Loksabha 2019 : राज्यातील ११ खासदार घरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

 राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत.

मुंबई - राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह सात खासदारांना भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे. 

भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भाजपने २३ पैकी सात खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षांतर्गत असंतोष, नाराजी, गटबाजी यातून विद्यमान खासदारांचा पत्ता कापला गेला आहे. पक्षाने १६ खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने यावेळी  खासदार राजीव सातव यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील आणि मधुकर कुकडे या दोन खासदारांना संधी नाकारली आहे. मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, विजय मोहिते यांनी ‘राष्ट्रवादी’शी संबंध तोडले आहेत. गेल्या वर्षी भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या कुकडे यांना ‘राष्ट्रवादी’ने उमेदवारी नाकारली. याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. 

शिवसेनेने १८ पैकी उस्मानाबादचे रवींद्र गायकवाड या एकमेव खासदाराला उमेदवारी नाकारली आहे. भाजपने हरिश्‍चंद्र चव्हाण, दिलीप गांधी, सुनील गायकवाड, ए. टी. पाटील, किरीट सोमय्या, शरद बनसोडे, अनिल शिरोळे या खासदारांना उमेदवारी नाकारली आहे.

Web Title: 11 existing members of the parties that have rejected the nomination