुमार यांची लढत कॉंग्रेसचे उमेदवार आणि कवी इम्रान प्रतापगडी यांच्याबरोबर आहे. सडेतोड भाषेबद्दल प्रसिद्ध असलेल्या प्रतापगडी यांनी त्यांच्या कविता आणि भाषणांमधून भाजप सरकारला थेट प्रश्‍न केले आहेत. समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष-राष्ट्रीय लोक दल या आघाडीकडून एस. टी. हसन हे डॉक्‍टर रिंगणात आहेत. 19.41 लाख मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात सुमारे 47 टक्के मुस्लिम मतदार आहेत. मतदानाला शेवटचे तीन दिवस उरल्यावर हे मतदार कोणाला पाठिंबा द्यावयाचा, हे निश्‍चित करतात, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वेश कुमार अनुभवी राजकारणी आहेत, मतदारसंघात ते परिचितही आहेत; मात्र यंदा त्यांना विजयाची खात्री वाटत नाही. "ही निवडणूक मला अवघड जाणार आहे,' असे त्यांनी "पीटीआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. वाल्मीकी समाजाच्या नाराजीचा फटका बसण्याचीही भाजपला भीती आहे. 

बसपचे पाठीराखे असलेले जाटव मतदार मुरादाबाद मतदारसंघात नऊ टक्‍क्‍यांच्या आसपास आहेत. आम्ही बहनजी मायावती यांना मानतो. यंदा आघाडी असल्यामुळे आम्ही आघाडीला पाठिंबा देऊ, असे बसपच्या एका समर्थकाने सांगितले.

Web Title: Muradabad constituency BJP is worried about the candidate