साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

राज यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र, याचा परिणाम मतदानावर झालेला नाही. याउलट ठाकरे यांच्या प्रचारसभा झालेल्या भागात भाजपला फायदा झाला आहे.

पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचार सभांना प्रचंड गर्दीही झाली. मात्र विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही. राज यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र, याचा परिणाम मतदानावर झालेला नाही. याउलट ठाकरे यांच्या प्रचारसभा झालेल्या भागात भाजपला फायदा झाला आहे.

राज यांच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासांमध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्वच जागांवर शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदावरांना आघाडी मिळाल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते. मात्र, त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नसल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणूकीदरम्यान झालेल्या सभांवरूनही हे खरे ठरले आहे.

राज्यात राज ठाकरे यांच्या झालेल्या सभा पुढीलप्रमाणेः

  • 12 एप्रिल : नांदेड
  • 15 एप्रिल : सोलापूर
  • 16 एप्रिल : कोल्हापूर
  • 17 एप्रिल : सातारा
  • 18 एप्रिल : पुणे
  • 19 एप्रिल : महाड, रायगड
  • 23 एप्रिल : काळचौकी, मुंबई
  • 24 एप्रिल : भांडुप (पश्‍चिम), मुंबई
  • 25 एप्रिल : कामोठे, पनवेल
  • 26 एप्रिल : नाशिक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp supporters troll raj thackeray after massive success in lok sabha election 2019