Election Results : भिवंडीमध्ये कपिल पाटील आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

भिवंडी : भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी 1766 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कांग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी मागे टाकले आहे. 

भिवंडी : भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी 1766 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कांग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी मागे टाकले आहे. 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरस निर्माण करणाऱ्या निवडणुकीत आजी-माजी खासदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. दोघा उमेदवारांना पक्षातील अंतर्गत पदाधिकारी व विरोधकांचा सामना करीत संतापाची भावना दाबून संयमाने प्रचार करावा लागला. अर्थकारण तसेच बंडखोरांची समजूत काढताना दोघांची मोठी दमछाक झाली. आता यातून भिवंडी लोकसभेचा सुभेदार कोण होणार, हे 24 मे रोजी पहाटे ठरणार असल्यामुळे उमेदवारांच्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे, तर मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची करडी नजर असल्याने गुपचूप सट्टेबाजी व पैजा लागल्याची चर्चा भिवंडीत सध्या रंगली आहे. 

ही निवडणूक विद्यमान भाजप खासदार कपिल पाटील व कॉंग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचे भवितव्य ठरविणार आहे. वास्तविक या निवडणुकीत आजी-माजी खासदारांच्या विकासकामांवर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, हा मुद्दा या वेळी बाजूला राहून जातीय समीकरण, राजकीय पक्षांचे बलस्थान, नाराज पदाधिकारी, बंडखोर मतदार या विषयांवर मतदान झाले आहे. कपिल पाटील, सुरेश टावरे, बहुजन वंचित आघाडीचे डॉ. अरुण सावंत यांच्यासह 15 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपचे कपिल पाटील व कॉंग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात होणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत दोन लाख मतदारांची वाढ झाली आहे.

या वेळी दीड टक्का मतदान वाढले आहे. या वाढीव मतदाराचा फायदा कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत 18 लाख 89 हजार 788 मतदारांपैकी 10 लाख दोन हजार 888 मतदारांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी एक लाख 27 हजार 844 मतदारांची भर पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Kapil Patil and Suresh Taware in Bhiwandi for Lok Sabha 2019