Loksabha 2019 : शशी थरूर यांचे पंतप्रधानांना दक्षिणेतून लढण्याचे आव्हान 

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

- दक्षिणेतूनही निवडून येऊ शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी दाखवला
- केरळ किंवा तमिळनाडूतून निवडणूक लढविण्याचे धैर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे का शशी थरूर यांचा प्रश्न

तिरुअनंतपूरम: उत्तर भारतासह दक्षिणेतूनही निवडून येऊ शकतो, असा विश्वास वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दाखवून दिला आहे, असे स्पष्ट करीत केरळ किंवा तमिळनाडूतून निवडणूक लढविण्याचे धैर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे का, असे आव्हान कॉंग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी आज दिले. 

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पुढचा पंतप्रधान दक्षिण भारतातून निवडून आलेला असू शकतो, अशी नागरिकांमध्ये भावना आहे. राहुल यांच्यामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे थरूर म्हणाले. 

"पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये थरूर यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. देशातील बहुसंख्य जनता राहत असलेल्या भागातून राहुल गांधी यांनी पळ काढला असल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्यावर बोलताना थरूर म्हणाले, की सत्ताधारी पक्षाने सातत्याने कट्टरतेला खतपाणी घातले असून, पंतप्रधानांनी अशा प्रकारचा आरोप करणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो. मात्र, मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली आहे.  उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. 

केंद्राचे दक्षिणेकडील राज्यांशी संबंध बिघडले 
भाजप सत्तेच्या काळात केंद्र सरकार आणि दक्षिणेतील राज्यांचे संबंध वेगाने बिघडताना दिसत आहेत. दक्षिण आणि उत्तर अशी होणारी देशाची विभागणी रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी केरळमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही दक्षिणेला दिलासा देणारी बाब आहे. तसेच, उत्तर आणि दक्षिण भारतातून निवडून येण्याचा विश्वास राहुल गांधी यांच्याकडे आहे. केरळ किंवा तमिळनाडूतून लढण्याची हिंमत मोदी दाखविणार का, असा प्रश्नही थरूर यांनी उपस्थित केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will PM Have Courage To Fight From South india Says Shashi Tharoor