Loksabha 2019 :  काँग्रेसला झोपेतही मोदी दिसतात

Loksabha 2019 :  काँग्रेसला झोपेतही मोदी दिसतात

श्रीरामपूर -  ‘‘काँग्रेस व मोदी यांच्या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदींच्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. संताजी-धनाजीसारखे झोपेतही त्यांना मोदी दिसत आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर टीका केली. 

देशातील गोरगरिबांच्या कल्याणाची जबाबदारी मोदींनी घेतली असून, तुमच्या ताकदीच्या भरवशावरच बलशाली व संपन्न भारत तयार होईल,’’ असा विश्‍वास त्यांनी आज व्यक्त केला.

शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, डॉ. सुजय विखे पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मोदी खऱ्याअर्थाने गरिबांसाठी लढले. जन-धन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना, घरकुलसारख्या योजना यशस्वीपणे राबविल्या. सर्व अनुदाने बॅंक खात्यात जमा करून भ्रष्टाचारी व्यवस्था तोडण्याचे काम केले. मोदींनी अतिरेक्‍यांसह पाकिस्तानला अद्दल घडविली. काँग्रेसने देशाला काय दिले? पाच वर्षांपूर्वी देशाची काय अवस्था होती? अतिरेकी हल्ल्यांबाबत काँग्रेस सरकारने काही केले नाही. ते आता गरिबी हटाव व देशद्रोहाबाबतचे कलम काढून टाकण्याची भाषा करत आहेत. काय खाऊन ते गरिबी हटविणार आहेत?’’ पुढील काळात राहुल गांधी यांच्या भाषणाची टीव्हीवरील ‘या मालिकांतील पात्र काल्पनिक आहेत,’ अशी स्थिती होईल, अशी खिल्ली फडणवीस यांनी उडविली.

‘आमची कुठेही शाखा नाही’
विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त झाली. त्यामुळे ‘आमची कुठेही शाखा नाही,’ अशी अवस्था काँग्रेसची जिल्ह्यात झाली आहे. आजच्या सभेपूर्वी राहुल गांधी यांचे असे स्वागत कुठेही झाले नसेल,’’ अशी टीका फडणवीस यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com