Loksabha 2019 : काटा काढण्याच्या ईर्षेमुळे चुरस

निखिल सूर्यवंशी
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रश्‍न 

  • औद्योगिक विकासाचा अभाव
  • बेरोजगारीमुळे अनेक समस्या
  • सततच्या दुष्काळामुळे शेती संकटात
  • पुरेशा जलस्रोतांसह सिंचनाचा अभाव   
  • प्रशासनावर अंकुश नसल्याने शहरे बकाल

संरक्षण राज्यमंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ‘हायप्रोफाइल’ ठरलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. यात काँग्रेस आघाडीने ‘एकी’तून सत्ताधारी महायुतीला नमविण्यासाठी बळ वाढवले आहे. महायुतीनेही आघाडीच्या पाडावासाठी ‘मत’भेदक रणनीतीचा अवलंब सुरू केला आहे. 

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या अस्तित्वाच्या या लढाईत प्रतिष्ठा पणाला लावत आजी- माजी आठ मंत्री कंबर कसून मैदानात उतरले आहेत. मराठा-पाटील समाजाचे दोन उमेदवार आमनेसामने आणि सांप्रदायिकतेचा प्रमुख मुद्दा असल्याने जातीय समीकरणांसह विकासाभोवती प्रचार घुटमळत आहे. सर्वाधिक मुस्लिमबहुल मालेगाव मध्य आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघ निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. या दोन मतदारसंघांवर मताधिक्‍यासाठी काँग्रेस आघाडीची मदार आहे. त्याची कसर उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांतून भरून काढण्यासाठी महायुतीनेदेखील कंबर कसली आहे.  

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३५ वर्षे सत्ता भोगूनही माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी ठोस कामे केलेली नाहीत, असा डॉ. भामरेंचा आरोप; तर पाच वर्षे मंत्रिपद मिळूनही डॉ. भामरे काहीच करू शकले नाहीत, असा आमदार पाटील यांचा आरोप आहे. एकमेकांच्या कार्यशैलीबाबत वैयक्तिक पातळीवर प्रचार पोचल्याने वातावरण तापू लागले आहे. अशात माजी मंत्री पाटील यांचे पुतणे आणि मेहुण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीत वेगळा रंग भरला आहे.

भाजपचे बंडखोर अद्वय हिरे आघाडीचा प्रचार करत आहेत. यातून एकमेकांचा काटा काढण्याच्या ईर्षेमुळे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. तसेच भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे रिंगणात असून, त्यांनी दोन्ही उमेदवारांना शिंगावर घेतले आहे.  

धुळे मतदारसंघात १९ लाखांवर मतदार आहेत. त्यात सरासरी नऊ ते दहा लाखांच्या संख्येने मराठा-पाटील आणि मुस्लिम समाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Dhule Constituency Politics