Loksabha 2019: साध्वी प्रज्ञासिंह यांना मोठा दिलासा, न्यायालयाने याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

- प्रज्ञा सिंहच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका न्यायालयाने फेटाळली
- साध्वी प्रज्ञा सिंह यांना न्यायालयाचा मोठा दिलासा
- उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसल्याचे स्पष्टीकरण
- आरोपींना निवडणूक लढण्यापासून न्यायालय रोखू शकत नसल्याचेही सांगितले

नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना निवडणूक लढण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले.

विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी याचिका न्यायालयात करण्यात आली होती. मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी यांनी उमेदवारी देऊन भाजपने हिंदू मतांना जवळ करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी यांनी केलेलं वादग्रस्त विधानामुळे साध्वी यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली.

Web Title: NIA court turns down petition seeking ban on Pragya Singh Thakurs candidature in LS polls