Loksabha 2019 : शिवसेनेचे चौकीदार विदर्भात! 

बुधवार, 3 एप्रिल 2019

यवतमाळ येथे भावना गवळी आणि रामटेकमध्ये कृपाल तुमाने या शिवसेना उमेदवारांना प्रस्थापित विरोधकांचा सामना करावा लागत असल्याची चर्चा थेट "मातोश्री'पर्यंत पोहचल्याने "बंदोबस्ता'साठी तेथे खास कार्यकर्ते पाठवण्यात आले आहेत. 

मुंबई - यवतमाळ येथे भावना गवळी आणि रामटेकमध्ये कृपाल तुमाने या शिवसेना उमेदवारांना प्रस्थापित विरोधकांचा सामना करावा लागत असल्याची चर्चा थेट "मातोश्री'पर्यंत पोहचल्याने "बंदोबस्ता'साठी तेथे खास कार्यकर्ते पाठवण्यात आले आहेत. 

यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी सतत निवडून आल्याने त्यांच्या विरोधातील नाराजीचा फटका बसू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्यमंत्री संजय राठोड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बंजारा मते एकत्र राहिली तर गवळी निवडून येऊ शकतील, असा शिवसेनेचा अंदाज आहे. गत वेळी दिग्रस परिसरातून मिळालेल्या मतदानाच्या आधारावर शिवसेनेने हा मतदारसंघ राखला होता. या वेळीही ही जागा राखण्यावर शिवसेनेचा भर आहे. भाजपशी समन्वय राहावा, यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्याच वेळी मतदारसंघातील सर्व घडामोडी नीट आहेत की नाहीत, हे पाहण्यासाठी माजी आमदार व दक्षिण मुंबईचे रहिवासी अरविंद नेरकर यांना यवतमाळमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे काही कट्टर कार्यकर्तेही तेथे गेले असून, हा मतदारसंघ राखण्याची जबाबदारी ते पार पाडतील, अशी माहिती शिवसेनेच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली. 

पहिल्या टप्प्यात रामटेक मतदारसंघासाठीही मतदान होईल. या वेळी रामटेक मतदारसंघात काहीशी नाराजी असल्याची चर्चा होती. तिथेही योग्य ती काळजी घेण्यासाठी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना पाठवण्यात आले आहे. भाजप आम्हाला मदत करेल, याची खात्री असली तरी पक्षाची रचना म्हणून या दोघांना तेथे पाठवण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या जागांसाठीही योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

Web Title: Former MLA and Shiv Sena activists in vidarbha