Loksabha 2019 : काँग्रेसकडून हिंदूंचा अपमान, हिंदू दहशतवाद हे पाप त्यांचेच : मोदी

Loksabha 2019 : काँग्रेसकडून हिंदूंचा अपमान, हिंदू दहशतवाद हे पाप त्यांचेच : मोदी

वर्धा : हिंदू या पवित्र धर्माचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केले असून, हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसनेच आणला. हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदू दहशतवाद नव्हता. काँग्रेसने हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे पाप कधीच धुतले जावू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले आहे. 

वर्ध्यात आज (सोमवार) भाजप-शिवसेना युतीचा प्रचाराचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले आदी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. अंतराळात भारताची ताकद मजबूत केली आहे. इस्त्रोने आणखी एक ऐतिहासिक भरारी घेतली आहे. मिशन शक्तीने आपण खूप मोठी मजल मारली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात शत-प्रतिशत विजय भाजपला मिळाला आहे. विरोधकांना एकही जागा मिळाली नाही पाहिजे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला झोप लागणार नाही
वर्ध्याच्या महानभूमीतून मी महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ करत आहे. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो. कारण, 40 डिग्री तापमानात हा जनसमुदाय आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. ही ताकद आणि गर्दी पाहून काँग्रेस-राष्ट्रवादी आज रात्री झोपेल की नाही हे माहित नाही. 

होय, मी माता-भगिनींचा चौकीदार
गेल्या पाच वर्षांमध्ये जे काही मी येथील क्षेत्र आणि महाराष्ट्रासाठी करू शकलो, त्यामागे तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद आहे. तुम्हीच माझी प्रेरणा आहात. पाच वर्षापूर्वी तुम्ही मला काम करण्याची संधी दिली होती. त्याचा हिशोब मी देतच आलो आहे. काँग्रेस स्वच्छतेसाठी झटत असलेल्या चौकीदाराचा अपमान करत आहे. काँग्रेसने देत असलेली शिवी माझ्यासाठी दागिना आहे. मी शौचालयाचा चौकीदार असेल, तर मी माता-भगिनींचा चौकीदार आहे. मी चौकीदार असल्याचा गर्व आहे. 

शरद पवारांची हवा ओळखून माघार
शरद पवार हे देशातील सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते विचार करत होते, मी पंतप्रधान होऊ शकतो. ते म्हणत होते मी निवडणूक लढविणार. पण, त्यांनी अचानक न लढण्याचा निर्णय घेतला. ते म्हणत असतील मी राज्यसभेतच खूश आहे. त्यांनी निवडणुकीतून हवा ओळखून निवडणुकीतून माघार घेतली. राष्ट्रवादीत परिवार युद्ध सुरु असून, त्यांचा पुतण्या पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीला तिकीट वाटपात पण अडचण होत आहे. कोठून लढायचे आणि कोठून नाही यातच त्यांचा वाद सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखे आहे. ते सत्तेत असताना 6-6 महिने झोपतात. सहा महिने झोपून पुन्हा उठतात आणि पैसे खातात. शेतकरी असूनही शरद पवार शेतकऱ्यांना विसरले. त्यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पुतण्याच्या हातून ते स्वतः हिटविकेट झाले आहेत. त्यांना निवृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे. 

योजना पूर्ण करणार
चौकीदार तुमचे समस्या सोडविण्यासाठी तयार आहे. अन्नधान्यांना मूलभूत किंमत मिळवून दिली आहे. गरिबांना कायम गरिब ठेवणारे गरिबांचे भले कधीच करू शकत नाही. गरिबांबद्दलची योजना आणून काही होणार नाही. आम्ही सिंचन योजना मार्गी लावली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून अनेक गावांना फायदा झाला आहे. 

हिंदू दहशतवाद शब्द काँग्रेसनेच आणला
विदर्भातील हजारो जवान देशाच्या रक्षणासाठी लढत आहे. काँग्रेस देशाच्या जवानांना अपमानित करत आहे. काँग्रेसचे लोक एअरस्टाईकचे पुरावे मागत आहे. त्यांच्या मागण्या पाकिस्तानमधील नागरिकांना चांगल्या वाटत आहे. त्यामुळे तुम्हीच सांगा आपल्याला कोण पाहिजे हिंदुस्तानचे हिरो की पाकिस्तानमध्ये झालेले हिरो पाहिजे. देशाच्या लष्करावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा. व्होटबँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्याही स्तरावर जाऊ शकते. हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसनेच निर्माण केला. हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदू दहशतवाद नव्हता. काँग्रेसने हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे पाप कधीच धुतले जावू शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com