Loksabha 2019 : #चौकीदार बेरोजगार!

Chowkidar
Chowkidar

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक वातावरणाचे प्रतिबिंब उमटल्याचे गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास सांगतो. इंदिरा गांधींनी सुरू केलेले स्लोगन्सचे प्रचारसूत्र आता हॅशटॅगपर्यंत येऊन पोहचले आहे. यंदाची निवडणूक ‘चौकीदार’ या शब्दाभोवती खेळली जाईल, असे गेल्या दोन आठवड्यांतले वातावरण आहे.

प्रचार एखाद्याच मुद्द्याभोवती खेळवायचा आणि त्याला एखाद्या चटकदार शब्दाच्या घोषणेची जोड द्यायची, असे साधारण चित्र इतिहासात दिसते. या इतिहासातून वर्तमानाचा अंदाज येतो आणि भविष्याची चाहूलही.

इंदिरा गांधींची ‘गरिबी हटाओ’ ही भारताची खरी पहिली निवडणूक घोषणा. त्यापाठोपाठ आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत विरोधकांनीही ‘लोकशाही की हुकूमशाही’ अशी घोषणा आणली. ‘मंडल विरुद्ध कमंडल’ ही घोषणा राजीव गांधींची दुसरी निवडणूक आणि चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग यांच्या अल्पकालीन सरकारच्या काळात गाजली. १९९९ ची निवडणूक भाजपने पूर्णतः सोनिया गांधी यांच्या इटालियन नागरिकत्वावर गाजवली. त्यानंतरच्या तिन्ही निवडणुकांचा प्रचाराचा अजेंडा भाजपनेच ठरविला. त्यापैकी दोनवेळा म्हणजे ‘इंडिया शायनिंग’ आणि ‘मजबूत नेता, निर्णायक सरकार’ या घोषणांवेळी भाजप तोंडावर आपटले.

गेल्या निवडणुकीत सोशल मीडियाचा अभूतपूर्व वापर भाजपने केला आणि काँग्रेसला साफ केले. त्या निवडणुकीपासून घोषणांची जागा हॅशटॅगने घेतलीय. एखादा शब्द, एखादा हॅशटॅग निवडणुकीची सारी हवा बदलून टाकण्याची ताकद बाळगतो आहे. या पार्श्वभूमीवर ‘चौकीदार’ हॅशटॅगला महत्त्व आहे. 

‘चौकीदार’ हा शब्दच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत स्वतःशी जोडून घेतला. ‘मी या देशाचा चौकीदार आहे,’ असे मोदी मार्च २०१४ पासून सांगत आले. पाच वर्षांपूर्वीच्या चौकीदारीला तत्कालीन काँग्रेस सरकारविरुद्धच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ होता. आता हा संदर्भ पार बदलला आहे. चौकीदार बचावात्मक पवित्र्यात आहे. कारण, लोकसभा निवडणुकीआधी राफेल विमानखरेदी प्रकरणावरून काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ मोहीम सुरू केली होती. येत्या दोन महिन्यांत ‘चौकीदार’ शब्दाचा कीस पाडला जाईल. अलीकडच्या काळातले सारी सर्वेक्षणे सांगतात, की देशात बेरोजगारी आणि शेती, हे प्रमुख प्रश्न आहेत. चौकीदाराचा संदर्भ बेरोजगारीशीही जोडला जाईल. ‘#मैं भी चौकीदार’ म्हणणाऱ्यांना ‘#चौकीदार बेरोजगार’ हे उत्तर विरोधी पक्षांच्या भात्यात आहे. शाळा-कॉलेज शिकलेला आणि बांधावरचा; दोन्ही चौकीदार बेरोजगार आहेत. विरोधी पक्षांना या बेरोजगारीचे कितपत भांडवल प्रचारात करता येईल, यावर हॅशटॅग कोणाच्या बाजूने ट्रेंड होणार, हे ठरेल आणि हा ट्रेंड निवडणुकीचा निकालही आधीच सांगून जाईल.

प्रचारातले ट्रेंड्‌स 
१९७१ - गरिबी हटाओ
१९७७ - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही
१९८० - स्थिर सरकार
१९८९ - मंडल विरुद्ध कमंडल
१९९६ - आर्थिक सुधारणा विरुद्ध हिंदुत्व
१९९९ - विदेशी विरुद्ध स्वदेशी 
२००४ - इंडिया शायनिंग
२००९ - मजबूत नेता, निर्णायक सरकार 
२०१४ - अब की बार मोदी सरकार
२०१९ - चौकीदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com