Loksabha 2019 : ‘वाजपेयी यांनीही काही केले नाही का?’ - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

‘सत्तर वर्षांच्या कालखंडात पाच वर्षे अटलबिहारी वाजपेयी हेही पंतप्रधान होते. मग वाजपेयी यांनी झोपा काढल्याचे मोदींना म्हणायचे आहे का, असा उपरोधिक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला.

उमरगा - ‘सत्तर वर्षांच्या कालखंडात पाच वर्षे अटलबिहारी वाजपेयी हेही पंतप्रधान होते. मग वाजपेयी यांनी झोपा काढल्याचे मोदींना म्हणायचे आहे का, असा उपरोधिक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी झालेल्या सभेत पवार बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ‘‘विकासकामांऐवजी मोदी हे विरोधकांना लक्ष्य करून दिशाभूल करीत आहेत. सत्तर वर्षांचा हिशेब मागताना त्यांना इतिहासाची जाणीव हवी. केवळ गांधी, नेहरू घराण्यांवर टीका करण्यापेक्षा या कालखंडात नेहरूंसह लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी यांनी केलेल्या भरीव कामकाजाची माहितीही त्यांनी द्यायला हवी. हल्ले परतवून लावण्याचे कर्तृत्व लष्काराच्या जवानांनी दाखविले. मोदी त्याचे राजकीय भांडवल करीत आहेत.’’

मतांसाठी सत्तेचा गैरवापर, धर्मांध भावना निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केल्याची टीका करून, आम्ही कुणाची कळ काढत नाही, कुणी काढली, तर त्यांना सोडत नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

Web Title: Loksabha Election 2019 atal bihari bajpai Sharad Pawar Politics