Loksabha 2019 :  भाजपच्या हजार सभा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 मार्च 2019

प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा; तसेच रोड शो होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून, आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांत प्रचाराचा जोरदार धडाका उडणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा; तसेच रोड शो होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून, त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रांतही भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ मार्चला कोल्हापुरात प्रचाराला सुरवात केली असून, त्यांच्या ७५ पेक्षा जास्त सभा होतील. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील प्रचार सभांमध्ये सहभागी होणार आहेत. रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांत सभा घेणार आहेत. त्याशिवाय चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा विविध ठिकाणी होणार आहेत. 

राजनाथसिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैयद शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्‍वी, रमणसिंग, केशव प्रसाद मौर्य हेही राज्यात प्रचार करणार आहेत. 

नलावडे, बापट, महाजनही फिरणार
भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी, कांता नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत, असे केशव उपाध्ये म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Thousands of BJP meetings