Loksabha 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध स्वाभिमान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

मतदारसंघातील महत्त्वाचे चार प्रश्‍न

 •   औद्योगिकरणाचा अभाव, बेरोजगारी
 •   पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव
 •   मच्छीमार उद्योगाची परवड
 •   रखडलेले पाटबंधारे आणि इतर प्रकल्प

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध स्वाभिमान अशीच लढत निश्‍चित आहे. उमेदवार जाहीर झालेला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्ते अजूनही चाचपडत आहेत. लोकसभा मदारसंघातील सहापैकी पाच शिवसेनेचे, तर एक आमदार नामधारी काँग्रेसचा प्रत्यक्षात स्वाभिमानचा आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत शिवसेनेचे पारडे जड मानले जात आहे; मात्र युतीच्या घोषणेनंतरही स्थानिक भाजपने घेतलेली शिवसेनाविरोधी भूमिका निश्‍चितच आव्हानात्मक आहे. सावंतवाडीत शिवसेनेचे, कणकवलीत स्वाभिमानचे प्राबल्य, तर कुडाळात दोन्ही पक्षाची ताकद समतोल आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार दुर्लक्षित करता येणार नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीकडून विनायक राऊत यांनी जय्यत तयारी केली आहे. नीलेश राणेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. राणेंचे सिंधुदुर्गमध्ये वर्चस्व आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मतांची जुळणी करावी लागणार आहे. भाजपचा अबोला शिवसेनेला त्रासदायक ठरत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प हद्दपार करून राजापुरात शिवसेनेने मतांची लढाई जिंकली. सिंधुदुर्गचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी राऊतांचा प्रचार न करण्याचा निर्धार केला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडूनही साथ मिळाल्याने हा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे.

आमदार प्रसाद लाड युतीला पोषक स्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही नाराजी शिवसेनेला त्रासदायक व स्वाभिमानच्या पथ्थ्यावर पडू शकते. काँग्रेस आघाडीकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन महाआघाडीने रत्नागिरीत घेतलेली सभा सर्वांचीच डोकेदुखी ठरवणारी आहे. पाच विधानसभा आमदार हीच ताकद शिवसेनेच्या उमेदवाराला तारणहार ठरू शकते. 

मतदारसंघातील आमदार

 •   रत्नागिरी-  उदय सामंत (शिवसेना)
 •   राजापूर-लांजा-  राजन साळवी (शिवसेना)
 •   चिपळूण-संगमेश्‍वर-  सदानंद चव्हाण (शिवसेना)
 •   कणकवली-  नीतेश राणे (काँग्रेस)
 •   मालवण-कुडाळ- वैभव नाईक (शिवसेना)
 •   सावंतवाडी-  दीपक केसरकर (शिवसेना)

मतदारसंघातील महत्त्वाचे चार प्रश्‍न

 •   औद्योगिकरणाचा अभाव, बेरोजगारी
 •   पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव
 •   मच्छीमार उद्योगाची परवड
 •   रखडलेले पाटबंधारे आणि इतर प्रकल्प

प्रमोद जठारांच्या भूमिकेकडे लक्ष
नाणार समर्थनार्थ प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार निवडणूक रिंगणात उतरले, तर त्याचा फायदा स्वाभिमानला होणार हे निश्‍चित आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली तर भाजपचे पदाधिकारी नेमके कोणाचा प्रचार करणार हा प्रश्‍न आहे. स्वाभिमान आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष नाणारविरोधी आहेत. त्यामुळे जठार काय भूमिका घेतात याकडे शिवसेना आणि स्वाभिमानसह भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

रत्नागिरी विधानसभा: शिवसेना-स्वाभिमान आमने-सामने

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात दहा जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. भाजपचा टक्‍का शहर आणि काही गावांपुरताच मर्यादित आहे. शहरी भागात भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा मतदार आहे. काँग्रेसची तेवढी ताकद नाही. पावस ते फुणगूस खाडीपट्ट्यापर्यंत पसरलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतांचे गणित शिवसेनेसाठी पोषक आहे. आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते प्रचाराची राळ उडवत आहेत. शिवसेनेला शह देण्यासाठी स्वाभिमानने गटनिहाय बैठका घेऊन वातावरण निर्माण केले आहे. शिवसेनेच्या प्रचारसभांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे अलिप्त धोरण स्वाभिमानच्या पथ्थ्यावर पडू शकते. रत्नागिरी शहरातील भाजीवाल्यांच्या प्रश्‍नावरून सेना-स्वाभिमान उभे ठाकले होते. त्यामुळे तापलेले वातावरण पुन्हा थंड झाले आहे. गेले चार दिवस शिवसेनेने सभांचा धडाका लावला आहे. स्वाभिमानच्या गोटात शांत वातावरण आहे. काँग्रेस आघाडीचे कार्यकर्तेही निवांत आहेत.

 चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा : राष्ट्रवादीच्या मतावर लक्ष

चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात चिपळुणात शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हे स्वतः तालुक्‍यात प्रचार फेऱ्या करीत आहेत. खासदार राऊतांच्या सभा सुरू असताना उमेदवार नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेखर निकम कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काँग्रेस अलिप्त असून, रमेश कदम यांचा भर गुहागर, दापोली, खेडकडे आहे. स्वाभिमानकडून गेल्या महिनाभरात वातावरणनिर्मिती झाली असून, जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळात जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. चिपळूण शहरात भाजपचे सहकार्य मिळवण्यावर स्वाभिमानचा भर आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील बहुतांश भाग चिपळूण विधानसभेत येतो. संगमेश्‍वरात भाजपशी मनोमिलनाचा प्रयत्न अद्याप यशस्वी झाला नाही; मात्र राष्ट्रवादीचा स्वाभिमानला छुपा पाठिंबा या तालुक्‍यात शिवसेनेसाठी धोक्‍याची घंटा आहे. तालुक्‍यात मनसेचेही अस्तित्व आहे; मात्र पक्षाची भूमिका नसल्याने ते न्यूट्रल आहेत. सामाजिक फॅक्‍टरनुसार कुणबी मतदारांवर सर्वकाही अवलंबून राहणार आहे. 

राजापूर-लांजा विधानसभा : मतविभाजन टाळण्याचे आव्हान

राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघातील लांजा तालुका हा अनेक वर्षे शिवसेनेच्या पाठीशी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत लांजा तालुका किंगमेकर ठरला होता. लांजा नगरपंचायत परिसरासह काही भागांमध्ये भाजपने हातपाय पसरलेले आहेत. शिवसेनाविरोधी भाजपच्या भूमिकेचे कोडे सोडवावे लागणार आहे. आमदार राजन साळवींचा तळागाळातील लोकसंपर्क राऊतांसाठी उपयुक्‍त ठरू शकतो; मात्र शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी मारक ठरू शकतात. नाणारमधील प्रस्तावित प्रकल्प घालवण्याचा केलेला पराक्रम या तालुक्‍यातील मते स्थिर ठेवण्यासाठी शिवसेनेसाठी पूरक ठरणार आहे. शिवसेनेच्या जोडीने स्वाभिमान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेकडूनही नारळ फोडण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करीत मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस आमदार हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी जनसंपर्क वाढविला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ मानेंच्या नेतृत्वाखाली उल्का विश्‍वासराव यांनी ग्रामीण भागात संपर्क निर्माण केला आहे.

कणकवली मतदारसंघ: नारायण राणेंचा बालेकिल्ला 

कणकवली विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची मोठी फौज ही स्वाभिमानची मोठी ताकद आहे. २०१४ नंतर या मतदारसंघाची बांधणी आमदार नीतेश राणेंनी करतानाच युवा कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानचे पारडे जड असणार आहे. कणकवली आणि वैभववाडी हे दोन्ही तालुके स्वाभिमानला पोषक, तर देवगड तालुक्‍यात शिवसेनेच्या तुलनेत स्वाभिमान बळकट आहे. या मतदारसंघात स्वाभिमान पाठोपाठ भाजपचा प्रभाव आहे. 

सावंतवाडी विधानसभा : दीपक केसरकरांसमोर आव्हान

सावंतवाडी विधानसभा मतदारासंघात गेल्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतून राऊत यांना सर्वाधिक मताधिक्‍य दिले. त्यानंतर विधानसभा निवडणूकही एकहाती जिंकली; परंतु त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्वाभिमान पक्षाने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे केसरकरांसमोर मताधिक्‍य टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. दोडामार्ग आणि वेंगुर्ले हे दोन्ही तालुके केसरकर आणि पर्यायाने शिवसेनेसाठी पोषक आहेत. त्या तुलनेत सावंतवाडी तालुक्‍यात दोन्ही पक्षांना झुंजावे लागणार आहे. भाजपची भूमिका कायम राहिली, तर शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. 

कुडाळ विधानसभा ः स्वाभिमान, शिवसेनेसाठी समान संधी

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान आणि शिवसेनेसाठी समान संधी आहे. मालवण पालिका युतीकडे, तर पंचायत समिती स्वाभिमानकडे, कुडाळ नगरपंचायत स्वाभिमानकडे, तर पंचायत समिती शिवसेनेकडे असे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी मतदारांचा कौल वेगवेगळा आहे. आमदार वैभव नाईक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दहा हजारांचे मताधिक्‍य खासदार विनायक राऊतांना दिले होते. ते मताधिक्‍य टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. येथे स्वाभिमान कमबॅक करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार हे नक्की. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri - Sindhudurg Lok Sabha constituency special