Election Results : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन !

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

भाजप आणि मित्रपक्षांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि भरभराटीसाठी त्यांच्यासोबत काम करायला मिळेल अशी अपेक्षा.
- इम्रान खान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'भाजप आणि मित्रपक्षांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि भरभराटीसाठी त्यांच्यासोबत काम करायला मिळेल अशी अपेक्षा.' लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान इम्रान खान यांनी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला तर भारतासमवेत शांततेची आणि काश्मीर प्रश्नाची चर्चा करण्याची अधिक चांगली संधी उपलब्ध होईल, असे मत इम्रान खान यांनी व्यक्त केले होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संदेश पाठवला आहे. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या संदेशात लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीही पंतप्रधान मोदींना उद्देशून 'भारतीय नागरिकांद्वारे मिळालेल्या प्रचंड बहुमतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा. अफगानिस्तान सरकार आणि जनता दोन्ही लोकशाही देशांदरम्यान विस्तारासाठी तत्पर आहे' असं ट्विट केलंय.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा पाठविल्या आहेत. इस्राइलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा देत ट्विट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan prime minister imran khan congratulate narendra modi on loksabha election result