Loksabha 2019 : कॉंग्रेसचा रुसवा अखेर राष्ट्रवादीकडून दूर 

Loksabha 2019 :   कॉंग्रेसचा रुसवा अखेर राष्ट्रवादीकडून दूर 

नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत नाईक यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची समजूत काढून एकत्र लढण्यासाठी तयार केले. 

राज्यात आणि देशात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असली तरी नवी मुंबईत बलाढ्य नाईक घराण्याच्या वर्चस्वामुळे कॉंग्रेसचे राष्ट्रवादीसोबत कधीच जमले नाही. शिवसेना, भाजपच्या बरोबरीने कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी मदत केली; परंतु 2014 पासून नवी मुंबईत एकेकाळचे विरोधी पक्षात असलेले शिवसेना व भाजप आता मोठे भाऊ झाले आहेत. आमदार, खासदार व पालकमंत्र्यांच्या राजकीय खेळीने राष्ट्रवादीची पुरती कोंडी झाली आहे. या परिस्थितीत समविचारी पक्ष असतानाही कॉंग्रेससोबत असलेले वैर या परिस्थितीत राष्ट्रवादीला आणखीन महागडे ठरू शकणार आहे. त्याचा फटका निवडणुकीत आनंद परांजपे यांना बसू नये म्हणून गणेश नाईक यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत बुधवारी मनोमिलन केले. वाशीत झालेल्या बैठकीत नाईक यांनी माजी महापौर रमाकांत म्हात्रे, कॉंग्रेस प्रदेश सचिव संतोष शेट्टी व अनिल कौशिक यांची समजूत काढली. अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या राजकारणामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या समविचारी पक्षांना कसा फटका बसतोय याबाबत नाईक यांनी कॉंग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, कॉंग्रेसच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीकडून अनेकदा निवडणुकीत होत असलेल्या दगाबाजीबाबत गाऱ्हाणे मांडले. कॉंग्रेसचा कार्यकर्ता नेहमी आमदारकी व खासदारकीच्या निवडणुकीत घड्याळाचा प्रचार करतो; पण त्या बदल्यात महापालिका निवडणुकीत काहीच पदरी पडत नाही, अशी तक्रार कॉंग्रेसच्या जिल्हा इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली. त्यावर चर्चा करताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महापालिका निवडणुकीतही एकत्र असेल असे आश्‍वासन नाईक यांनी दिले. दरम्यान, पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीला अनिल कौशिक यांनी सर्व नेत्यांना बोलावल्यामुळे कॉंग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण होते. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी खासदार संजीव नाईक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. 

कॉंग्रेस करणार राष्ट्रवादीला मदत 
ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यासोबत बैठक झाल्यावर कॉंग्रेसतर्फे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी सांगितले. आठवड्याअखेरीस वाशीतील कॉंग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांची एक सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेत राष्ट्रवादीला मदत करायचे असल्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात येणार आहे. तसेच यापुढील प्रचार सभा आता कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या संयुक्त सभा होणार असल्याची माहिती कौशिक यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com