Loksabha 2019 : संभाजी ब्रिगेड लढवणार लोकसभेच्या 18 जागाः घाडगे

अभय जोशी
बुधवार, 13 मार्च 2019

मागील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला देशातील जनता कंटाळली होती. भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड अशा सर्व गोष्टींचा अवलंब केला आणि अनेक खोटी आश्वासने दिली. त्याला भुलून जनतेने भारतीय जनता पक्षाला मते दिली. परंतु, नरेंद्र मोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही.

पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे यांनी आज (बुधवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री घाडगे म्हणाले, 'मागील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला देशातील जनता कंटाळली होती. भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड अशा सर्व गोष्टींचा अवलंब केला आणि अनेक खोटी आश्वासने दिली. त्याला भुलून जनतेने भारतीय जनता पक्षाला मते दिली. परंतु, नरेंद्र मोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. मराठा समाजाची आरक्षणाविषयी आणि अन्य मदतीविषयी या सरकारने फसवणूक केली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकार विरोधात मोठा लढा उभा करायला हवा होता. परंतु. हे सरकार आपल्या भानगडी बाहेर काढून तुरुंगात टाकेल या भितीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कातडीबचाव धोरण घेतले. अशा परिस्थितीत देखील निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन जागा मागत होतो. परंतु, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आता अखेर आम्ही राज्यातील 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.'

येत्या निवडणुकीत शिवसेना भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रखर भूमिका मांडून लोकांना तिसरा पर्याय देणार आहोत. राज्यात पुणे, माढा, सोलापूर, बुलढाणा, औरंगाबाद, नांदेड, नगर आदी सह एकूण 18 जागा संभाजी ब्रिगेड लढवणार असल्याचे श्री. घाडगे यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला विश्वंभर काशीद तसेच संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sambhaji Brigade will contest 18 seats in Lok Sabha